सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय अमान्य- पाकिस्तान
First Published: 18-May-2017 : 17:53:39
Last Updated at: 18-May-2017 : 18:23:20

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 18 - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टानं दिलेला निर्णय पाकिस्ताननं अमान्य केला आहे. कुलभूषण जाधव प्रकरण हे आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कक्षेबाहेरचे असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाकिस्ताननं उलटा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. त्यानंतर काही वेळातच हा निकाल अमान्य असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला ठणकावून सांगितलं असतानाच हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कक्षेबाहेरचं असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. तसेच कुलभूषण जाधवसंदर्भात आम्ही सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर ठेवू, असंही पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे.

कोण आहेत कुलभूषण ?

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com