मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> संपादकीय >> स्टोरी
गुळाचा गणपती आणि मुंगळे
First Published: 20-May-2017 : 02:59:04

अभियांत्रिकी परीक्षेतील गैरकारभाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ या विद्यापीठापुरती नव्हे, तर उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आणि अशा संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या तमाम यंत्रणेची विश्वासहर्ता काळवंडली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, पात्रता आणि क्षमतेचा कोणताही निकष न पाळता उभारलेल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हे आज ना उद्या घडणारच होते. शिक्षण घेत असलेल्या संस्थेतच परीक्षा केंद्र देण्याच्या ‘होम सेंटर’ पद्धतीमुळे हे बिंग लवकर फुटले एवढेच! ‘बाआंम’ विद्यापीठाने अंगिकारलेल्या या परीक्षा पद्धतीमुळे गैरव्यवहाराला कसे उत्तेजन मिळत आहे, हे ‘लोकमत’ने विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, अभियांत्रिकी ‘लॉबी’च्या दबावापुढे प्रशासन झुकले. कणा नसलेली माणसे अधिकारपदावर बसविली तर संस्थांचे कसे वाटोळे होते, हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. विद्यापीठाने जो शिक्षणाचा बाजार मांडला आहे ते पाहून मराठवाड्यातील सुबुद्ध नागरिकांची मान शरमेने झुकली. परवा जो अभियांत्रिकी परीक्षेतील प्रकार घडला त्यावर एका वृत्तवाहिनीने ‘मराठवाड्यातच असे घडू शकते’ अशी ओळ चालवली होती. ती वाचून तर प्रत्येकाला लाज वाटलीच असेल. अशा घटना बिहार, उत्तरप्रदेशात घडतात असा समज होता; पण आता बाबासाहेबांच्या नावाने चालणारे विद्यापीठ त्या रांगेत नेऊन बसविले आहे. तीन वर्षापूर्वी याच विद्यापीठाने नॅकचा ‘अ’ दर्जा मिळवला होता. तीन वर्षातील अधोगती इतकी की, प्रवेशासाठी चांगले विद्यार्थी या विद्यापीठाच्या दारातही उभे राहात नाहीत.हे विद्यापीठ मराठवाडा प्रदेश आणि डॉ.बाबासाहेब या दोघांचीही अस्मिता आहे; पण केवळ घोषणा देऊन आणि जयंती साजरी करून अस्मिता टिकत नसते त्यासाठी त्या विचारांची कास धरणाऱ्यांना जागल्याची भूमिका घ्यावी लागते. दोष एकट्या यंत्रणेचा नाही. विद्यापीठाला राजकारणाचा आखाडा बनविले की यापेक्षा वेगळे काय होणार? घटना घडून ४८ तासापेक्षा जास्त काळ उलटला तरी विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणतीही निर्णायक कारवाई केली नाही. कारण विद्यापीठाची ‘निर्नायकी’ अवस्था. कुलगुरु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदासाठी दिल्लीला गेले आहेत. खरे तर ते पावसासारखे आहेत. पावसाळ्यात रोजच पाऊस पडत नाही. पंधरा-वीस दिवसच पावसाचे असतात. तद्वतच कुलगुरू असे कधीमधी दिसतात. परीक्षा नियंत्रक हे प्रभारी आहेत ते निर्णय घेऊ शकत नाहीत. कुलसचिव प्रतिनियुक्तीवर आहेत आणि त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. विशेष अधिकारी बँकॉक दौऱ्यावर आहेत. कुलगुरु डॉ.बी.ए. चोपडे अडीच वर्षात कुलसचिव नेमू शकले नाहीत. तर तेरा प्रभारी कुलसचिव नेमण्याचा वेगळाच विक्रम त्यांनी नोंदविला. त्यांच्या कार्यक्षमतेच्या कथा वेगळ्याच. ‘पेट’ची प्रवेश परीक्षा इतर विद्यापीठे वर्षातून दोनदा घेतात; पण येथे अडीच वर्षात एकही झाली नाही. बारा हजार अर्ज पडून आहेत. सामूहिक प्रवेश परीक्षा आॅनलाईन घ्यायची की नाही असा घोळ सुरू आहे. कुलगुरु वेळच देत नसल्याने प्राध्यापकांचे संशोधन प्रकल्प रखडले आहेत. विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत. प्राध्यापक तासिका घेत नाहीत. एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा बट्याबोळ झाला आहे. कुलगुरुंचा एक पाय कायम विमानात असतो. त्यामुळे विद्यापीठाची गुणवत्ता वाढविणारा एकही उपक्रम राबविला जात नाही. ज्या विद्यापीठाला माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम, रघुनाथ माशेलकर यांच्या सारख्यांनी भेट दिली असा एकही पाहुणा गेल्या अडीच वर्षात आलेला नाही. पाहुणा मिळत नसल्याने लांबणीवर पडलेला दीक्षांत समारंभ उन्हाळ्याच्या सुटीत उरकला जातो आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत बेफिकीर असणारे कुलगुरु दीक्षांत समारंभ उरकणार नाही तर काय? याचा अर्थ विद्यापीठाची अपकिर्ती एवढी की कोणी यायला तयार नाही. भलेही कुणीकिती पायघड्या घालो. शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर विद्यापीठाची घसरण झाली आहे. आज कोणीही गावपुढारी कुलगुरुंच्या दालनात घुसून दादागिरी करतो. कुलगुरुंनी आपल्या पदाचीच जिथे आब ठेवली नाही, तिथे इतर विभागांची काय कथा? देशातील सोडा, राज्यातील इतर विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित विद्यापीठांशी सामंजस्य करार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीस हातभार लावलेला असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाची ख्याती अशी की, या विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या पदवीधारकांना नोकरीसाठी कोणी दारात उभे करत नाही. साहित्य, कला, संशोधन कार्यात कधीकाळी या विद्यापीठाचा नावलौकिक होता. विद्यमान कुलगुरू आणि विद्यापीठात बसलेल्या मंडळींनी तो पार धुळीला मिळविला आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेत घडलेला आणि उघडकीस आलेला प्रकार तसा नवा नाही. गुळाचा गणपती बनविला तर त्याची काळजी घ्यावी लागते. नसता त्याला मुंगळे लागतात. येथे तर अभियांत्रिकीसह अनेक मुंगळे या गणपतीला लागले आहेत. त्यामुळे कुलपतींनी या गणपतीचे विसर्जन करणेच योग्य ठरेल; नसता हे मुंगळे विद्यापीठच फस्त करतील.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com