सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
EMI
First Published: 17-April-2017 : 15:13:53
Last Updated at: 17-April-2017 : 15:44:28

 - वसुंधरा देवधर

गृहकर्जावरचा व्याजदर 

वाढला तर लगेच 

ईएमआय वाढतो आणि 

व्याजदर कमी झाला तरी 

ईएमआय मात्र 

तेवढाच राहतो 

हे काय गणित?

माझ्या गृहकर्जाचा व्याजदर खरंतर कमी झालाय, पण माझा हप्ता अर्थात ईएमआय तो काही कमी झाला नाही. हे असं का?

- आकाश सुरवसे,

जळगाव

- हा प्रश्न म्हणजे आपल्या एकूण बँकिंग व्यवस्थेचं काम किती आणि कसं ग्राहकाभिमुख आहे याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्या विविध सेवांचे दर बँका ज्यावेळी वाढवतात त्यावेळी आपल्या खात्यातून ती रक्कम लगेच काढून घेतली जाते. आजच्या काळात एसएमएस करून आपणास कळवलं जातं की इतकी रक्कम डेबिट पडली आहे. चेक किंवा पेन्शन जमा झालं की पण कळवतात, ही वस्तुस्थिती आहे. जर गृहकर्जावरचा व्याजदर वाढला तर परतफेडीचा मासिक हप्ता (ईएमआय) लगेच वाढतो आणि खात्यातून जास्त रक्कम काढली जाते. मात्र दर कमी झाला तर मासिक हप्ता कमी व्हायला हवा ना? असा प्रश्न कुणालाही पडणं साहजिकच आहे. पण असं होत नाही. यासाठी कर्जावरील व्याजदर कसे ठरतात याबाबत थोडं समजून घ्यायला हवं. अर्थात हे समजून घेण्याआधी हेही लक्षात घ्यायला हवं की यासाठी गृहकर्ज गृहीत धरलं आहे आणि त्याची परतफेडीची मुदत तीन वर्षांपेक्षा जास्त असणार आहे. आपण आपल्या ठेवींवर किंवा इतर कोणत्या तारणावर कर्ज घ्याल तर त्यासाठी इथे दिलेली माहिती जशीच्या तशी लागू पडणार नाही.

गृहकर्जाचा व्याजदर ठरतो कसा?

गृहकर्ज आहे आणि त्याचा ठरावीक व्याजदरानं विशिष्ट मासिक हप्ता आपणास बँकेनं सांगितला आहे. आता २०१६ च्या एप्रिल महिन्यापासून टउछफ वर आधारित व्याजदर निर्धारण होत आहे. त्याअगोदर २००८ मध्ये एकदा व्याज आकारणीची पद्धत बदलली होती, तर Marginal Cost AfgRY Fund based Lending Rate – MCLR + Tenor Premium (कालावधीवर अवलंबून दर) + Fund based Lending Rate – MCLR + Tenor Premium  =  आपणास लावण्यात येणारा व्याजदर. या पद्धतीनुसार येणारा व्याजदर एक वर्षासाठी लागू राहणार. दरवर्षी हा दर बदलू शकतो. (तो सहा महिन्यांनी बदलण्याचीही शक्यता आहे) ०.१५ / ०.२५ / ०.५० अशी कितीही वाढ किंवा घट होऊ शकते. ही किरकोळ वाटली तरी गृहकर्जाच्या रकमेनुसार (१० लाख ते १ कोटी ) एकूण हप्त्याची रक्कम बदलते. 

... पण ईएमआय कमी का होत नाही?

ज्यावेळी गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होते त्यावेळी बँक ईएमआय लगेच वाढवते. कमी होताना काय करते? हप्ता लगेच कमी का होत नाही? जी काय जादा रक्कम असेल ती कुठे जाते? - असे प्रश्न आपल्याला पडलेच पाहिजेत. याविषयी राष्ट्रीयीकृत बँकेतून माहिती मिळाली ती अशी :

१. व्याजदर कमी झाला की हप्ता कमी होणार, मात्र आम्ही तो कमी करीत नाही. 

२. परतफेडीचे दोन घटक असतात. मुद्दलापोटी आणि व्याजापोटी. दर कमी झाला की व्याजाची रक्कम त्या प्रमाणात कमी होते. आधीच्या आणि नव्या कमी व्याजामधला जो फरक असतो ती रक्कम सिस्टीम मुद्दलाच्या परतफेडीला लावते. 

३. असं केल्यानं मुद्दल अपेक्षेपेक्षा जास्त कमी होतं आणि त्यामुळे पुढचं व्याज आणखी कमी होतं. ती फरकाची रक्कम ही मुद्दल वसुलीत जमा होते. यामुळे पूर्ण परतफेड समजा १० वर्षांसाठी ठरली असेल तर ती त्यापेक्षा कमी काळात होईल हे उघड आहे. त्यात बँकेचं नुकसानही आहे. तरीपण बँक हे कर्जदाराला सांगत नाही. 

४. याचं कारण असं की, व्याजदर दरवर्षी बदलणार आहेत आणि त्यातील वाढ/घट जशी असेल त्यानुसार दरवर्षी गणित बदलू शकतं हे बऱ्याच ग्राहकांना कळवणं कठीण.

५. दर कमीच राहिला आणि परतफेड लवकर झाली असं घडलं तर ग्राहकाची तक्र ार नसेल. आता या परिस्थितीत, प्रश्न पडणाऱ्या ग्राहकांनी एक गोष्ट नक्की केली पाहिजे. ती म्हणजे, आपल्या कर्ज खात्याचं वार्षिक स्टेटमेंट बँकेकडून न मागता मिळावं, असा आग्रह धरायचा. ते मिळालं की वाचून समजून घ्यायचं आणि शंकानिरसनही करून घ्यायचं. सगळी स्टेटमेंट जपून ठेवायची आणि पूर्ण परतफेड होतेवेळी सगळं योग्य प्रकारे झालंय ना याची खात्री करून घ्यायची. शिवाय ग्राहक अशीही मागणी करू शकतात की दर बदलला की बँकेनं लगेच एसएमेसनं कळवावं. जर तो कमी झाला असेल तर नवा ईएमआय किती होऊ शकतो तेही कळवावं. ग्राहकांना निवडीचा हक्क बजावायला वाव द्यावा . काय निवडावं ते ठरवण्याचा अधिकार शेवटी ग्राहकांना आहेच.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com