मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> संपादकीय >> स्टोरी
झुंडशाहीचा उन्माद
First Published: 20-May-2017 : 03:01:43

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

नागपूर-भंडारा रोडवरील पारडी नाक्यावर सिग्नलची वाट बघत आमची एस्टिम उभी होती. तितक्यात बाजूने एक ट्रक सिग्नल तोडून भरधाव वेगात चौक ओलांडून गेला. शाळेची भिंत तोडून शाळेच्या विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडले हे आम्हाला अंतरामुळे दिसत नव्हते, कळलेही नव्हते. क्षणात सिग्नल मिळाल्यावर आम्ही पुढे निघालो तर कोलाहलात, हातात लोखंडी रॉड्स, काठ्या आणि जे मिळेल ते घेऊन दगडफेक करीत उन्मादाने विध्वंसक थैमान घालणाऱ्या बेफाम झुंडीत आम्ही घेरले गेलो. आम्ही कोणताही नियम तोडला नव्हता की गुन्हा केला नव्हता. समोरच्या बसला अडवून खिडक्या फोडणे, निष्पाप ड्रायव्हरला खाली खेचणे सुरू होते. मागची कार त्यांनी उलटवली होती.

आमच्या कारची मागची काच, माझ्या बाजूची खिडकी यांच्या काचेचा चुरा आमच्या अंगावर आणि कारमध्ये विखुरला होता. अभिनेता असणारा माझा देखणा भाचा अजित पेंडसे आणि सुंदर अभिनेत्री श्वेता पेंडसे, लाखनीच्या कॉलेजातील एक प्राध्यापक आणि आमचा महादेव ड्रायव्हर सारेच क्षणभर सुन्न झालो. आम्हाला आश्चर्यात टाकत त्या उग्र, खुनशी जमावातून चार अनोळखी तरुण माझ्या खिडकीशी येऊन घाईने म्हणाले- ‘‘मॅडम! ड्रायव्हरना आमच्या बाजूने कार काढायला सांगा आणि एकदम भंडाऱ्यालाच थांबा.’’ निसटते आभार मानत आम्ही निघालो ते भंडाऱ्याच्या पेट्रोलपंपावरच थांबलो. मोबाइल्समुळे झुंडशाहीची वार्ता त्यांना कळली होती. हातपाय न गाळता आम्ही लाखनी कॉलेजात पोहोचलो. कार पाहून अवाक् झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अभिवाचनाचा कार्यक्रम रंगला. नागपूर-भंडारा मार्ग बंद झाल्यामुळे अनोळखी आणि आडमार्गाने, झुंडशाहीचा धसका घेतलेले आम्ही सुरक्षित घरी पोहोचलो. दिवसेंदिवस ही झुंडशाही उन्मादाचे उग्र स्वरूप धारण करते आहे. लहानसहान कारणांनी रस्ते अडवणे, रेल्वे बंद पाडणे आणि पापभीरू लोकांना वेठीस धरणे नित्याचे झाले आहे. तोंडाला काळे फासणे, धक्काबुक्की करणे हे करता करता गणपती विसर्जनाला शिस्त लावली म्हणून ड्यूटीवरच्या पोलिसाला तलावात बुडवण्यासाठी झटापट करणे, संशयावरून कुणालाही बेदम मारहाण करणे, निर्घृण हत्या करणे आणि राजरोसपणे समाजात वावरणे या गोष्टी अस्वस्थ करतात. सतत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडियाच्या जाळ्यात, धुंदीत वावरणाऱ्यांच्या मनाचा आणि बुद्धीचा नव्हे तर विश्वाचा कब्जा जणू या नखाएवढ्या चीपने घेतला आहे. एकामागोमाग एक वेगाने माहितीचे तुकडे त्यांना मिळतात. त्यात स्थिरता, एकाग्रता न येता मन-बुद्धी भरकटत राहते. योग्य-अयोग्य, खरे-खोटे न बघता यांत्रिकपणे मिळाले ते पुढे फॉरवर्ड केले जाते. आजचा बुद्धिमान माणूस केवळ कमांड्स घेणारा, झुंडीने जगणारा यंत्रमानव तर बनला नाही? आता वेगळा यंत्रमानव बनवण्याची गरजच काय?

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com