सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
आवरा!
First Published: 10-July-2017 : 16:08:44

 - शुभा प्रभू-साटम

 
मुलंच ती, दंगा करणारच, तोडणारच वस्तू असं म्हणत स्वत: शांत बसणारे पालक मुलांना नक्की काय शिकवत असतात?
 
असाच एक गर्दीने भरलेला मॉल. उद्या जगाचा अंत होणार आहे म्हणून आजच खरेदी करावी या समजातून केलेली प्रचंड खरेदी. जड अवजड ट्रॉल्या. यातून वाट काढणारे माझ्यासारखे काही जणं. माझ्या हातात फुलांचा गुच्छ. त्याचं आणि माझं वजन सांभाळत चालताना मागून धक्का बसतो. माझ्या हातातला गुच्छ पडतो. तो उचलणार तोच समोरून आरडाओरड करत येणाऱ्या मुलांच्या पायाखाली तुडवला जातो.
दुसरी घटना
सार्वजनिक वाहनात सीटच्या मागे असंच लहान मूल आणि त्याचा प्रचंड दंगा. प्रत्येक जण वैतागलेला, फक्त पालकाखेरीज.
तिसरी घटना
तिकीट काढायच्या ह्या भल्या मोठ्या क्यूमध्ये सफाईने घुसणारं मूल आणि त्याचा पराक्रम कौतुकाने पाहणारे पालक.
चौथी घटना 
रेस्टॉरण्टमध्ये जेवताना बाजूच्या टेबलावरील मुलांचा दंगा आणि पळापळी.
पाचवी घटना
लिफ्टमध्ये शिरल्यावर सर्व बटणं दाबणारे मूल आणि त्याला हसणारी त्याची माय.
*****
या अत्यंत प्रातिनिधिक घटना आहेत. याव्यतिरिक्त असंख्य उदाहरणं आढळतील, जेथे मुलांचे हे वर्तन ‘मुलंच ती’ या नावाखाली चालून जातं. ना मुलांना खेद असतो, ना पालकांना. 
येथे मुले ही साधारणपणे वय वर्षे ४ पासून पुढच्या वयाची आहेत असं समजा. ज्यांचं मौखिक कौशल्य व्यवस्थित विकसित झालेलं असतं.
आपण परदेशात जाऊन आलो की प्रथम कौतुक कसलं करतो तर तिथल्या सार्वजनिक स्वच्छतेचं आणि शिस्तीचं. ते खरं आहे. निश्चितच वाखाणण्याजोगं असतं ते. पण जर तिथं ते सारं होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही? 
तुम्ही कुठल्याही वाढदिवसाला विशेषत: लहान मुलांच्या, जर गेलात तर तिथं ही वृत्ती अगदी ठळकपणे जाणवेल. 
केक वगैरे कापून झाला आणि खाऊन झालं की मोठी माणसं गप्पा मारतात आणि मुलं सजावटीला लावलेले फुगे, झिरमिळ्या खेचून दुर्दशा करतात. एकदा एका मेंदीच्या समारंभात अशाच एका लहान मुलाने मेंदीचा कोन पिचकारीसारखा उडवून नवरीच्या महाग ड्रेसचा सत्यानाश केला होता.
आता यात मुलांचा काय दोष? त्यांना का दोष देता? मुलं लहान मुलांसारखीच वागणार असं म्हणता येतंच. ते खरंही आहे. पण इथं प्रश्न आहे तो पालकांचा. मुलांचा नाही. मुलंच ती, दंगा करणारच हे खरं. पण हा दंगा पुढे विध्वंसक वळण घेऊ शकतो याची किंचितही कल्पना पालकांना नसते का? पालकांनी आपल्या मुलांना सोशल स्किल्स, सिव्हिक स्किल्स शिकवायला नकोत. 
प्रश्न हा की ती मुळात पालकांना असतात का आपल्याकडे?
इंग्रजीत एक म्हण आह. चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम. म्हणजे कशाचीही सुरुवात आपल्या घरापासून होते, म्हणजेच पालकांपासून. आणि ते बहुतांशी खरं आहे. 
पूर्वी एक गोष्ट होती पाहा. 
जिथं तो चोर आईचा कान चावून सांगतो की मला लहानपणीच थांबवलं असतंस तर मी आज कदाचित चोर नसतो. अगदी बरोबर आहे. 
पालक म्हणून आपण किती सुजाण आहोत? आणि येथे सुजाण पालकत्व हे मार्क आणि अभ्यास यांच्या नजरेतून पाहायचे नाही, तर आपण एक जागरूक जबाबदार नागरिक घडवत आहोत का, या नजरेनं पाहायचं आहे. 
पण जर पालकच तसे नसतील तर? पालकच ना धड नवं, ना जुनं या टप्प्यात जगत असतील तर काय?
त्याविषयी पुढच्या भागात...
 
 
 
(लेखिका मुक्त पत्रकार असून,  स्त्रीमुक्ती चळवळीत  कार्यरत आहेत.shubhaprabhusatam@gmail.com) 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com