सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
रक्तपित्त
First Published: 10-July-2017 : 15:58:41

 - वैद्य विनय वेलणकर

डोळे, कान, नाक, तोंड किंवा मल-मूत्र मार्गातून अचानक  रक्त वाहू लागलं तर.. त्यावर उपाय काय?

कशानं होतो हा आजार?

 

शरीरातून कोणत्याही आघाताशिवाय वरच्या मार्गानं किंवा खालच्या मार्गानं रक्तस्त्राव झाल्यास त्यास रक्तपित्त असं म्हणतात. नाक, कान, तोंड, डोळे या मार्गातून किंवा मूत्रमार्गातून, मलमार्गातून (गुदद्वारातून) आणि स्त्रियांच्या योनीमार्गातून अकारण रक्तस्त्राव होतो त्यास रक्तपित्त असं म्हणतात. क्वचित प्रसंगी त्वचेतूनसुद्धा रक्तस्त्राव होतो. गंभीर स्वरूपाची आणि क्वचित प्रसंगी असाध्यतेकडे जाणारी ही व्याधी आहे. आयुर्वेदानुसार पित्त आणि रक्त ही दोन्ही एकाच वेळी बिघडल्यामुळे ही व्याधी होते.
 
अनेक वेळा एकाएकी कोणाच्या नाकातून, तोंडातून रक्त वाहण्यास सुरुवात होते. व्यवहारात यास घोळणा फुटणे असं म्हणतात. हा रक्तपित्ताचाच प्रकार आहे.
 
ॠतू आणि आहार-विहार
प्रामुख्यानं पित्तवर्धक आहार-विहार या विकारास कारणीभूत ठरतो. विशेषत: उष्ण, तीक्ष्ण, तिखट, आंबट, खारट, क्षारयुक्त पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन करणं हे याचं प्रमुख कारण आहे. उन्हात बसणं किंवा फिरणं, आगीजवळ जास्त वेळ बसणं, शरद ऋतूसारख्या (आॅक्टोबर हीट) हवामानात उन्हात बाहेर जाणं यामुळे पित्त आणि रक्त प्रकूपित होतं. पावटा, उडीद, हुलगे (कुळीध), दही, आंबट, ताक, मांसाहार जास्त प्रमाणात घेणं, मुळा, मोहरी, लसूण, शेवग्याच्या शेंगा, पुदिना, शेंगदाणे यांसारख्या पित्तवर्धक पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन करणं, मद्यपान (दारू), आंबट बोरं, चिंच यांसारखे पदार्थ अधिक प्रमाणात खाणं हे या रोगाचं प्रमुख कारण आहे. अनेक प्रतिजैवकं, वेदनाशामक गोळ्या यांसारख्या औषधांचं सातत्यानं आणि दीर्घकाळ सेवन केल्यानंसुद्धा ही व्याधी होते. 
 
रक्तपित्त होण्यापूर्वी..
ही व्याधी निर्माण होण्यापूर्वी थंड पदार्थ खाण्याची इच्छा होणं, तोंडातून वाफा निघाल्याप्रमाणे वाटणं, उलटी होणं, खोकला, चक्कर येणं, श्वासाला रक्ताचा गंध येणं यासारखी लक्षणं निर्माण होतात. यास पूर्वरूप असं म्हणतात.
 
साध्य ते असाध्य
रक्तपित्त या व्याधीचे आयुर्वेदानुसार वातज, पित्तज, लंघन साळीपातिक याप्रमाणे प्रकार केले असून, दोषांच्या गतीनुसार उर्ध्वग, अधोग, तिर्थव्य, रक्तपित्त याप्रमाणे प्रकार केले आहेत. उर्ध्वग रक्तपित्तामध्ये नाक, कान, मुख, नेत्र (डोळे) यासारख्या अवयवातून एकाएकी रक्तस्त्राव सुरू होतो. अधोग रक्तपित्तामध्ये संडासावाटे, मूत्रमार्गावाटे, क्वचित स्त्रियांमध्ये योनीमार्गावाटे रक्तस्त्राव सुरू होतो. आणि तिर्थक रक्तपित्तामध्ये सर्व शरीरातून, त्वचेतून रक्तस्त्राव होतो. ही व्याधी असाध्य असते. काही वेळा रक्त हे त्वचेतून बाहेर न पडता त्वचेखाली साठून राहते. त्यामुळे त्वचेवर काळसर लाल रंगाचे डाग दिसतात.
अर्वाचीन शास्त्राप्रमाणे यास कळढ अर्थात क्िरङ्मस्रं३ँ्रू ळँ१२ेुङ्मू८३्र स्री६्रं) अथवा स्र४१स्र४१ं असं म्हणतात. यामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. त्यामुळे रक्त गोठविण्याची क्रिया मंदावते आणि थोडं जरी कारण मिळालं तरी रक्तस्त्राव चालू होतो.
 
उपचार काय?
औषधोपचार करताना काळजीपूर्वक करावे लागतात. रोगाचे आणि रोग्याचे बलाबल, अवस्था, काळ, देश, प्रकृती इ.चा विचार करून चिकित्सा करावी लागते. शुद्ध रक्त शरीराबाहेर जाऊ नये म्हणून त्याची गती बदलावी लागते. उर्ध्वग रक्तपित्त असेल तर विरेचन आणि अधोग रक्तपित्त असेल तर वमन द्यावं लागतं. 
उर्ध्वग रक्तपित्तात विरेचनासाठी बाहवा, आवळा, हरडा, निशोत्तर, ज्येष्ठमध, मनुका, कुटकी यांसारखी द्रव्य उपयुक्त ठरतात.
वासा म्हणजे अडुळसा हे या विकारातील एक प्रमुख औषध आहे. गौदंती भस्म, पिंपळाची लाख हीसुद्धा उपयुुक्त औषधं आहेत. अधोग रक्तपित्तात नागकेशर आणि काळाबोळ ही प्रमुख औषधी आहेत. दोन्ही प्रकारच्या विकारांवर वाळा, चंदन, हळद, दासहळद, ज्येष्ठमध, नागरमोथा, मंजिष्ठा, पद्मकाष्ठ, गौरिक, प्रबाळ, मौक्तिक पिष्टी यांसारखी औषधं उपयुक्त ठरतात. रक्तस्त्राव थांबविण्याच्या दृष्टीने वड, उंबर, जांभूळ, कांचनार, पिंपळ, आंब्याची कोय यांसारखी औषधी उपयुक्त ठरतात.
 
नाकातोंडातून रक्तस्त्राव होत असल्यास..
नाकातूृन रक्तस्त्राव होत असल्यास दूर्वांचा रस, गायीचं तूप, साखरेचं पाणी नाकात टाकल्यास रक्तस्त्राव थांबतो. मुखातून रक्तस्त्राव होत असल्यास लक्षाचूर्ण, गोदंती, वासावेल्ह, सूतशेखर, चंद्रकला रस, प्रवाळ, पिष्टी, पद्मकादि तैल, कामदुधा रस यांसारखी औषधं उपयुक्त ठरतात.
अन्य औषधांत विविध प्रकारचे बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, वमन या प्रकारच्या शोधनचिकित्सेचा उपयोग होतो. मात्र ही चिकित्सा योग्य वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच करावी.
(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत.)
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com