शुक्रवार २३ जून २०१७

Menu

होम >> संपादकीय >> स्टोरी
‘त्यांचा’ लढा निर्जीवांशी
First Published: 19-May-2017 : 02:44:01

डॉ. लोहियांनी देशाच्या राजकारणाला ज्या वाईट सवयी लावल्या त्यातली एक ‘निर्जीव वस्तूंशी लढणे’ ही आहे. एकेकाळी त्यांनी मुंबईसह देशभरच्या ब्रिटिशकालीन राजांचे, राण्यांचे, व्हॉईसरॉय आणि गव्हर्नरांचे निर्जीव पुतळे हटविण्यासाठी आंदोलन उभारले. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना त्याचा कोणताही उपद्रव व्हायचा नसल्याने त्यानेही ते उचलून एका अडगळीच्या जागी उभे करण्यात त्यांना मदत केली. कधीकाळी चौकाचौकात दिमाखाने उभे असलेले ते पुतळे आता मुंबई शहराच्या एका कोपऱ्यात कमालीच्या दीनवाण्या अवस्थेत दाटीवाटीने उभे आहेत. ‘देशाचा इतिहास सांगणारा हा पुरावा जतन करणे आपल्या विकासाला आवश्यक व मार्गदर्शक आहे’ हा तेव्हाच्या इतिहासकारांचा व अभ्यासकांचा शहाणा सल्ला लोहियांनी मनावर घेतला नाही. त्यांच्या अर्धवट अनुयायांनी तर तसे म्हणणाऱ्यांना ‘देशद्रोही’ हे सध्या कमालीचे लोकप्रिय झालेले विशेषणही चिकटवून दिले. आपल्या राजकीय शत्रूंशी लढायला लागणारी ताकद अंगात नसली की आपले अस्तित्व टिकवायला पुढाऱ्यांना अशा गमजा कराव्या लागतात. मग रस्त्यांची नावे बदलणे आले आणि गावांच्या नावातले ‘ब्रिटिशहीण’ काढून टाकण्याच्या चळवळी आल्या. ते पुतळे वा ती नावे विरोध करीत नव्हती आणि सत्तेलाही त्यात काही गमवायचे नव्हते. सबब लोहियांचे अनुकरण करायला गावोगावचे छोटे लोहियाही पुढाऱ्याच्या अवतारात उभे झाले. मग बॉम्बेचे मुंबई झाले, मद्रासचे चेन्नई झाले आणि कोलकात्याचे कोलकाता झाले. गावे तीच, तशीच आणि तेवढीच अस्वच्छ राहिली. पण त्यावर भारतीयत्वाचा शिक्का उमटविल्याचेच समाधान त्यामुळे अनेकांना लाभले. तरीही अजून हैदराबादचे भागानगरी, औरंगाबादचे संभाजीनगर किंवा खडकी व्हायचे राहिले आहे. मग या पुढाऱ्यांचे लक्ष दुकानांच्या पाट्यांकडे गेले. मराठी राज्यात त्या इंग्रजी पाट्या कशाला, असे त्यांचे म्हणणे पडले. त्यांच्या घरची मुले इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये किंवा विदेशात शिकायला असली तरी या पाट्या त्यांच्या डोळ्यात खुपू लागल्या. मग त्यांनी त्या बदलण्याचे फर्मान काढले. त्या पाट्या निर्जीव आणि त्यांचे मालक दुबळे व झालेच तर खंडणीखोरांना भिणारे असल्याने हेही काम फार लवकर पूर्ण झाले. या आंदोलनाचा लोहियांना फायदा झाला नाही. त्यांचा पक्ष आता हातात कंदील घेऊनच शोधावा लागतो. मात्र ज्यांनी अशा आंदोलनामागे इतिहासातील महापुरुष व सन्मानचिन्हे उभी करण्याचे राजकारण केले त्यांना त्याचा फायदा करून घेणे जमले. मग सत्यनारायणाच्या महापूजा झाल्या, रामाच्या आरत्या आल्या, हनुमंताचे पूजन आले, त्यांची देवळे व त्यांच्या मिरवणुकाही आल्या. त्यातल्याच काहींनी छत्रपतींना हाताशी धरले. संभाजीराजांचे गोडवे गायले. राणाप्रतापाचे नव्याने स्मरण तर काहींनी दक्षिणेतील राणी चेन्नम्मा आणि इतरांचे पुतळे उभारण्याचे प्रयत्न करून पाहिले. वर्तमान आणि त्यातल्या जिवंत माणसांच्या प्रश्नांहून या दिवंगत थोरामोठ्यांच्या प्रश्नांचेच आकर्षण अधिक वाटणे हा अशा माणसांची दुबळी मानसिकता दाखवणाराही प्रकार आहे. यातली काही नावे बदलली नाही तरी त्यासाठी आम्ही लढतो हे दाखविणे त्यांना आवश्यक वाटले कारण सत्तेशी लढण्याचे व जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचे बळ त्यांना कधी एकवटता आले नाही. ही माणसे भाषणे चांगली करतात. धमक्याही बऱ्या देतात आणि प्रसंगी राडेही करतात. पण त्यांचे ते करणे त्यांच्या गल्लीबोळातले व त्यांच्याच शक्तिस्थळातले असते. माध्यमेदेखील त्यांच्या भौगोलिक सीमांचीच जाणीव जनतेला अधिक करून देतात. या धड्याचा लाभ भाजपाने मात्र अधिक चांगला करून घेतला. बाबरी मशीद हटवून त्यावर राममंदिर बांधण्याचे, ते मंदिर तेथे प्राचीन काळापासून असल्याचे सांगण्याचे व त्यासाठी धर्म संघटित करण्याचे राजकारण आखले. लोहियांचे राजकारण पुतळे ते पाट्या आणि नामांतरे व श्रद्धांतरे असे बदलत गेले. ते बदलणाऱ्यांजवळ तेव्हा आर्थिक वा जनतेच्या हिताची कोणतीही कार्यक्रम पत्रिका नव्हती हे येथे लक्षात घ्यायचे. जमिनीवरचे प्रश्न सापडले नाहीत तर ते आकाशात शोधायचे आणि माणसांचे प्रश्न हाती घेता आले नाहीत तर न बोलणाऱ्या व त्या पाट्यांसारख्याच दर्शनी असणाऱ्या ईश्वरांचे प्रश्न उभे करायचे हे त्यातले तंत्र मात्र जुनेच राहिले. आता पुन्हा एकवार मनसे या मुंबईस्थित पक्षाला त्या शहराच्या सांदीकोपऱ्यात उरलेल्या दुकानांवरील इंग्रजी पाट्या खुणावू लागल्या आहेत. एवढी वर्षे राजकारणात राहून माणसे जोडून घेण्यात अपयशी राहिलेल्यांचे हे प्राक्तन आहे. पाट्या बदलतील; पण त्यामुळे मनसेचे प्राक्तन बदलायचे नाही. ‘ते आहेत’ एवढेच त्यातून लोकांना समजणार आहे. मोठे काही करता येत नाही, इतरांचे नेतृत्व स्वीकारता येत नाही, स्वत:चे पुढारीपण विस्तारता येत नाही आणि सोबत उरलेली माणसे मात्र जोडून ठेवायची असतात. ती माणसेही पाट्या तोडण्याच्या व तोरणे लावण्याच्याच योग्यतेची असतात. पाट्या तोडण्यात देशभक्ती आहे एवढेच फक्त त्यांना शिकवायचे असते. तेवढे कर्तृत्व नेत्यांजवळ आहे... आपल्या राजकारणाला लोककारणाचे स्वरूप न आल्याची ही अत्यंत व्यथित करणारी कहाणी आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com