रविवार २६ मार्च २०१७

Menu

close
This ad will auto close in 10 seconds
होम >> संपादकीय >> स्टोरी
शिरावर आरोप आणि खाली सत्तेचे आसन
First Published: 20-March-2017 : 00:05:50

गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांच्या हाती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्याचा भाजपाचा निर्णय जेवढा आश्चर्यकारक तेवढाच तो चिंताजनकही आहे. त्या राज्यातील विधानसभेच्या चार पंचमांश जागा जिंकल्यानंतर भाजपाचा माणूस मुख्यमंत्रिपदावर येणार हे उघड होते; मात्र गेल्या अडीच वर्षांच्या एकारलेल्या राजकारणाचा अनुभव लक्षात घेता तो पक्ष हे नेतृत्व एखाद्या मध्यममार्गी, सोज्वळ व सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीकडे सोपवील असे साऱ्यांना वाटले होते; मात्र आदित्यनाथ आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाचे शपथ घेणारे दोन्ही पुढारी भाजपाने विधानसभेबाहेरून आणले आहेत. आदित्यनाथ लोकसभेचे पाचव्यांदा सभासद झालेले पुढारी आहेत. केशवप्रसाद मौर्य राज्यातील पक्षाध्यक्ष तर दिनेश शर्मा हे अलाहाबाद महापालिकेचे महापौर आहेत. तात्पर्य, निवडून आलेले सारेच आमदार बाजूला सारून पक्षाने ही तीन माणसे बाहेरून आणून इतरांना मान्य करायला लावली आहेत. आदित्यनाथ हे कडवे हिंदुत्ववादी महंत आहेत आणि धार्मिक दंगली चेतविल्याचा, त्यात भाग घेतल्याचा, त्यासाठी रेल्वेचे डबे जाळल्याचा आणि अनेक निरपराधांच्या हत्त्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या माथ्यावर आहे. २००७ मध्ये त्यांनी गोरखपुरातच मुसलमानांची एक मजार जाळली. त्यातून उद्भवलेल्या धार्मिक दंगलीत त्यांच्या हस्तकांनी काही मशिदी उद्ध्वस्त केल्या. मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसचे डबेही या लोकांनी त्याच काळात जाळले. उत्तर प्रदेश हे तसेही धार्मिक हिंसाचारासाठी बदनाम झालेले राज्य असल्याने आदित्यनाथांच्या या महंती कारवाया धार्मिक म्हणून त्यांच्या परिवारानेही गौरविल्या. हिंदुत्ववादी माध्यमांनी, नेत्यांनी, पक्षांनी व संघटनांनी आदित्यनाथांच्या त्या पराक्रमासाठी त्यांचे कौतुक केले आणि त्यांचे नाव सदैव चर्चेत राहील याची काळजीही घेतली. आताही ते राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘ते राममंदिर आता नक्कीच होईल’ असा घोषा त्यांच्या पक्षाने व त्यांच्या मताशी संलग्न असणाऱ्यांनी चालविला आहे. सक्तीने धर्मांतर घडवून आणल्याचाही एक आरोप आदित्यनाथांच्या डोक्यावर आहे. १८०० ख्रिश्चनांची अशी धर्मांतरे त्यांनी घडविली असून, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना धर्मवीरही ठरविले आहे. हिंदी सिनेमातील लोकप्रिय नट शाहरूख खान याची हाफिज सईदशी तुलना करूनही त्याने बऱ्यापैकी कीर्ती संपादन केली आहे. समझोता एक्स्प्रेसवरील हल्ल्याशी त्यांचा संबंध असल्याचेही सीबीआयने आपल्या अहवालात नोंदविले आहे. मोदींना त्यांच्या मंत्रिमंडळात आता फेरबदल करायचे आहेत. अशावेळी एवढ्या पराक्रमी व पाचवेळा खासदार राहिलेल्या आदित्यनाथांना त्यातून वगळणे त्यांना जमणारे नव्हते. त्यांना घालवायचे तर त्यांनाही मनोहर पर्रीकरांसारख्याच युक्तीने घालविणे आवश्यक होते. केंद्रातील संकट राज्यावर टाकण्याची तशीही आपल्या राजकारणाची परंपरा जुनी आहे. एक गोष्ट मात्र भाजपाएवढीच देशानेही ध्यानात घेणे येथे आवश्यक आहे. आदित्यनाथांचे मुख्यमंत्री होणे हा देशातील १७ कोटी मुसलमान नागरिकांना भेडसावण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. देशात धार्मिक दुभंग वाढवीत नेण्याचे आणि त्या बळावर २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे ध्येय भाजपाने आता निश्चित केले आहे. उत्तर प्रदेश विधान सभेतील ४०३ जागांपैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार न देण्यापासून त्यांच्या या कामाचा आरंभ झाला तर शिरावर अनेक गुन्हे असणाऱ्या आदित्यनाथ यांच्यासारख्या महंताला त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद देऊन त्या धोरणावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. कमालीची जहाल व मुस्लीमविरोधी भाषणे देणे, मुसलमान तरुणांना मारहाण करणाऱ्या व प्रत्यक्षात मारणाऱ्या हिंदू संघटनांच्या मागे उभे राहणे आणि धर्मांधतेला बळ देण्याचे महंती राजकारण आखणे हा आदित्यनाथांचा आजवरचा उद्योग आहे आणि राजकारणातल्या यशासाठी देशघातकी उद्योगाचीही मदत घेण्याचे धोरण असलेल्या पक्षाला तो चालणारा आहे. देश म्हणजे नुसता प्रदेश नव्हे. देश म्हणजे त्यातील हजारो मतमतांतरांची, धर्मांची, जातींची, संस्कृतींची आणि जीवन पद्धती जगणाऱ्या लोकांची एकजूट आहे हेच ज्यांना अमान्य आहे ते पक्ष व त्यांचे पुढारी असे टोकाच्या द्वेषाचेच राजकारण करणार. ज्यूंविषयीचा द्वेष जागवून हिटलरने जर्मनीची सत्ता मिळविली. येथे तर मिळविलेली सत्ता दृढ करण्याचेच राजकारण करायचे आहे. पंजाबात त्यांना ते जमले नाही कारण त्या राज्याच्या लोकसंख्येचे स्वरूप वेगळे आहे. गोव्यात आणि मणिपुरातही त्यांना याच कारणासाठी दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले आहे. पण आताची आदित्यनाथांची खुर्ची हे उद्याच्या धर्मांध राजकारणाचे मध्यपर्व आहे हे साऱ्यांनीच समजून घेण्याची गरज आहे. देशात सेक्युलर व सर्वसमावेशक राजकारण करू पाहणाऱ्यांना एकत्र येण्याची अक्कल जोवर येत नाही तोवर धर्मांधांची आताची घोडदौड अशीच चालणार आहे. राजकारणातील दुष्टाचाराला धर्माची झालर चिकटविली की त्याचे देवकारण करता येते, असा समज असणाऱ्यांच्या विजयकाळात अशाच गोष्टी यापुढे घडणार आणि देशाला त्या मुकाट्याने पाहाव्या लागणार.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com