शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
मांडी घालून बसण्याचं सुख
First Published: 15-May-2017 : 10:00:32

- यशोदा वाकणकर

पहाटे झपझप चालून आलं की मला घरी आल्यावर गॅलरीत मांडी घालून पेपर वाचत चहा प्यायला आवडतो. माझी एक गॅलरी पूर्वेला असल्यानं एकीकडे सूर्योदय होताना दिसत असतो. गॅलरीतली झाडं त्या कोवळ्या उन्हानं फुललेली असतात. एकीकडे मी मांडी घालून चहा घेत असते. सुखाची परिसीमा. वाटतं, अजून काय पाहिजे आयुष्यात? 

मांडी घालून ताठ बसणं म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात सुखावह वाटणारी स्थिती. त्यामुळेच मला मांडी घालून बसण्यासाठी असलेला ‘सुखासन’ हा शब्द खूपच आवडतो. सुखानं बसण्याचं आसन. मी सुखासनात बसले की पाय अवघडलेत, पायाला मुंग्या आल्या आहेत असं कधीच होत नाही. गंमत म्हणजे, माझ्या नवऱ्याला मांडी घालून बसणं अजिबात सोयीचं वाटत नाही. त्यामुळे माझं जे सुखासन, ते त्याचं दु:खासन! 

प्रत्येकाची आराम करण्याची काही ना काही आवडती पोझिशन असते. आणि आरामाची कल्पनाही वेगळी असते. कुणाला सोफ्यावर पाय पसरून बसायला आवडतं, तर कुणाला सोफ्यावर पाय दुमडून बसायला आवडतं. कुणाला आरामखुर्चीत बसायला आवडतं, तर कुणाला भारतीय बैठकीवर. 

कुणाला सिंगल सोफ्यावर पायावर पाय टाकायला आवडतं. कुणाला एका पायावर दुसरा पाय काटकोनात आडवा टाकायला आवडतो. गंमत म्हणजे, प्रत्येक कुटुंबात प्रत्येक व्यक्तीची बसण्याची एकेक जागा आपोआपच ठरून जाते. म्हणजे हॉलमध्ये टीव्ही बघत असताना कुठल्या बाजूच्या सोफ्यावर कोण बसतं हे जसं काही ठरूनच जातं. तसंच होतं डायनिंग टेबलावर जेवताना. कुठल्या बाजूच्या खुर्चीत कोण बसतं हेही ठरून जातं. आणि ती ती जागा त्या त्या माणसाची आवडती बनते. तसंच तिथे बसल्यावर असणारी त्याची सुखाची पोझिशनही ठरून जाते. हे सगळं आपण इतकं गृहीत धरतो की त्याबद्दल बोललंसुद्धा जात नाही. तशी माझी आरामाची आवडती पोझिशन विचाराल तर मांडी घालून बसणं! सोफ्यावर बसलं तरी मी मांडी घालते. मांडी घालून बसलं की माझी ब्रह्मानंदी टाळी लागते. 

मांडी घातली की मला सगळ्या शरीराला आराम मिळाल्यासारखं वाटतं. मी सायकलिंग करून आले किंवा छान भरपूर चालून आले आणि मांडी घालून बसले की पाय आपोआप चेपले जातात. आणि ‘सुखासन’ या शब्दाचा अर्थ नीटच कळतो. मला वाटतं की मांडी घालून बसण्याची सवय ही लहानपणापासून तुमच्या घरी कशी संस्कृती आहे यावरही अवलंबून असावी. तसं आमच्या घरी मांडी घालून बसण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. म्हणजे लहानपणी आमच्या घरी डायनिंग टेबल नव्हतं. आणि त्यावाचून कधी अडलंसुद्धा नाही. हॉलमध्येसुद्धा आमच्याकडे भारतीय बैठकच होती. पुण्याच्या घरात आम्ही रोज स्वयंपाकघरात खाली बसकरं घालून जेवायला बसायचो. 

ओतूरला आजीकडे गेलो की पाटावर बसून जेवणं आणि ठाण्याच्या आजीकडे गेलो की नातवंडांची पंगत खालीच. त्यामुळे मांडी घालून जेवणं हीच सवय लागली. नंतर घरात टेबल खुर्च्या आल्या. 

आम्ही टेबलावर जेवायला लागलो. पण आम्ही (मी आणि आई तरी) खुर्चीवरसुद्धा मांडी घालून बसायचो. आणि आम्हाला खाली बसून जेवायची सवय लागली होती की टेबल असूनही दर रविवारी आम्ही चौघे मुद्दामच पूर्वीसारखे खाली सतरंजीवर बसून जेवायचो. आणि अनेकदा रोज रात्रीचं जेवणही खाली बसूनच जेवायचो. अजूनही माझं तेच असतं. मांडी घातल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. 

मी शास्त्रीय संगीत शिकते. त्यामुळे तासभर मांडी घालून तंबोरा घेऊन किंवा तंबोरा घेण्याच्या ठरावीक पोझमध्ये सहज बसू शकते. आता माझ्या बाबाने सत्तरी ओलांडली. तरी तोसुद्धा त्याचं डेस्क घेऊन लेख लिहायला बसतो ते मांडी घालून. 

कधी पाय पसरतोसुद्धा तो. बाबा जमिनीवर ओरिगामीचे मोठे कागद कापत असेल, कधी खाली बसून लाकूडकामात कलाकुसर करत असेल, बासरी वाजवत असेल तरी व्यवस्थित मांडी घालून. ही आपली भारतीय सवय किती छान आहे नाही?

मला वाटतं, सुखासनात बसणं हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आजी-आजोबांच्या पिढीपर्यंत, वाड्यांमध्ये टेबल-खुर्ची ही संकल्पनाच नव्हती. इंग्रजांनी ही संकल्पना भारतात जास्त रुजवली असेल कदाचित. आपण बघत असतो की कितीतरी आज्या-पणज्या अजूनही खाली बसून जेवणं पसंत करतात. पूर्वी विळीवर बसून भाजी चिरणं, एक पाय पसरून तांदूळ निवडायला बसणं, बसूनच शिवण टिपण करणं अशा खूप गोष्टी दिसायच्या. 

लहानपणी आम्ही आजी-आजोबांकडे ओतूरला जायचो तेव्हा गणपतीत, नवरात्रीत वाड्याच्या ओसरीवर मोठ्या पंगती बसायच्या. पाटावर बसून गावकरी जेवायचे आणि आजी-आजोबा स्वत: वाकून निगुतीनं सर्वांना जेवण वाढायचे. तेव्हा वर्षानुवर्षे मी कधीच कुणाला ‘मला मांडी घालून बसता येत नाही’ अशी तक्र ार करताना पाहिल्याचं स्मरत नाही. तसंच सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या मैफलींमध्येसुद्धा पूर्वी कधीच खुर्च्या नव्हत्या. सर्व प्रेक्षक तासन्तास, रात्र-रात्र व्यवस्थित मांडी घालून मैफल ऐकायचे! तेव्हाही कधीच खुर्ची कुणी मिस केली नाही, कारण ती संस्कृतीच नव्हती! 

नुसतं मांडी घालून बसणंच नाही तर भारतीय पद्धतीनं सुखानं जेवणंसुद्धा किती महत्त्वाचं. चमचा न वापरता हातानं खाणं, कढी भात ओरपणं, कांदा हातानं फोडून खाणं, गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत मस्त मनापासून खाणं आणि जेवण झाल्यावर ‘अन्नदाता सुखी भव’ असं ताटाला नमस्कार करत म्हणणं, या गोष्टी आजकाल नामशेष होत चाललेल्या वाटतात. 

बसण्याच्या पद्धती, पोश्चर्स, या अनेकदा अनुवांशिक किंवा अनुकरणातून आलेल्या असतात. ज्या कुटुंबांमध्ये पूर्वीपासून टेबल-खुर्च्या, काट्या-चमच्यानं जेवणं असतं त्या घरांतली माणसं अभिमानानं सांगतात, ‘गेल्या वीस वर्षांत आम्ही मांडी घातली नाही.’ मनात येतं, ही माणसं एक खूप वेगळा आनंद मिस करत आहेत!

आजकाल बदलत चाललेल्या धकाधकीच्या जीवनात माणसाची जीवनशैलीसुद्धा आमूलाग्र बदलत आहे. संस्कृतीतल्या अनेक गोष्टी नामशेष होत चालल्या आहेत. लेक्चरमध्ये ऐकून किंवा इंटरनेटवर वाचून माणसाला जरी माहीत झालं की वैज्ञानिकदृष्ट्या मांडी घालून बसणं शरीरासाठी आणि पचनक्रियेसाठी किती सुयोग्य आहे तरी माणसाला आता जीवनशैली बदलायला वेळ नाही. 

त्यामुळे परत परत वाटतं की कॅसेट रिवाइंड व्हावी आणि सर्व टेबल-खुर्च्या नाहीशा होऊन पंगत संस्कृती यावी!

(भटकंती, गायन, लेखन आणि वाचनाची आवड असलेल्या लेखिका पुण्यात एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवतात. yashoda.wakankar@gmail.com )

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com