सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> संपादकीय >> स्टोरी
वरदान हवे विसरण्याचे!
First Published: 16-July-2017 : 00:17:58

- डॉ. नीरज देव

कुणी म्हणेल हे कसले आले वरदान? अहो, आम्ही विसरू नये, म्हणून केवढे प्रयास करतो, नाना युक्त्या-प्रयुक्त्या वापरतो. हे कमी की काय, म्हणून माइंड पॉवर, मेमरी मॅजिकचे नानाविध वर्गही करतो, भरीत भर अनेकानेक औषधे वापरतो आणि एवढे करूनही आम्ही परीक्षेत विसरायचे ते विसरतोच. मग विसरणे कसले आले वरदान? वरदान नाही शापच आहे तो.

वरवर पाहता आपणास ते खरेही वाटेल, पण ते तसे नाही. लक्षात ठेवणे खूप सोपे असते आणि विसरणे खूपच अवघड असते. बघा ! आपणास जे लक्षात ठेवायचे असते, त्यासाठी आपण काही प्रयत्न केले, तर लक्षात ठेवणे जमून जाते, पण विसरणे? आपण जे विसरण्याचा प्रयास करतो ते कधीच विसरले जात नाही. वारंवार प्रयास करूनही ते आठवतच राहते, कधी-कधी तर त्रासदायकही ठरते.

नाही ना पटत? मग मला आठवणारी एक कहाणी सांगतो, एका माणसाला एका साधूने कोणत्याही वस्तूला सोने बनविण्याचा मंत्र शिकविला. चार शब्दांचा अर्ध्या ओळींचा मंत्र तो; त्याला झटक्यात पाठ झाला. त्याला तो व्यवस्थित म्हणता येतो हे पाहिल्यावर त्या साधूने त्याला सांगितले की, ‘हा मंत्र म्हणताना माकडाचे स्मरण नाही होऊ द्यायचे. हा मंत्र म्हणताना माकडाची आठवण झाली तर वस्तूचे सोने होणार नाही!’ त्याने विचार केला, 'छट् हा काय नियम झाला. माकड नाही आठवायचे? मंत्र म्हणताना मला माकड आठवेलच कशाला?'

पण ज्या-ज्या वेळी तो तो मंत्र म्हणू लागला, त्या-त्या वेळी त्याला माकडाचीच आठवण येऊ लागली. जे विसरायचे होते, तेच माकड त्याला नको तितके छळू लागले.

प्रत्येकाच्याच जीवनांत असे एखादे 'माकड' असते. ते अपमान, व्यथा, दु:ख -वेदना, यातनेच्या रूपात! आपण विसरायचा प्रयास केला, तरी ठसठसणारी -भळभळणारी ती वेदना पुन्हा-पुन्हा आठवतच राहाते. खरे तर ते सारे विसरून आपण पुढे सरकलो, तर प्रगतीच प्रगती असते. आपल्यालाही ते कळत असते, आपण तसा प्रयासही करतो, पण नाही, आपण नाही विसरू शकत ती व्यथा ती वेदना! न विसरण्याच्या याच वेदनेतून मनोविकार जन्म घेतात.

मनोविकाराने त्रस्त एखादी व्यक्ती म्हणते, ‘माझी पुतणी परजातीच्या मुलासोबत पळून गेली. मी विसरूच शकत नाही. घरातील सारे अगदी ती मुलगी,

तिचे आई-वडील हे सारे विसरून

पुढे सरकलेले आहेत, पण मी ते विसरूच शकत नाही.’

दुसरी एखादी म्हणते, ‘माझ्या प्रेयसीने मला फसविले, मला ती सोडून गेली, माझ्या डोक्यातून ते जातच नाही.’ तर तिसरी एखादी म्हणते, ‘त्या वेळी माझे धंद्यात झालेले नुकसान मी विसरूच शकत नाही. त्यामुळे कामावर चित्तच लागत नाही. सगळे कळते, उपयोग नाही आठवून पण वळतच नाही.’

तिघांचेही म्हणणे हेच असते, ‘आम्हाला विसरायला मदत करा, विसरण्याचे वरदान द्या!’

न विसरण्यामागे हेच कारण असते

की, विसरण्यासाठी आपण जे-जे प्रयास करतो, ते-ते आठवण्यासाठीचेच

असतात. विसरण्यासाठी केलेला प्रयासच आठवण देऊन जातो. विसरण्याची

कला म्हणा वा शास्त्र म्हणा, आपल्याला कोणी शिकविलेलेच नसते. विसरण्यासाठी काहीच करायचे नसते, विसरण्यासाठी पुढे पाहायचे असते, आजकडे पाहायचे असते, पण ते आपल्याला जमतच नाही.

विसरण्यासाठी त्या घटनेशी जुळलेली नाळ तोडायची असते. त्यासाठी परवलीचा शब्द असतो, ‘माझ्याचबाबत असे का?’ ही समजूत तोडायची असते, प्रत्येक बाब माझ्या मनासारखीच घडणे शक्य नाही, हे स्वीकारायचे असते, ‘मीच बरोबर होतो असे नाही, तर समोरचाही बरोबर असू शकतो’ हे स्वीकारायचे असते, स्वत:च्या मर्यादा ओळखायच्या असतात. काय गमावले याचा हिशोब न मांडता, आपल्या हातात आज काय आहे, ते पाहायचे असते. एवढे केले की, विसरण्याचे वरदान आपोआप लाभते.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com