शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
तेल कुठलं वापरु?
First Published: 15-May-2017 : 10:14:55

 - शुभदा चौकर

कोणतं खाद्यतेल चांगलं असा प्रश्न मला नेहमी पडतो. घाण्याचं तेल सर्वोत्तम अशा आशयाच्या जाहिराती मी अलीकडे पहिल्या आहेत. त्यात ते जे काही सांगतात ते खरं आहे का? 
- पूजा घडशी, ठाणे
 
- घाण्यावरचं खाद्यतेल सर्वोत्तम, हेच तेल आरोग्यास उत्तम, आपल्या आधीच्या पिढीतले घाण्याचेच तेल वापरत होते ना असे मतप्रवाह आता दिसतात. काही जण त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतात. पण याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीच्या खरेदी समितीचे सल्लागार आणि अन्न तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ प्रमोद देवधर तेलाबाबतची वस्तुस्थिती छान समजावून सांगतात. त्यांनी सांगितलं की, पूर्वीच्या काळी घरोघरी घाण्याचं तेल वापरलं जायचं, कारण ते ताजं असायचं. आज आपण महिनाभरासाठी तेलाचा कॅन आणून ते तेल साठवून ठेवतो. 
 
तुम्ही बघा, घाण्यावर काढलेल्या तेलाचा साका तळाला बसतो, कारण त्यात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात नाही. घाण्यावरची स्वच्छता, तिथे वापरलेल्या लाकडाचा दर्जा, तेलबियांवर पडणारा दाब यावर तेलाचा दर्जा आणि शुद्धता अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक घाण्याच्या तेलाचा दर्जा वेगवेगळा असू शकतो. घाण्यातून तेल काढताना फ्री फॅटी अ‍ॅसिड काढली जात नाहीत. ज्या तेलात फ्री फॅटी अ‍ॅसिड असतात ते तेल लवकर खवट होतं. ते फार काळ टिकत नाही. 
 
बाजारात जे रिफाइण्ड तेल मिळतं ते शुद्ध केलेलं असतं. त्यामुळे ते बराच काळ टिकतं. तुम्ही वारंवार तुमच्या माहितीच्या स्वच्छ-नेटक्या घाण्यावर जाऊन घाण्यावरचं खाद्यतेल घेऊन येणार असाल तर ठीक आहे, अन्यथा रिफाइण्ड तेल वापरणंच इष्ट! 
 
खाद्यतेलांच्या बाबतीत जाहिराती बघून निर्णय घेऊ नये. गावात नवीन तेल-घाणा सुरू झाला की ते तशी जाहिरात करणारच. पण आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खरेदी केली पाहिजे. मुंबई ग्राहक पंचायतीत दिला जाणारा हा सल्ला तुम्हाला नक्की उपयोगी ठरू शकतो.
 
तेलांची सरमिसळ ? 
नकोच !
विविध तेलांचे गुणधर्म आपणास मिळावेत म्हणून काहीजण भिन्न प्रकारची तेलं एकत्र करून वापरतात. पण कधीही अशा प्रकारे २-३ खाद्यतेलं एकतर मिसळून वापरू नयेत. कारण प्रत्येक तेलाचा उत्कलन बिंदू आणि धूम्र बिंदू हे वेगवेगळे असतात. काही तेलं तापवल्यावर लगेच गरम होतं, तर काही तेलं सावकाश गरम होतात. 
त्यामुळे काही तेलांना तापवल्यावर लवकर उकळी येते, तर काहींना उशिरा. 
तापवल्यावर काही तेलांतून पटकन धूर येतो. हळू गरम होणारं तेल योग्य तितकं गरम होईपर्यंत, पटकन गरम होणारं तेल अति गरम होऊ शकतं. त्यामुळे त्याचं विघटन होऊ शकतं. ते विघटित पदार्थ आरोग्याला घातक ठरू शकतात. 
म्हणून असं करू नये. जर वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यतेलांचे गुणधर्म आपल्या पोटात जावेत असं वाटत असेल, तर खाद्यतेलं आळीपाळीनं वापरावीत. 
म्हणजे एका महिन्यात शेंगदाणा तेल, दुसऱ्या महिन्यात सूर्यफुलाचं तेल, तर तिसऱ्या महिन्यात आणखी कुठलं तेल! या अशा प्रयोगानं तेलातले सर्व घटकद्रव्यं पोटात जातील.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत)
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com