सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
पोस्टातलं पत्र हरवलं तर?
First Published: 10-July-2017 : 16:05:49

- ललिता कुलकर्णी 

 
मी येथील मुख्य पोस्ट आॅफिसमधून मुंबईला माझ्या व्यवसायासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रं स्पीड पोस्टनं पाठवली होती. ती तब्बल १५ दिवसांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली. दरम्यानच्या काळात मला पोस्ट आॅफिसमध्ये वारंवार हेलपाटे घालावे लागले. मनस्ताप झाला तो वेगळाच. सोबत माझं आर्थिक नुकसानही झालं. त्याबाबतीत तक्रार कुठं करावी? मला नुकसानभरपाई मिळेल का?
- माधव शिंदे, सातारा 
 
- वास्तविक पोस्ट खात्यानंच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तुमचं कागदपत्रांचं पाकीट जास्तीत जास्त चार दिवसांत पोहोचणं आवश्यक होतं. तसं न होता ते १५ दिवसांनी पोहोचलं. हा उशीर खरोखर अक्षम्य आहे. त्याबद्दलचा जाब पोस्ट खात्यास विचारण्यात काहीच गैर नाही. फक्त त्यासाठी पोस्टाच्या नियमानुसार जावं लागतं.
 
तक्रार अर्ज कसा करणार?
तुम्ही ज्या पोस्ट आॅफिसमधून स्पीड पोस्ट केलं तिथं लेखी तक्र ार करावी. त्यात पत्र पोहोचण्यास विलंब का झाला हे विचारावं. तसेच या विलंबामुळे तुमचं आर्थिक नुकसान झालं असल्यानं त्याची भरपाई मिळावी अशी मागणी करावी. या पत्राची एक छायाप्रत काढून त्यावर तुमचा तक्र ार अर्ज मिळाल्याची पोच घ्यावी. या पत्राचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही किंवा मिळालेल्या उत्तरानं तुमचं समाधान झालं नाही तर विभागीय पोस्टल सुपरिंटेंडेण्ट (हे जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असतात) यांच्याकडे तक्रार करावी. त्यांच्याकडूनही तक्रार निवारण झालं नाही तर तुमच्या विभागाच्या पोस्टमास्टर जनरलकडे किंवा पोस्टमास्टर जनरल (महाराष्ट्र सर्कल) यांच्याकडे तक्रार करावी. त्यांना पाठवावयाचं पत्र कोणत्याही पोस्ट आॅफिसमध्ये दिल्यास ते विनाशुल्क त्यांच्याकडे पोहोचवलं जातं. त्यांना थेट पत्र पाठवावयाचं असल्यास त्यांचा पत्ता-
‘चीफ पोस्टमास्टर जनरल, डाकसेवा संचालनालय (नागरी), जी. पी. ओ. बिल्डिंग, मुंबई - ४००००१ या पत्त्यावर पाठवावं. 
 
डाक अदालत
याशिवाय तक्रार निवारण करून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दर तीन महिन्यांनी भरणाऱ्या डाक अदालतीमध्ये आपली तक्रार मांडणं. या अदालतीची तारीख, वेळ, ठिकाण, तक्रार अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रं इ. माहिती पुरेशी अगोदर जाहीर केली जाते. आपल्याला सोयीचं असेल तर आधी नोंदणी करून त्यात भाग घेता येतो. 
वरीलप्रमाणे प्रयत्न करूनही तक्रार न सुटल्यास पुढील पत्त्यावर तुम्ही तक्र ार पाठवू शकता. 
पोस्टल डायरोक्टरेट, पब्लिक ग्रीव्हन्सेस डिव्हिजन, नवी दिल्ली-११०००१. त्यांना पाठवण्याचं तक्रारपत्र हिंदी किंवा इंग्रजीत लिहावं. 
वरील सर्व माहितीसाठी, तसेच आॅनलाइन तक्रार करण्यासाठी  indiapost.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
नुकसानभरपाई 
मागायची असेल तर.. 
पोस्ट खात्याच्या नियमाप्रमाणे स्पीड पोस्टनं पाठवलेलं पत्र / पाकीट / लखोटा इ. उशिरा पोहोचलं, गहाळ झालं किंवा फाटलं तर स्पीड पोस्टसाठी भरलेली रक्कम परत मिळू शकते. पार्सलच्या बाबतीत या परिस्थितीत (विमा घेतलेला नसल्यास) जास्तीत जास्त एक हजार रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. अर्थात वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकारात यात काही प्रमाणात बदल करू शकतात. स्पीड पोस्ट उशिरा पोहोचल्यामुळे तुमचं किती नुकसान झालं याचा आकडा तुम्ही दिलेला नाही. मात्र तुमचं नुकसान बरंच असेल तर त्याची तसेच या प्रकरणी झालेल्या मनस्तापाची भरपाई मिळवण्यासाठी तुम्ही सातारा जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचाकडे तक्रार करू शकता. त्यासाठी तुम्हाला वरीलप्रमाणे केलेला पत्रव्यवहार उपयोगी पडेल. मंचाकडे करावयाच्या अर्जाचा नमुना मंचाच्या कार्यालयात किंवा डिपार्टमेण्ट आॅफ कंझ्युमर अफेर्स (ग्राहक व्यवहार खाते) यांच्या संकेतस्थळावर http://consumeraffairs.nic.in  येथे मिळेल. 
आपली तक्रार छोटी असो वा मोठी, ती सुटेपर्यंत तिचा पाठपुरावा करणं हे आपल्या स्वत:च्या हिताचं आहेच; पण त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा होण्यासही मदत होते, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं!
 
(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या आहेत)
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com