मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> सखी >> स्टोरी
शेअर्सच्या नफ्या-तोट्याचं गणित
First Published: 14-March-2017 : 09:09:01

 - अजित जोशी

 
 
४ खर्च ****

एकूण कच्च्या मालावरचा खर्च ****

+ पगार आणि कर्मचारी खर्च ****

+ आर्थिक खर्च ****

+ डेप्रिसिएशन आणि इतर वजा करत न्यायचे खर्च ****

+ इतर खर्च ****

= एकूण खर्च ****

 
 

स्वामीजी, तुम्ही शेअर्स खरेदी करताना प्रमाणांचं महत्त्व सांगत होतात गेल्या वेळेला. ते बरोबर आहे पण आम्हाला सांगा, ही सगळी प्रमाणं काढायला आम्हाला नफा, विक्री, कंपनीत गुंतवलेले पैसे या सगळ्याची माहिती कुठून मिळणार?’ - आल्या आल्या रमानं सुरुवात केली. 

‘सांगतो ना, अहो तुम्हाला माहित्ये का? शेअर बाजाराच्या नियमानुसार प्रत्येक कंपनीला आपला नफा, नुकसान, आपली देणीघेणी या सगळ्याचा हिशेब जाहीर करायला लागतो दर तिमाहीत.’

‘जाहीर म्हणजे?’

‘म्हणजे तो हिशेब बाजार चालवणाऱ्या ‘बीएसई’ (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) वगैरे संस्थांना तर द्यावाच लागतो, शिवाय प्रत्येक कंपनीला आपली वेबसाइट असावी लागते आणि त्या वेबसाइटवर हा हिशेब मांडून दाखवावा लागतो. शिवाय वर्षाअखेरीला वार्षिक अहवाल द्यावा लागतो तो वेगळाच.’ 

‘म्हणजे जे सगळे हिशेब वेबसाइटवर गेले की मिळतात?’

‘तर... तुम्ही सहज म्हणून कोणत्याही कंपनीची वेबसाइट उघडून तर पाहा. वार्षिक अहवालात तर नुसती हिशेबाची नाही तर इतरही अनेक माहिती असते.’ 

‘इतर माहिती म्हणजे?’

‘म्हणजे ती कंपनी चालवणारे संचालक कोण, त्यांच्या स्वत:चे कंपनीत हिस्से किती ही सगळी माहिती तर असतेच पण कंपनीच्या कामाबद्दलही भरपूर माहिती असते. उदाहरण द्यायचं तर टाटा स्टीलच्या रिपोर्टमध्ये त्यांच्या कंपनीची उत्पादन क्षमता आणि पद्धती याची व्यवस्थित चर्चा आहे. आयडियानं नवे किती आणि कशी कनेक्शन्स दिलीत ते सांगितलंय. असं प्रत्येक कंपनीच्या वेबसाइटवर तुम्हाला काही ना काही नवं मिळेल.’

‘ते ठीक आहे हो, पण आता हा अहवाल समजणार कसा आम्हाला?’ 

- नाक मुरडत उमाकाकू म्हणाल्याच. 

‘समजेल ना, का नाही? पण हे बरोबर आहे काकू, की ही गुणोत्तर समजायची तर आधी कंपनी आपल्या नफ्याचा हिशेब कशी देते ते समजायला पाहिजे. इथे स्क्र ीनवर एका कंपनीचा जमाखर्च मांडायची एक सर्वसाधारण पद्धत आहे. त्यातून कंपनीचा नफ्याचा हिशेब वाचता येतो.’ 

तो कसा यासाठी हा तक्ता बघा, असं म्हणत स्वामीजींनी एक तक्ता दाखवला.( तो पहा, तक्ता पलिकडच्या चौकटीत!)

‘अरे बापरे’ - सविता दडपूनच गेली तो तक्ता बघून!

‘मग...? सर्वांना समजायला हवा असेल तर कंपनीला आपला हिशेब सविस्तर द्यावा लागतो. नुसतं उत्पन्न सांगून भागत नाही, तर कंपनीचा जो मुख्य उद्योग आहे त्यातून आलेलं उत्पन्न आणि इतर उत्पन्न वेगळं दाखवलं पाहिजे.’ 

‘त्यात काय फरक आहे?’

‘कसं आहे की समजा ‘अ ब क’ नावाचं एक वृत्तपत्र आहे. त्याची वर्गणी किंवा जाहिराती यातून येतं ते आहे मुख्य उत्पन्न आणि त्याच्या बँकेतल्या ठेवींवर किंवा कुठे एखादं सभागृह भाड्यानं दिलं असेल तर त्यावर येतं ते आहे इतर उत्पन्न...!’

‘आणि हे डेप्रिसिएशन आणि इतर वजा करत न्यायचे खर्च म्हणजे काय हो?’

‘कंपनी जमीन, मोठ्ठाली यंत्रं, वाहन आणि काय काय मोठी मालमत्ता घेते. पैसे जरी एकदाच दिले तरी या गोष्टी कंपनी अनेक वर्षं वापरते. मग त्याबद्दलचा खर्च वापरानुसार दर वर्षात थोडा थोडा दाखवायला पाहिजे ते आहे डेप्रिसिएशन. शिवाय कंपनी बनवताना जो तिच्या बाळंतपणाचा खर्च होतो, कागदपत्र, वकील, बॅँका वगैरे तोही एका वर्षाचा नव्हे! तेव्हा तो किंवा तशाच सारखा इतर खर्चही ठरवून पाचएक वर्षात हळूहळू उत्पन्नासमोर दाखवून टाकतात. तो आहे इतर वजा करत न्यायचा खर्च.’ 

‘आणि क्वचित येणारे आणि अपवादात्मक रकमा म्हणजे?’ ‘अपवादात्मक म्हणजे नेहमीच्याच व्यवहारातले पण यावर्षी अचानकपणे जास्त मोठ्या प्रमाणावर झालेले खर्च. उदा. माल कमी प्रतीचा निघाला म्हणून झालेलं नुकसान किंवा एखादं वाहन विकून झालेला तोटा. पण काही गोष्टी मात्र क्वचितच घडतात. उदा. कायदे बदलामुळे झालेला परिणाम!’

‘आणि कर मुद्दाम वेगळा दाखवत असतील ना. त्यावर काही कंपनीचा कंट्रोल नाही.’

‘बरोबर झरीन’ - स्वामीजी खूश होऊन म्हणाले. ‘गुणोत्तरांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. याच अहवालातून जी सगळ्यात सोपी आणि पहिल्या प्रकारची गुणोत्तरं समजून घेता येतील ती म्हणजे नफ्यातोट्याची गुणोत्तरं. आणि पुढचा सत्संग आपण तिथूनच सुरू करणार आहोत.’

meeajit@gmail.com(लेखक चार्टर्ड अकाउण्टण्ट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत.)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com