सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
चहा-भजी
First Published: 10-July-2017 : 15:50:30
Last Updated at: 10-July-2017 : 15:51:39

 - भक्ती सोमण

अलीकडे एक जोक व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता की,  मान्सूनएवढं रोमॅण्टिक व्हायची काही गरज नाही, आमच्याकडे काही पावसात लॉँग ड्राइव्हवर घेऊन जाणारे बॉयफ्रेण्ड नाहीयेत, नवरा आहे भजी कर गं म्हणून कटकट करणारा..
 
हे असे टिपिकल मेसेजेस बायकाही उत्साहानं फॉरवर्ड करतात. पण खरंच कधी विचार केलाय का, पावसाळ्यात भजी करणं आणि मस्त गरमागरम भजी खाणं हेदेखील किती रोमॅण्टिक असतं. असू शकतं. आणि पावसाची आपली टेस्टही बदलून टाकू शकतं.
 
आताच बघा ना, येणार येणार म्हणत पाऊस आलाच. तो नेहमीच हवाहवासा वाटतो. कारण पाऊस आला की वातावरण आल्हाददायक होतं. सृष्टी हिरवागार शालू नेसूून सजते. अशा छान वातावरणात गरमागरम भजी खाण्याचा मोह होतोच होतो. आणि हा मोह टाळताच येत नाही.
 
कल्पना करा. रविवारची सुटी. बाहेर मस्त पाऊस कोसळतोय. वातावरणात गारवा भरलाय. अशावेळी जिव्हातृप्तीसाठी काहीतरी खायला हवं असतं. तेव्हा एकच आठवतं. ती म्हणजे भजी. कांदा भजी तर हमखासच. मग घरोघरी बेत रंगतात भजी करण्याचे. आणि त्यासाठी अनेकदा मदतीला तर पुरुषही तयार असतात. म्हटलं तर दिसायला अगदी साधी.
 
पण, पावसाळी वातावरणात जो गंध पसरतो त्यावर उतारा हवा असेल तर चुरचुरीत भजी खाण्यावाचून पर्यायच उरत नाही. भरपूर कांदा चिरायचा. त्यात मीठ, तिखट, डाळीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ आणि पाणी घालून किंचित सैलसर पीठ भिजवायचं. आणि गरमागरम तेलात ही भजी तळायची. या भज्यांचा गंध घरभर पसरून आपोआप सगळ्यांची पावलं स्वयंपाकघराकडे वळतात. या भजीला खेकडा भजी असंही म्हणतात.
 
कांदा भजी अफलातूनच. पण, त्याचबरोबर बटाटा भजी, सिमला मिर्ची, मिरचींची भजीही मजा आणतात. या अशा भज्यांची भुरळ साध्या टपरीवजा हॉटेलांपासून ते पंचतारांकित हॉटेल्समध्ये 'पकोडाज्' या नावाने ती या काळात पहायला मिळते. 
 
काहीवेळा भजी खायची तीव्र इच्छा होते. पण कांदा-बटाटा यापैकी काही नसतं. अशावेळी वांगं, कोबी, फ्लॉवर, सुरण यांची भजीही करता येतील. कोबी, फ्लॉवर, गाजर, कांदा एकत्र करून मिक्स व्हेज भजीही मजा आणेल की! या काळात ओव्याची पानं, घोसाळा आणि रानभाज्याही मिळतात. त्यांचाही उपयोग भज्यांसाठी करता येईल. 
 
भाज्या, पालेभाज्यांसोबत मूगडाळ, चणाडाळ किंवा सर्व डाळी मिक्स करून त्याचा भरडा काढून केलेली भजीही हटके पर्याय म्हणून वापरता येईल. एरवी कधी भजी खाण्याचं फारसं कौतुक नसलं तरी पावसाळ्यात ही भजी मात्र खावीशीच वाटतात. त्यांचा कुरकुरीत आणि खमंगपणा पावसाळी थंडीत ऊब आणतो.
आता ही झाली आपल्या घरची गोष्ट.
पण कुणाला वाटलं भजी फेस्टिव्हल करायचा तर?
अलीकडे मुंबईत अशा एका फेस्टिव्हलला मी गेले होते. विविध प्रकारची भजी तिथं होती.
तेव्हा वाटलं की पावसाळ्यात असे भजी फेस्टिव्हल तर मैत्रिणींना मिळून पार्टी म्हणूनही करता येतील. किंवा एखादी भजी पार्टी, भजी गेटटुगेदरही करता येईल.
मस्त गरमागरम भजी, चहा, गप्पा, निवांत वेळ आणि पाऊस..
अजून काय हवं, नाही का?
 
मुंबईचा भजी महोत्सव
लोकांचं भजीप्रेम लक्षात घेता आम्ही पहिल्यांदाच दादरला दादर सांस्कृतिक मंचतर्फे भजी महोत्सव आयोजित केला होता. दादरकरांसाठीच असलेल्या या महोत्सवात शाकाहारी-मांसाहारी अशी ३० प्रकारची भजी होती. भजी खाण्यासाठी फक्त दादरकरच नाही, तर मिरज, कोल्हापूर असे लांबून लांबून लोकं आले होते. त्यात पाऊसही पडल्याने पाऊस, भजी आणि चहाचं रॉकिंग कॉम्बिनेशन अनुभवताना लोकांना मजा आली. पावसाळा आणि भज्यांचं हे नातू अतूट आहे, यात शंकाच नाही.
- अमेय मोने आयोजक, भजी महोत्सव
 
( लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.) 
 

जिन्नस  आपल्या प्रांताची अस्सल चव
 
प्रत्येक घरचा स्वयंपाक वेगळा आणि विशिष्ट चवीचा. आणि त्या चवीला असते एक भौगोलिक ओळखही..आपला प्रदेश, आपले गाव, आपल्या घरची पद्धत पाककलेचा वारसाच घेऊन येते. 
उकडीचे मोदक खावे ना तर कोकणातच, नाशिकची मिसळ, खांदेशातलं भरीत, कोल्हापूरचा झणझणीत रस्सा, सांगलीचे भडंग, विदर्भातला वडाभात, औरंगाबादची इमरती असे काही पदार्थ आपण अगदी आवर्जून सांगतो.. 
 
पण त्यापलीकडचे या भागातले अस्सल स्वाद कुठं आता कुणाला माहिती असतात? 
ते कळावे आणि साऱ्या सखींनी करून, चाखून पाहावेत म्हणून हे एक खास आवाहन..
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या विविध प्रांतातील, शहरातील सखींनी जरूर कळवावेत, लिहून पाठवावेत आपल्या भागातले आता फारसे न केले जाणारे खास पदार्थ. 
 
जिन्नस, जो आपल्या आजी-आईनं जपला, आपण पुढे चालवतोय वारसा, तो जिन्नस, ते पदार्थ..
पदार्थाची खासियत, त्याची कृती आणि त्या पदार्थाचा एक खास फोटोही जरूर पाठवा..
पाकिटावर ‘जिन्नस’ असा उल्लेख नक्की करा..
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com