महाराष्ट्राच्या ढोंगाला काय म्हणावे..?

By admin | Published: May 10, 2014 02:54 AM2014-05-10T02:54:14+5:302014-05-10T02:54:14+5:30

आॅनर किलिंगच्या या दोन भीषण घटनांनंतर नगर जिल्हा इथून पुढे हरियानाच्या नकाशात दाखवावा का, असचं वाटू लागलयं बघ....

What to say in Dhonga of Maharashtra? | महाराष्ट्राच्या ढोंगाला काय म्हणावे..?

महाराष्ट्राच्या ढोंगाला काय म्हणावे..?

Next

- हेरंब कुलकर्णी 

तुझा मृत्यू विसरताच येत नाही बघ... खैरलांजी तिकडे दूर भंडारा जिल्ह्यात घडलं... माणसं इतकं अमानुष पाशवी होऊ शकतात हे सारं खरं असूनही विश्वास बसायचा नाही; पण आज माझ्याच जिल्ह्यात इतक्या जवळ हे घडल्यावर या पिसाटपणाची माणसातल्या जनावराची ओळख पटली आहे... अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी असलेला तुझा तालुका... सहकार पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारा आपला नगर जिल्हा काल सोनई आणि आज खर्ड्यामुळे कलंकित झाला आहे. संतांची भूमी म्हणून मिरवणारा आमचा खरा चेहरा धनदांडग्याचा, उन्मादाचा व जातवर्चस्ववादाच्या घमेंडीचा आहे, हेच तुझ्या लटकणार्‍या देहानं सांगितलं. आॅनर किलिंगच्या या दोन भीषण घटनांनंतर नगर जिल्हा इथून पुढे हरियानाच्या नकाशात दाखवावा का, असचं वाटू लागलयं बघ.... तुझा तो टिळा लावलेला निरागस फोटो... तुझं घर... घर तरी कसं म्हणावं? ती पत्र्याची शेड. गोठ्यासारख्या खोप्यासमोर बसलेले तुझे हताश आई-वडील... हे सारं गलबलून टाकतं... डोळ्यासमोरूनच जात नाही गड्या... इतक्या निरागस पापभीरू कुटुंबाची ही दैना अजूनच अस्वस्थ करते.... तुला न्याय मिळाला पाहिजे... असा आवाज आता उठतोय. काय न्याय देणार आहोत आम्ही नितीन.. तुझ्या आई-वडिलांनी आपल्या रक्तानें विटांचा रंग लाल करून तुला शिकवलं... तू शिकशील.. तुझ्या नोकरीनं वीटभट्टीवर भाजून निघणारं त्यांचं आयुष्यचं म्हातारपण तरी बिनकष्टाचं जाईल. आम्ही हा न्याय कसा देणार आहोत..? मदतीतल्या लाखांच्या नोटा... तुझ्या मरणयातना... ७ तासांची मरणप्राय छळवणूक विसरायला लावतील का..? शिक्षणाने तू त्यांचं जगणं बदलशील, असं त्यांना वाटलं होतं; पण त्यापेक्षा शाळा सोडून वीटभट्टीवर काम करत राहिला असतास तर किमान जगला तरी असतास, असं ते आता म्हणत असतील... ‘भारताचे भवितव्य वर्गखोल्यात घडत आहे’ हे कोठारी आयोगाचं वाक्य तुला शाळेतून ओढून नेताना सर्वांत केविलवाणं वाटलं. ही झुंडशाही हेच भारताचं भवितव्य आहे. विद्यार्थ्याला मारहाण होताना मध्ये न पडता स्वत:ला वाचवणारे आम्ही शिक्षक, आम्ही गावकरी, आम्ही बघे हेच भारताचं भवितव्य आहे. मला काय त्याचं, म्हणत बघणारी ही समूहाची षंढवृत्ती तुला मारण्याइतकीच क्रूर आहे. तुझ्या वडिलांनासुद्धा कळवावंसं वाटत नाही. हातोहाती मोबाईल असताना पोलीस ठाण्यला कळवावंसं वाटत नाही. मारणारे काही जण शाळेचेच माजी विद्यार्थी असताना त्यांना अधिकारवाणीनं शिक्षकांना रोखावंसं वाटत नाही... हा आपल्या सामाजिक जीवनाचा अध:पात घाबरवणारा आहे.. जगण्याचीच भीती वाटायला लावणारा आहे. खैरलांजी ते खर्डा हा आमच्या पुरोगामित्वाच्या, संवेदनशीलतेच्या, सुसंस्कृततेच्या, फुले-आंबेडकरांच्या आमच्या दांभिक प्रेमाच्या अधोगतीचा घसरता आलेख आहे.. काही शरम शिल्लक असेल, तर सार्वजनिक व्यासपीठावरून इथून पुढे तरी आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ही बकबक करू नये... १९४७पासून खर्ड्यापर्यंत दर ५ ते १० वर्षांनी पुन्हा दलितांचं, कधी पारध्यांचं रक्त सांडतंच आहे. याच समाजाच्या महिलांच्या अब्रूच्या बांगड्या फुटतच आहेत. प्रतिक्रियासुद्धा पाठ झाल्यायत... पहिले काही दिवस घटनाच दाबली जाते. नंतर मीडियाचं दडपण, मग अटक, मग भेटी इतक्या वाढतात, की उबग यावा... नक्राश्रू... आंदोलनं... रेंगाळणारा खटला... पुन्हा शांतता पुढच्या प्रकरणापर्यंत. ‘एक गाव-एक पाणवठा’ होऊनही २५ वर्षं होऊन गेली. आम्ही पाणवठे एक केले. महागडचे चवदार पाणी प्यायलो... पण पाणी एकत्र पिऊनही आम्ही आमचे पाणी दाखवायला विसरत नाही.. आमचे देखावे वाढत गेले; पण मानसिकता तीच राहिली. ढोंगाचे नोबेल पारितोषिक जर कोणी देत असेल, तर ते महाराष्ट्राला दिले पाहिजे, कारण राजस्थान, हरियाना, बिहारला जातीयवादी, मागास म्हणून शिवी तरी हासडता येते; पण या फुले, शाहू, आंबेडकरांचा मुखवटा लावलेल्या महाराष्ट्राच्या ढोंगाला काय म्हणावे..? १५० वर्षं हे ढोंग चाललें आहे. आम्ही फुलेवाड्यात फुलेंच्या विहिरीवर दलितांसोबत पाणी प्यायलो. आम्ही बाबासाहेबांबरोबर महाडला गेलो. आम्ही शाहूमहारांसोबत बोर्डिंगमध्ये गेलो... आम्ही सानेगुरुजींबरोबर विठ्ठलाच्या मंदिरात गेलो. नाशिकला काळाराम मंदिरात गेलो. आम्ही सावरकरांबरोबर रत्नागिरीला दलितांसोबत जेवलो... गांधीजींबरोबर हरिजन वगैरे म्हणत राहिलो. दादासाहेब गायकवाडांच्या लढाईत गेलो. आम्ही बाबा आढावांबरोबर ‘एक गाव-एक पानवठ्या’त गावोगावी फिरलो... पण आमचं मन दलितवस्तीत पारध्यांच्या पालावर कधीचं गेलं नाही, ते वाड्यावरचं राहिलं.... गढीवरचं राहिलं...

लेखक हे सामाजिक  कार्यकर्ते आहेत.

Web Title: What to say in Dhonga of Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.