सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
है तुझे भी इजाजत
First Published: 17-April-2017 : 15:19:39
Last Updated at: 17-April-2017 : 15:45:22

- शुभा प्रभू-साटम

मला ना खूप करावंंसं वाटतं,

पण जमतच नाही गं रुटीनमध्ये

- अशा तक्रारी कसल्या करता.

ठरवलं तर रोजचा दिवस

आनंदानं मस्त जगता येतो,

दिलखुलास!

आपण अनेक पातळ्यांवर जगत असतो. आणि त्या-त्या पातळीप्रमाणे वागतही असतो. अर्थात रोजच्या जगण्यात हे अगदी आवश्यकच असतं. घरात कसं वागायचं? बाहेर कसं? मैत्रिणीसमवेत कसं? मुलांशी, नातेवाइकांशी कसं? हे ज्याचं त्याचं ठरलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी वागण्याची रीत वेगळी असते. आणि ती अंगवळणीही पडलेली असते. 

वागण्या-बोलण्याच्या कसरतीत, रोजच्या जगण्याच्या धबडग्यात आपल्या इच्छेप्रमाणे जगणं?

ते मात्र राहून जातं. 

समोरचा घरातला असो की बाहेरचा, आपल्याला स्वत:ला त्यांच्याशी कसं वागायचंय किंवा आपल्याला काय आवडतं, आपल्याला कशातून आनंद मिळेल, कसं वागलं म्हणजे समाधान मिळेल याचा विचार मात्र मागे पडतो. ठरावीक साच्यात घातल्याप्रमाणे वागणं बाहेर पडतं. आपल्या इच्छेप्रमाणे इतरांशी आणि स्वत:शी कसं वागावं याचा विचार करायला वेळच मिळत नाही. सगळं रुटीन होतं. एकदम यंत्रवत होतं. 

बायकांच्या वाट्याला तर हे येतंच येतं. खूप वाटतं मनासारखं जगावं.. हे करावं, ते करावं..

पण जमलं नाही तर कधीतरी चिडचिड होेते. राग येतो. व्यक्तीचा, परिस्थितीचा, तर कधी स्वत:चाही. 

खरंतर यावर मात करणं अगदीच शक्य आहे. आनंद मिळवायला फार लांब जावं लागत नाही, की रग्गड पैसे खर्च करावे लागत नाहीत. आपल्याच हातात असतो तो मनासारखा वागण्याचा आनंद. 

सकाळचा चहा. 

मस्त फक्कड जमलेला. 

पण तो नाही जमला तर अनेक जणी चरफडतात, वैतागतात आणि नकळत त्याची सावली पुढे सर्व दिवसावर पडते. 

समजा उशिरा जाग आली तर दिवसभरातलं सगळं वेळापत्रकच बिनसतं. अशावेळी मदतीला येते ती एक क्लृप्ती. मनाप्रमाणे जगण्याची. दिवस उजाडताक्षणीच आपल्या मनाप्रमाणे वागण्याची. 

एखाद्या दिवशी आली जाग उशिरा तर न चिडता- चडफडता उठलो उशिरा असं मोठ्या मनानं मान्य करायचं. एखाद्या दिवशी रुटीन लिपस्टिकपेक्षा जरा वेगळी लिपस्टिक लावायची. 

रोजच्या पोळीभाजीच्या डब्यात काहीतरी वेगळं आणि सोपं द्यायचं- घ्यायचं. एरवी इतरांसाठी चॉकलेटं, कॅडबरी घेतोच ना. तर एखाद्या दिवशी आपल्या आवडत्या कॅडबरीचा छोटा बार स्वत:च खायचा. 

काय अवघड आहे असं हलकं फुलकं वागण्यात? स्वत:च्या आनंदाचा विचार करत जगण्यात. 

आॅफिसला जाताना नेहमीच्या सोबर कपड्यावर कुठलीतरी भन्नाट पर्स घ्यायची. लेकाला, लेकीला, नवऱ्याला, आईला, मैत्रिणीला एक मेसेज करायचा किंवा फोन. चकाट्या पिटायला वेळ नसला तर खुदकन हसवणारा एखादा विनोद पाठवायचा. स्वत:साठी छानसा गजरा घ्यायचा. केसात नाही माळता आला तर टेबलावर पाण्याच्या भांड्यात ठेवायचा. 

घरी दुपारी लंच घेताना एखाद दिवशी खास पाहुण्यांसाठी असलेल्या क्रॉकरीतून वाढून मस्त राजेशाही थाटानं जेवायचं. 

संध्याकाळी एखादं संगीत लावून शांत डोळे मिटून पडायचं. जुने अल्बम बघायचे. आपले जुने ड्रेस पाहायचे. मदतनिसासोबत मस्त चहा प्यायचा. संध्याकाळी घरभर उदबत्ती/धूप फिरवायचा. देवाला दिवा लावायचा. लेकीला, लेकाला जवळ घेऊन कुरवळायचं.

असं आपल्या आनंदासाठी अपल्या इच्छेनं करता येण्यासारखं खूप आहे. यातले निदान चारदोन गोष्टी जरी जमल्या ना तरी एकदम फ्रेश वाटतं. आणि अशा आपल्या आनंदासाठी, आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याला पैसे नाही पडत. आपल्या आजूबाजूलाच असतात या गोष्टी. 

खऱ्या आनंदाला शोधायचं असेल तर आपल्या दिनक्रमातूनच शोधायचं. 

आपला दिनक्रम बाजूला ठेवून उगाच त्यासाठी वणवण करायची गरज नसते.

तो ‘आनंद’ आजूबाजूला असतो. 

आपल्याला फक्त त्याला टिपावं लागतं. पुढचं मग सगळं मनमोकळं होऊन जातं.. 

अगदी आपल्या मनासारखं !

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com