सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
आई
First Published: 10-July-2017 : 16:20:21

 - साहेबराव नरसाळे

राहीबाई सोमा पोपेरे.  त्या कधीही शाळेची पायरी चढलेल्या नाहीत़ वनस्पतिशास्त्र, शेतीशास्त्र असं काही त्यांना माहितीही नाही.मात्र आज त्या शेतीचं उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेतीतज्ज्ञांना बड्या बागायतदाऱांना शिकवतात. शहरांमध्ये वर्कशॉप घेतात.मंत्रीसंत्री आदरानं फोटो काढतात. राहीबाई अशा अचानकसेलिब्रिटी कशा झाल्या? असं काय केलं त्यांनी? या प्रश्नाचं उत्तर हवं तर त्यासाठी दुर्गम अशा कोंभाळणे (ता. अकोले, जि. अहमदनगर) नावाच्या गावातच जावं लागेल..
 
‘पूर्वी मातीच्या मडक्यांमध्ये राख लावून बियाणं साठवलं जायचं. या बियाणांची उतरंड घरोघर असायची़ लोक घरीच बियाणं तयार करायचे़ मात्र, तंत्रज्ञान बदललं. शेती आधुनिक झाली़ हायब्रीड बियाणं आलं आणि घराघरात असलेल्या उतरंडी एकदम नाहीशा झाल्या.
 
आता कुठल्यातरी कंपनीत बियाणे तयार होतात़ आकर्षक पॅकिंगमधून ते शेतकऱ्यांच्या शेतात उतरतात़ झकपक दिसणारं ते बियाणं शेतकरीही मोठी किंमत मोजून आनंदानं घेतात़ पण त्यातली किती बियाणं रुजतात? आणि रुजलेल्या बियाणांतून फुललेलं पीक किती पोषक असतं? ते किती आरोग्यदायी असतं? हायब्रीड धान्य खाऊन माणूस ताजातवाना दिसतो खरा, पण तो ताकदवान असतो का? शहरातल्या माणसापेक्षा डोंगरातला माणूस धाकट असतो की नाही?’ 
- राहीबाई पोपेरे. या ५६ वर्षांच्या मावशी माझ्यावरच प्रश्नांची सरबत्ती करतात़ उत्तराची वाट न पाहता पुढचा प्रश्न टाकत राहतात़ मी ऐकत राहतो़ त्या बोलत राहतात़ 
राहीबाई सोमा पोपेरे कधीही शाळेची पायरी चढलेल्या नाहीत़ बाराखडीतला ‘अ’ देखील त्यांना लिहिता येत नाही़ वनस्पतिशास्त्र, शेतीशास्त्राचा अभ्यास तर त्यांच्या खिजगणतीतही नाही़ मात्र त्या शिकवतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, शेतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना आणि त्यांच्याकडे शेती शिकायला येतात मोठे मोठे बागायतदाऱ त्या मोठमोठाल्या शहरांमध्ये जातात़ लोकांना, महिलांना मार्गदर्शन करतात़ लोकं त्यांच्यासोबत सेल्फी काढतात, फोटो घेतात़ काहीजण सही मागतात, पण राहीबाई अडाणी आहेत हे कळलं की नाकंही मुरडतात़ मग या अडाणी राहीबाई सेलिब्रिटी कशा झाल्या? शेतीच्या मार्गदर्शक कशा झाल्या? असं काय केलं त्यांनी की त्यांच्याकडे तज्ज्ञ सल्ला घ्यायला येतात. हे सारं सविस्तर जाणून घ्यायला मी पोहोचलो होतो, अकोले तालुक्यातील दुर्गम कोंभाळणे नावाच्या गावात़
अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेपासून दोनअडीच किलोमीटर पुढं गेलं की इंदोरीफाटा लागतो़ या फाट्यावरून सरळ आत जायचं.पुढे इंदोरी गाव लागतं. हेच ते निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराजांचं गाव़ या गावातून उजवा टर्न घेऊन मी पुढे निघालो मेहेंदुरी, शेरणखेलच्या दिशेने़ चहूबाजूंनी हिरवीगार शेती पाहत पाहत मी घाटाजवळ आलो़ शेरणखेलचा घाट चढून पिंपळगाव नाकविंदा गावात पोहोचलो़ तेथे कोंभाळणेला कसं जायचं हे विचारलं़
 
उजवीकडे वळून पुन्हा मोठा घाट चढू लागलो़ अतिशय तीव्र चढण आणि धोकादायक वळणं, शिवाय या घाटात रस्त्याच्या कडेला कोठेच कठडे बांधलेले नाहीत़ म्हणजे चुकून एखादं वाहन कडेला गेलं तर ते थेट तीनशे-साडेतीनशे मीटर खोल दरीतच कोसळणाऱ सहज खाली पाहिलं तर डोळे गरगरले़ नाकासमोर पाहत घाट चढून गेलो़ या डोंगरावर पवनचक्क्यांचा मोठा प्रकल्प आहे़ त्या पाहत पाहत कोंभाळणेजवळ पोहोचलो़ शाळेजवळ काही महिला दिसल्या़ त्यांना पोपेरेवस्ती विचारली़ त्यांनी हात केलेल्या दिशेने गाडी पळवली़ 
पोपेरेवस्तीच्या अलीकडेच एक तलाव आहे़ या तलावाच्या वरच्या बाजूलाच राहीबाई सोमा पोपेरे यांचं झोपडीवजा घऱ घराच्या बाहेर ‘स्थानिक बियाणे कोश’ अशी पाटी लावलेली़ घराच्या भिंती दगडाच्या़ त्या पांढऱ्या मातीने सारवलेल्या़ गायीच्या शेणाने सारवलेला परस़ मला थोडावेळ चुकल्यासारखंच झालं़ 
मी राहीबार्इंनाच विचारलं, ‘राहीबाई पोपेरे यांचं घर कोठे आहे?’ 
तर त्या म्हणाल्या, ‘मीच आहे़’ 
विश्वास बसत नव्हता़ 
त्याचवेळी तेथे औरंगाबादहून एका बड्या शेतकऱ्याचा नोकर राहीबार्इंकडे आला होता़ सोमा पोपेरे हे त्याला बियाणे दाखवत होते़ मीही थेट आत घुसलो़ घराच्या दोन्ही भिंतींच्या बाजूनं आणि भिंतींवर लटकवलेले बियाणे पाहायचं सोडून थेट समोरच्या भिंतीवर असलेल्या पुरस्कारांच्या फे्रम पाहू लागलो़ बऱ्याच फ्रेम्स आणि बरेच पुरस्कार. त्यात एक लोकमत सखी मंचने केलेल्या गौरवाची फ्रेमही होतीच. मग वाटलं, याच त्या राहीबाई, ज्यांना भेटायला आपण पावणेदोनशे किलोमीटरचे अंतर तुडवून आलोय़
एकदम साधी राहणी़ घरासमोर छोटंसं शेत़ शेताच्या कडेला विविध फळझाडं लावलेली़ घराच्या वरच्या बाजूला गांडूळखत तयार करण्यासाठी घरीच तयार केलेला छोटासा खड्डा़ हा खड्डा आता सीमेंट काँक्रीटने लिंपून घेतला आहे़ तो का तसा लिंपला याचाही सुरस किस्सा राहीबाई सांगतात़ तीन पिढ्यांपासून पोपेरे कुटुंब घरीच बियाणं तयार करत असल्याचं राहीबार्इंच्या बोलण्यातून पुढं आलं. 
त्या सांगत होत्या, आता ‘खाण्यासाठी नाही बेण्यासाठी’ असं ब्रीद घेऊन मी काम करते़ आता जसं बियाणं साठवते आणि विकते, तसं पूर्वी नव्हतं़ तयार केलेलं बियाणं घरच्याच शेतीत रुजवायचं.उरलेलं साठवून ठेवायचं.स्वत:पलीकडे असं काहीच नव्हतं. जुन्या वाणांची घरात उतरंड लागली होती़ मात्र, बाहेर ते कोणालाच माहितीही नव्हतं.तो १९९६-९७ चा काळ असेल़ बायफने आदिवासी विकास कार्यक्रम हाती घेतला होता़ त्यातलीच मीही एक लाभार्थी महिला़ एक दिवस बायफचे नाशिक विभागप्रमुख जतिन साठे आमच्या घरी आले आणि त्यांनी ही दुर्मीळ वाणांची बियाणे बँक पाहिली़ ते आश्चर्यचकित झाले़ त्यांच्यामुळेच आज मी जगभर पोहोचते आहे़
जतीन साठे सांगतात, मी राही मावशींच्या घरी गेलो तेव्हा मडक्यात, शेणात, फडक्यात बांधून साठवलेले १७ पिकांचे ओरिजनल ४८ वाणसाठे तिथे सापडले़ मी त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं. ते विविध विद्यापीठांना पाठविलं़ हे मूळ वाण असल्याचं सिद्ध झालं़ त्याचवेळी महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प सुरू झाला होता़ यात राही मावशींना काम करण्यास उद्युक्त केलं. बायफच्या माध्यमातून आम्ही राही मावशींची बियाणे बँक जगाच्या पटलावर आणली़
वालवड, वाटाणे, कारले, वांगे, हादगा, घेवडा, वाल, श्रावणी घेवडा, डांगर, चक्का, गवार, भेंडी, तांबडा माठ, म्हैसवेल, चंदनबटवा, आंबटवेल, करटोली, भोकर, सुरण, कुरडू, काटेमाठ, हिरवामाठ, लालमाठ, आंबाडी, गुळवेल, चाईची बोंडे, भुई आवळी, बांबूचा कोंब, आंबटचुका, फांदभाजी, रानतोंडली, रानओवा, कोंदुरसा, कडूशेरणी, कडूवाळुक अशा सुमारे अडीचशे बियाणांची समृद्ध बँक राहीबार्इंनी तयार केली आहे़ त्यात सुमारे २०० पालेभाज्या, भाताचे १० प्रकार आणि वालाचे १८ प्रकार, तर काही औषधी वनस्पतींची बियाणेही राहीबार्इंच्या बँकेत मिळतात़ राहीबार्इंना लिहिता-वाचता येत नाही़ पण ही सर्व बियाणं राहीबार्इंना तोंडपाठ आहेत़ त्यांच्या घरात बियाणं साठविण्यासाठी मटक्यांची उतरंड आहे, रॅकमध्ये आधुनिक पद्धतीनेही अगदी लेबल लावून बियाणं साठवलं आहे, तर भाताचं बियाणं पिंपात साठवलं आहे़ 
राहीबार्इंचं हे ओरिजनल बियाणं राज्यातील दहा हजार लोकांपर्यंत बायफने पोहोचवलं आहे़ राहीबार्इंकडे बियाणे बँक असल्याची माहिती लोकांना मिळाल्यानंतर आता रोज त्यांच्या घरी बियाणे नेण्यासाठी लोकं येतात़ केवळ अभ्यास म्हणूनही अनेकजण राहीबार्इंच्या बियाणे बँकेत पायधूळ झाडतात़ राज्यभरातून कृषी अभ्यासाचे विद्यार्थी, शेतीशास्त्राचे अभ्यासक राहीबार्इंच्या घरी येतात़ माहिती विचारतात़ फोटो काढतात़ कार्यक्रमाला बोलावतात़ मुंबईतील एका कार्यक्रमात तर चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राहीबार्इंना एक फोटो घेऊ द्या, अशी विनंती केली़ पुण्यातील एका कार्यक्रमात डॉ़ रघुनाथ माशेलकर यांनी राहीबार्इंचा ‘मदर आॅफ सीड’ असा गौरवोद्गार केला़ अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांतील काही विद्यार्थी व शेती अभ्यासकही राहीबार्इंची बियाणे बँक पाहण्यासाठी थेट कोंभाळणेत आले़ राहीबार्इंसोबत फोटोसेशन केले़ एखाद्या सेलिब्रिटीसारखे राहीबार्इंसोबत सेल्फी घेतले जातात, फोटो काढले जातात़ राहीबार्इंना हे आता सरावाचं झालं आहे़ 
पिकांच्या जुन्या वाणांचे बियाणे तयार करण्यासाठी राहीबाई पोपेरे यांनी कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समिती स्थापन केली आहे़ या समितीच्या माध्यमातून अकोले तालुक्यात विविध ठिकाणी आता कसदार बियाणे संवर्धन केले जात आहे़ राहीबाई यांच्याकडे जेमतेम जमीन आहे़ त्यामुळे त्यांनी एकदरे, खिरविरे, जायनावाडी, पिंपळदरावाडी, देवगाव, लाडगाव, माणेर आदी गावांमधील महिलांनाही जुन्या मूळ पिकांच्या वाणांचे बियाणे तयार करण्यास प्रोत्साहन दिलं आहे़ 
त्यांच्या घरात बसून गप्पा मारताना आपण अवतीभोवती पाहत राहतो बियाणांची समृद्ध बॅँक, आणि दिसतेच बियाणांच्या माउलीची धडपडही!
 
(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत  सहायक उपसंपादक आहे.sahebraonarasale@gmail.com  )
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com