सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
यात्रा
First Published: 15-July-2017 : 15:05:52
Last Updated at: 15-July-2017 : 18:05:11
मेघना ढोके 
 
अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने धार्मिक कारणांनी एकत्र येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाचा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाच आहे, पण उत्तरेत अशी एकच मोठी यात्रा असते का? बद्रीनाथ-केदारनाथ अशा धामयात्रांना होणारी गर्दी, वैष्णोदेवीच्या यात्रेला गर्दी यासह बारावर्षांनी होणारे कुंभमेळे, त्याला येणारे काही कोटी लोक, त्याशिवाय अर्धकुभं असतात. आणि दरवर्षी अलाहाबाद, हरिद्वारला भरणारे माघ मेले. त्यासाठीही काही लाख लोक गंगेत डुबकी मारायला येतात. हे तसे माहिती असलेले यात्रा इव्हेण्ट. यंदा देशस्तरावर पहिल्यांदाच चर्चेत आली आहे ती उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षं चालणारी कावडयात्रा. यंदा योगींच्या (भाजप) सरकारने उंबराच्या झाडांवर घाव घालायचा ठरवला म्हणून राष्ट्रीय माध्यमांमध्ये ही कावड यात्रा झळकली ती पर्यावरणीय चर्चेच्या निमित्ताने. एरव्ही काही कोटी तरुण मुलं हिंदी भाषिक पट्ट्यातून दरवर्षी या यात्रेला जातात हे फारसं कुणाला माहितीही नव्हतं. - बदलत्या वतावरणात धार्मिक उन्मादाचं कारण ठरणाऱ्या आणि सुरक्षा व्यवस्थांवरचा ताण वाढवणाऱ्या अशा यात्रांकडे काहीशा नकोसेपणाने पाहण्याची अभिजनवर्गात पध्दत आहे. उत्तर प्रदेशांतही मध्यम आणि उच्चमध्यमवर्गात या आणि अशा प्रकारच्या यात्रांची ‘देहाती’ म्हणून हेटाळणी होते. या गर्दीला आवर घाला म्हणून एलिट वर्गातले लोक आरडाओरडा करतात आणि त्याला न जुमानता या यात्रांतील वाढत्या गर्दीला शिस्त घालत सुविधा देत राज्य सरकारं आवाक्याबाहेर जाऊन आपल्या यंत्रणांना कामाला लावतात. या सर्वच धार्मिक यात्रांची कावड आज तरुण खांद्यांवर आहे आणि बदलत्या काळानुरुप त्यात अनेकानेक रंग मिसळले जात आहेत. त्या रंगातल्या छटा समजून घेताना कापरं भरावं इतके त्याचे पदर आणि पोत एकमेकांत गुंतलेले आहेत. झालं असं की, उत्तरप्रदेशातल्या उंबराच्या झाडांविषयीचा एक वाद गेले काही दिवस अत्यंत चवीचवीनं चघळला जात आहे. राष्ट्रीय (विशेषत: इंग्रजी) माध्यमं, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांनी उत्तरप्रदेशातल्या उंबरांच्या झाडांचा विषय लावून धरला, समाजमाध्यमांत अनेकांनी सणकून उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मात्र ज्या उत्तरप्रदेशातल्या उंबरांच्या झाडांविषयी हे चाललं होतं, त्या झाडांवरची आणि उंबरांच्या आतली पाखरंही तिथल्या माणसांसह सुखनैव बसलेली दिसली. ज्याला ज्याला विचारलं की, ‘यह गुलर के पेड को लेके क्या बवाल है, उत्तर एकच, कांहे का बवाल? बवाल तो किसी और चीज का है, गुलर के पेड तो खडे के खडे है!’ दरवर्षी श्रावण महिन्यांत उत्तर भारतात ही कावड यात्रा निघते. काही कोटी लोक या कावड यात्रेसाठी हरिद्वारला येतात. मागच्या वर्षी ४ कोटी लोक या यात्रेसाठी हरिद्वारला आले होते. यंदा हा आकडा ५ कोटीच्या पुढे जाऊ शकतो असा प्रशासनाचा अंदाज आहे. हे सारे लोक येतात ते मुख्यत्वे उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब, बिहार, झारखंड आणि मध्यप्रदेश या ‘बिमारू’ राज्यांतून.
  हरिद्वारला भर पावसात येणारी ही सश्रद्ध गर्दी. कावड ही या भागातील अत्यंत प्राचीन अशी परंपरा आहे. लोक- विशेषत: तरुण मुलं आपापल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून कावड घेऊन आपल्या घरातून निघतात. काही चालत, काहीजण गाड्यांतून, ट्रक भरभरुन, चारचाकींत कोंबून हरिद्वारला येतात. प्रकारानुसार या कावडला डाक कावड म्हणजे वाहनातून आलेले, खडी कावड म्हणजे अनेकजण चालत कुठंही न ठेवता सतत खांदाबदल करत ही कावड नेतात आणि तिसरा प्रकार म्हणजे झुला. एकटाच माणूस ही कावड आपल्या खांद्यावर प्रवास करत नेतो. या कावडी अत्यंत देखण्या, सजवलेल्या असतात. हरिद्वारला येऊन गंगास्रान करायचं, आपण कावड म्हणून आणलेल्या मटक्यात, कमंडलूत, प्लास्टिकच्या बाटलीत, प्लास्टिकच्या डबकीत गंगेचं पाणी भरुन घ्याचं आणि पुन्हा आपल्या गावी परतायचं. गावातल्या किंवा आपल्या इच्छित शिवमंदिरात त्या पाण्यानं अभिषेक केला की कावड यात्रा पूर्ण होते. या कावड घेऊन निघणाऱ्या शिवभक्तांमध्ये गेल्या दशकभराच्या काळात तरुणांची संख्या काही पटीने वाढली. कारण गाड्या असल्या तरी सारा प्रवास साधारण पायी, नाचतगात, केला जातो. कावडवाल्यांना सरसकट कावडिया, किंवा भोला असं म्हणतात. पदानं, प्रतिष्ठेनं, जातीनं, वयानं कुणीही असा जो कावड घेऊन निघेल त्याचा उल्लेख ‘भोला’ असाच केला जातो. उत्तरप्रदेशात ही यात्रा म्हणजे एकप्रकारचा महाकुंभच असतो. आपापल्या गावखेड्यातून निघालेल्या या साऱ्या कावड यात्रा यंदा १० जुलैपासून हरिद्वारला पोचू लागल्या. त्या आता २१ जुलैपर्यंत चालू राहतील. ही गर्दी इतकी प्रचंड असते की हे १० दिवस या भागात राष्ट्रीय महामार्ग एन एच ५८ सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी दरवर्षी बंद ठेवण्यात येतो. यंदाचही तो बंदच असेल. हे सारं दरवर्षी चालतं. कावड यात्रा पार पडेपर्यंत उत्तरप्रदेशातल्या धार्मिक सलोख्याचे प्राण कंठाशी आलेले असतात. सारं काही सुरळीत पार पडावं म्हणून पोलीस प्रशासनाच्या गळ्याला तात लागलेला असतो. पण यंदा ही यात्रा एकदम राष्ट्रीय माध्यमांत ‘चर्चेत येण्या’चं कारण असं की, या कावड मार्गात जेवढी म्हणून उंबराची झाडं येतील, त्या झाडांच्या फांद्या ‘छाटण्याचे’ आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. कारण काय तर उंबराच्या झाडाखालून गेलं किंवा उंबराच्या झाडाची सावली कावडीवर पडली तर उंबराचं झाड कावडीया भोलाचं सारं पुण्य शोषून घेतं असा इथला पारंपरिक समज आहे. दरवर्षीच कावडिये आपल्या कावडी आंबा-पिंपळ-वडाच्या पानांनी वरखालून झाकून नेतात. कारण उंबराची छाया त्यावर नको. यंदा मात्र ही लोकभावना लक्षात घेवून, कावडियांवर उंबरछाया नको म्हणून उंबराच्या फांद्या छाटणीचे आदेशच मुख्यमंत्र्यांनी काढले. धार्मिक दबावापोटीच एका राज्याचा (हिंदुत्ववादी) मुख्यमंत्री उंबराच्या झाडांना अशुभ ठरवून अंधश्रद्धांना खतपाणी घालतो असा हंगामा झाला आणि जिथं फांद्या छाटण्याचे आदेश दिले गेले होते तिथं हजारभर झाडं उत्तरप्रदेशात कापली जाणार अशा बातम्या चालवण्यात आल्या. - पण हे प्रकरण खरंतर एवढंच नाही. यंदा योगी आदित्यनाथांनी कावड यात्रेत डीजे लावायला सरसकट बंदी घातली. अश्लिल गाणी, धार्मिक तणाव निर्माण करतील अशी गाणी यांसह हॉकी स्टिक, बॅट्स यासह प्रवास करण्याला बंदी केली. ध्वनीमर्यादा आणि त्यासाठीचं वेळनियमन पाळलंच गेलं पाहिजे असे आदेश दिले. ड्रोन, हेलिकॉप्टर यांनी यात्रेची पाहणी करण्याचे आदेश निघाले. यात्रा मार्गावर सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात आले. यात्रेत चालताना कुणी वाह्यातपणा किंंवा धार्मिक तणाव निर्माण केलाच तर कडक कारवाईचे आदेश आले. शहरी समाजाला वाटू शकतं की, कशाला हवेत डीजे आणि हॉकी स्टिक यात्रेत? पवित्र यात्रेला जाताना नाचावं कशाला? पण इथंच तर खरी मेख आहे. या कावड यात्रांचे व्हिडीओ पाहीले, तर दिसतं की मोठमोठे डीजे लावलेले, सजवलेले अनेक ट्रक, काही शे तरुण मुलं, नाचत, गात, त्यातले अनेकजण भांगेची गोळी लावून त्या तारेतच हा प्रवास करतात. नुस्ता धिंगाणा असतो रस्त्यांवर. ट्राफिक जाम. कान फुटून जातील असा आवाज. नुस्ता हैदोस. यासाऱ्याला वेसण घातली जात नाही कारण प्रश्न धार्मिक! ही यात्रा ज्या मार्गानं जाते तो पश्चिम उत्तरप्रदेशचा गाजियाबाद, मोरादाबाद, लखनौ, मेरठ, मुज्जफरपूर हा सारा मुस्लिमबहूल भाग. या भागातले स्थानिक मुस्लिमही कावड यात्रेतल्या लोकांना चहापाणी फळवाटप करतात. मात्र यात्रेला जाणाऱ्यांची संख्या आणि उन्माद प्रचंड असतो. त्यातून काही भागात धार्मिक खटके उडतात. वातावरण तापतं, हा सारा पूर्वेतिहास लक्षात घेवून यंदा उत्तरप्रदेश सरकारनं या यात्रेत डीजेपासून अनेक गोष्टींवर निर्बंध घातले, यात्रेला शिस्त लावायचा एक प्रयत्न केला. प्रशासकीय मदत आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी काही आखणीही केली. मात्र तरुण कावडिये इथंच थोडे उचकले, कारण डीजेशिवाय ही यात्रा याची गेल्या वर्षात इथं कुणी कल्पनाही केलेली नाही. वर्गणी काढून, पदरपैसा खर्च करुन, स्थानिक राजकीय नेत्यांकडून पैसे घेवून या यात्रेत अनेकजण डीजेचे ट्रक घेवून निघतात. नाचतात, रस्त्यानं दंगा, पिकनिक करत चालतात. समाजातल्या सर्व जातीतले अत्यंत निम्न आर्थिक स्तरातले, बहुसंख्य अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असे हे तरुण असतात. ही यात्रा म्हणजे त्यांच्यासाठी घराबाहेरचा अनोखा, स्वतंत्र, मनमर्जी अनुभव असतो. यंदा हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यानं ते यात्रेत अधिक सोयी देईल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र सरकारकडून निर्बंध लादले गेले आणि माध्यमांनी देशभर चर्चा रंगवली ती उंबराची झाडं तोडण्याची!! १९९२ पर्यंत ही कावड यात्रा नवसपूर्तीची यात्रा, धार्मिक परिक्रमा एवढ्यापुरतीच मर्यादित होती. या यात्रेला जाण्याला काही ग्लॅमर नव्हतं किंवा नव्या परिभाषेत सांगायचं तर त्यात काही ‘एक्झॉटिक आणि अ‍ॅडव्हेंचरस’ नव्हतं. ९०च्या दशकात मात्र धार्मिक ध्रुवीकरणाने वेग घेतला आणि या यात्रांत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी पैसा ओतला. त्याची प्रतिकात्मकता वाढवली. यात्रेला जाणं हे तरुण मुलांना प्रतिष्ठेचं वाटू लागलं. एकीकडे उत्तरभारतात बहुसंख्य तरुण हातांना रोजगार नाही. रिकामपण मोठं. त्यात ही यात्रा म्हणजे पावसाळ्यात महिना-पंधरादिवसांची ट्रिप-पिकनिक होऊ लागली. अंगावर भगवे कपडे, टीशर्ट. ते ही छापलेले, कुणी स्थानिक नेत्यानं, मंडळानं स्पॉर्न्सर केलेले, तशीच उपरणीही हे सारं आलं. भगवे गॉगल, हातात ब्रेसलेट्स, डोई पट्ट्या, कान-नाक-तोंड-जीभ-भुवया यांत केलेलं पिअर्सिंग,भगवी मोबाईल कव्हर्स आणि सेल्फी स्टिकला भगव्याच कव्हरपट्ट्याही चढल्या. त्यातही गावात ज्यांना मान नाही अशा तरुणांना कावडिया भोला झाल्यावर मान मिळतो. लोक झुकून पाया पडू लागतात. जो उत्तम कावड यात्रा आयोजक, डाक कावडीत म्हणजे ट्रकमध्ये भरभरुन जास्त तरुणांना चकटफू कावड यात्रेत नेतो तो गावात हळूहळू नेता बनू लागतो. दुसरीकडे ज्यांची मुळं या गावांत आणि प्रथांमध्ये आहेत, ते नोएडा-गुरगाववाले नव्या कार्पोरेट जगाचे तरुणही ब्रेक आणि डिटॉक्स म्हणून या यात्रेत सहभागी होऊ लागलेले आहेत. यात्रेत आताशा त्यांचा टक्का मोठा दिसत असला तरी निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. दिवसेंदिवस या यात्रेला जाणं ‘फॅशनेबली स्पिरीच्युअल’ ठरतं आहे हे मात्र नक्की. खरंतर ज्या खांद्यांवर या कावडी आहेत, त्या हातांना अधिक विधायक, अधिक समाधान देणारे पर्याय अवतीभोवती उपलब्ध नाहीत हे वास्तवच या यात्रा वारंवार दाखवतात. यात्रेला जायला पैसा लागत नाही, वाटेत खाण्यापिण्यासह निवाऱ्याची सोय परस्पर होते, एक सामुहिक वाटचाल असल्यानं समुहाची सूप्त ताकद आत्मविश्वास वाढवते. आणि मग रस्त्यावर नाचत दंगा करण्यपासून ते यंत्रणांना जेरीस आणण्यापर्यंत सारं विनासायास होऊ लागतं. अर्थात, ते करायचं म्हणून कुणी यात्रांना जात नाही, मात्र यात्रेच्या आनंदाला वर्चस्व आणि अस्तित्व दाखवण्याची स्पर्धा कधी चिकटते, हे लक्षातही येत नाही. यात्रांना जाणं, यात्रा सुरुच ठेवणं, अत्यंत दुर्गम भागात, अत्यंत बिकट परिस्थितीतही माणसांचे लोंढे पुढे सरकू देणं हे सारं मग शासन-प्रशासनालाही अपरिहार्य होतं कारण त्याच्या पायाशी मतांचं राजकारण वेटोळं घालून बसलेलं असतं. संख्यात्मक शक्तीला डावलून निर्णय घेणं लोकशाहीला पूर्वीही अवघडच होतं आणि आता तर त्या अवाढव्य शक्तीच्या हाती तंत्रज्ञान आल्यानं, सामान्य माणसाचा ‘रीच’ वाढल्यानं संख्याबळ जास्त असणाऱ्यांच्या इच्छाशक्तीची दखल शासनादी व्यवस्थांना घेणं भागच पडू लागल्याचं आजचं वर्तमान आहे. हेच सूत्र अमरनाथ यात्रा ते शबरीमलाच्या यात्रा, कुंभमेळे ते माघमेले, कावड यात्रा ते स्थानिक जत्रा या साऱ्यांना लावून पाहता येतं. परिस्थिती प्रतिकूल असो, प्रशासनाची अवस्था बिकट असो, जीवाला धोका असो, पर्यावरणाची वाताहात होत असो, या यात्रा सुरुच राहतात, कारण त्या सुरु ठेवण्यात अनेकांचे हितसंबंध उत्तम साधले जातात. या यात्रांना विरोध करुन, किंवा नुस्ती नाकं मुरडून, देहाती, मागास किंवा धार्मिक उन्माद असं लेबल लावून या यात्रांचे हे अंतस्थ पोटपदर लक्षात येणार नाहीत. उलट अधिक विरोधानं यात्रस्थांसह यात्राप्रोत्साहितांनाही अधिकचा ज्वर चढू शकतो. उंबराच्या झाडांच्या छाटल्या जाणाऱ्या फांद्यांची चिंता करत असत असताना समाजातल्या तारुण्याच्या इच्छा-आकाक्षांसह सामाजिक -धार्मिक जाणिवांना फुटत असलेल्या या फांद्यांचंही भान हवं. नाहीतर या यात्रा कुठल्या प्रवासाला निघाल्या आणि कुठल्या मुक्कामी कधी पोहचल्या हे लक्षातही येणं अवघड होऊन बसेल. 
 
प्रथांचं प्रस्थ का वाढतं?
कावड हे गर्भजलाचं प्रतिक आहे असं हिंदू धर्मातील काही श्रद्धासमुहांत मानलं जातं. तर काही श्रद्धासमुहांत कावड प्रथेचा सृजनात्मक कल्पनांशी संबंध जोडलेला दिसून येतो. मात्र एकेकाळच्या समाजाजीवनातल्या या प्रथापरंपरा आजच्या जगण्याशी कितपत कालसुसंगत आहेत, हे तपासून पाहिलं तर धर्माचं राजकीयीकरण होण्याच्या काळात या परंपरा अधिक जोमानं वाढीस लागलेल्या दिसतात. जुन्या प्रथा नव्यानं मूळ धरतात, जोमानं वाढतात. त्यात पैसा ओतला जातो, अािण त्या गुंतवणूकीतून स्थानिक राजकीय लाभही करुन घेतले जातात. मुळातच कुठल्याही रीतीभातींचा,कर्मकांडांचा मुख्य उद्देश कायमच त्यात अधिक लोकांना त्यात सहभागी करुन घेणं हा असतो. त्यातून या विधी, परंपरांचं, कर्मकांडांचं भांडवल करणारे ‘एजण्ट’ निर्माण होताना दिसतात. ते त्या त्या कर्मकांडाचं प्रस्थ वाढवतात. आधुनिक काळात लोकशाहीत, राजकीय पक्ष, संघटना अधिकाधिक लोकांना स्वत:शी जोडून घेण्यासाठी तेच करतात. त्यातून या प्रथांचं, कर्मकांडांचं प्रस्थ वाढताना दिसतं.
-हेमंत राजोपाध्ये
(संस्कृत आणि भारतीय प्रथापरंपराचे अभ्यासक.)
 
हे ‘बळ’ एरवी का नाही?
काही प्रथा या धर्मापेक्षाही लोकपरंपरांचा भाग असतात. कावड ही अशीच एक परंपरा. आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पूर्वी लोक कावड यात्रा चालत. मधल्या काळात या यात्रांना अवकळा आली होती. आता मात्र नव्या काळात तरुणांमधली अस्वस्थता त्यांना कावड चालायला प्रोत्साहित करत असावी. त्यात भक्ती आहे, पण त्यासोबत आहे समूहाचा भाग म्हणून जगण्याची एक पारंपरिक आस. 
... या इतक्या तरुणांना ही यात्रा काही आनंद देत असेल, काही बळ देत असेल म्हणून तर ते येतात. ते बळ समाज त्यांना एरव्ही का देत नाही, देऊ शकत नाही हा वेगळ्या चिंतेचा विषय आहे.
 
-प्रतिक मिश्रपुरी
(हरिद्वार स्थित नामांकित जोतिषी)
 
आयआयटी रुरटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कावड यात्रा या माहितीपटाचा हा व्हीडीओ अवश्य पहा- 
https://www.youtube.com/watch?v=8IBSw_OFP7g
 

 
कावड यात्रेच्या वेळी रस्त्यावर कसा माहौल असतो, पहा हा व्हीडीओ
https://www.youtube.com/watch?v=FFmOF3p6vDU

 
(लेखिका लोकमत वृत्तपत्र समूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com