सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
भारताचं 'घड्याळ' बदलणार
First Published: 08-July-2017 : 15:25:02
ओंकार करंबेळकर
 
सकाळी आपण नेहमीच्या वेळेला उठतो, वेळेवर शाळा-कॉलेज, आॅफिसला जातो.. पण भारतातल्या सगळ्याच लोकांचं जीवन असं शिस्तशीर चालत नाही. ईशान्य भारतात मुळात सूर्याेदय होतोच पहाटे चार वाजता. सकाळी दहा वाजेपर्यंत कडकडीत ऊन आणि संध्याकाळी चार वाजता तर चक्क अंधार! त्यामुळे इथल्या लोकांना पहाटे  उठावंच लागतं, आॅफिसला जाण्यासाठी वाट पाहत बसावं लागतं आणि चार वाजताच अंधार पडल्यामुळे लवकर आवरासावरही करावी लागते. त्यामुळे सूर्यप्रकाश वाया जातो, विजेचा जास्त वापर होतो आणि वेळेचीही नासाडी होते. भारतात दोन प्रमाणवेळा असाव्यात अशी मागणी याच कारणानं पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
 
पहाटे ४ वाजता सूर्योदय झाला की आम्हाला उठावं लागतं. मग भारतीय प्रमाणवेळेनुसार आॅफिसची वेळ सकाळची १० वाजताची असल्यामुळे आम्ही तसाच वेळ घालवत दहा वाजण्याची वाट बघतो. तोपर्यंत आमच्याकडे टळटळीत ऊन पडतं. मग ४ वाजता अंधार पडल्यावर कामं थांबवावीच लागतात. या सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही आमचे कामाचे किती तास वाया घालवत असू याचा विचार करा... हा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा.
पेमा खांडू यांनी ईशान्य भारताला वेगळी प्रमाणवेळ असावी अशी मागणी केली आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दोन प्रमाणवेळा असाव्यात का यावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. यावर्षी मार्च महिन्यामध्ये भारतामध्ये दोन प्रमाणवेळा निर्माण करण्यात येण्यासाठी केंद्राला सूचना द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयासमोर आली होती. खांडू यांची मागणी असो वा गुवाहाटी कोर्टातील याचिका, भारतामध्ये ही चर्चा आपल्याकडे होत असते आणि नंतर ते चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा शांत होते.
भारत, अमेरिका, रशिया, आॅस्ट्रेलिया अशा आडव्यातिडव्या पसरलेल्या देशांचा विचार केला तर एकच प्रमाणवेळ सर्वांना योग्य न्याय देऊ शकत नाही हे स्पष्टच आहे. भारताच्या पूर्व भागात विशेषत: ईशान्य भारतातील आणि अंदमान निकोबार बेटांवरील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. पेमा खांडू म्हणतात ते खरंच आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार घड्याळे लावल्यामुळे अरुणाचलमध्ये पहाटे चार-पाच वाजताच लख्ख प्रकाश पडतो. उन्हं तोंडावर आली की लोकांना उठावं लागतंच. मग भर उन्हात तापलेल्या रस्त्यांवरून सकाळी दहा वाजता आॅफिस सुरू करायचं आणि दुपारी चार-पाच वाजता अंधार पडला की कामं बंद करून तिकडे घरी पळायची घाई सुरू होते. किंबहुना सूर्यास्तापूर्वीच त्यांना कामं संपवावी लागतात. या सगळ्या उलटसुलट कारभारामुळे संपूर्ण पूर्व भारताचे कामाचे कित्येक तास आणि मनुष्यबळ दरवर्षी वाया जातं. लवकर अंधार पडल्यामुळे विजेचा वापरही भरपूर करावा लागतो. 
सध्या आपण ८२.५ अंशाचे रेखावृत्त वेळेसाठी वापरत असलो, तरी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक टाइम झोन्स वापरात होते. १८०२ साली ब्रिटिश खगोलतज्ज्ञ जॉन गोल्डींगहॅमने मद्रास प्रमाणवेळेची निर्मिती केली. ही वेळ ग्रीनविचच्या पुढे ५ तास २१ मिनिटे होती. कलकत्ता आणि बॉम्बे टाइमची निर्मिती झाल्यानंतर मद्रास टाइम वापरातून बंद करण्यात आला. मात्र कलकत्ता आणि बॉम्बे या टाइम झोनच्या दरम्यान प्रवास करताना रेल्वे कंपन्यांनी त्याचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे मद्रास टाइमला रेल्वे टाइम आॅफ इंडिया असे म्हटले जाऊ लागले. यानंतर १८८४ साली कलकत्ता आणि बॉम्बे टाइमची निर्मिती करण्यात आली. मुंबईच्या वेळेसाठी ७५ अंश पूर्व हे रेखावृत्त प्रमाण मानण्यात आले, तर कलकत्त्यासाठी ९० अंश पूर्व हे रेखावृत्त ठरवण्यात आले. मुंबईचा टाइम झोन ग्रीनविचच्या पुढे ४ तास ५१ मिनिटे होता, तर कलकत्ता टाइम झोन मुंबईपेक्षा १ तास ३ मिनिटे पुढे होता. १९०६ साली इंडियन स्टँडर्ड टाइम सुरू करण्यात आला तरी या दोन्ही वेळा वापरात होत्या. साधारणत: १९५५ पर्यंत बॉम्बे टाइम, तर १९४८ पर्यंत कलकत्ता टाइम वापरात होता. मुंबईमध्ये १९०६ साली इंडियन स्टँडर्ड टाइम झोन लागू झाल्याचे समजल्यावर मात्र शहरात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली होती. ही नवी वेळ स्वीकारण्यास कोणीही फारशी उत्सुकता दाखवली नाही. या विरोधाचे नेतृत्व फिरोजशहा मेहतांनीच केले. मुंबईच्या लोकांना विश्वासात न घेता हा बदल केल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या गोंधळात महानगरपालिकेचे कामकाजही काही काळ थांबले. अखेर लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारने या विषयाला गुंडाळले.
आता भारताने स्वातंत्र्यानंतर इंडियन स्टँडर्ड टाइम झोन संपूर्ण देशासाठी वापरायला सुरुवात केली असली, तरी अवाढव्य पसरलेल्या देशात जे वेळेचे प्रश्न येतात ते आपल्याकडेही उद्भवतातच. काही भागात सूर्योदय एकदम पहाटे होतो, तर कोठे सूर्यास्त उशिरा होतो. वेळ एकच मानली तरी उजेडाचे समान तास सर्वांना सारखे मिळत नाहीत. अमेरिका आणि युरोपने यावर तोडगा काढण्यासाठी डेलाइट सेव्हिंग्ज टाइम (डीएसटी) हा प्रकार वापरायला सुरुवात केली. यामध्ये प्रत्येक उन्हाळा आणि हिवाळ्यात सर्व लोक घड्याळे तासभर मागे किंवा पुढे करत राहतात. पण हे सगळे एकदम डोकेदुखीचे काम असून, त्याच्या नियोजनामध्ये गोंधळ होतात. आता सगळी कामं कॉम्प्युटरवर होत असल्यामुळे सगळी सिस्टिमच बदलावी लागते. या कटकटीला कंटाळून रशियाने डीएसटी बंदच करून टाकला. १९६२ साली झालेल्या चीन युद्धावेळी आणि ६५च्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धकाळात काही काळ भारतानेही डीएसटी वापरली होती. भारतात येणाऱ्या अडथळ्यांवर आजवर सुचवलेल्या पर्यायांमध्ये डी. पी. सेनगुप्ता आणि फैजल फारुकी यांनी सुचवलेला पर्याय त्यातल्या त्यात सर्वात योग्य वाटतो. 
डी. पी. सेनगुप्ता यांनी भारतीय प्रमाणवेळ फक्त अर्ध्या तासाने पुढे केली म्हणजे सध्याच्या प्रश्नांवर बऱ्यापैकी तोडगा निघेल असे मत मांडले आहे. म्हणजे ६.००+ जीएमटी वापरायला सुरुवात केली तर पूर्वेस आणि ईशान्येस राहणाऱ्या लोकांना उजेडाचा थोडा अधिक वेळ मिळेल. त्यांना सकाळी थोडं जास्त झोपता येईल आणि संध्याकाळी उजेडाचा जास्त वेळ मिळाल्यामुळे विजेची बचतही होईल अशी त्यांनी मांडणी केली. 
फैसल फारुकी तर यासाठी एक मोहीमच चालवतो. फैसलने ही मांडणी लोकांना लक्षात यावी यासाठी मोअरसनलाइट नावाने संकेतस्थळ उघडलं आहे. 
अर्धा तास प्रमाणवेळ पुढे नेल्यास सूर्योदय अर्धा तास उशिरा होऊन आणि सूर्यास्तही लांबल्यामुळे संध्याकाळी अर्धा तास असा उजेडाचा अधिक वेळ मिळेल असं फैसल म्हणतो. त्यामुळे पूर्वेकडच्या लोकांना कार्यालयातून धडपडत दुपारी चार-पाच वाजताच बाहेर पडावं लागणार नाही. लवकर अंधार न पडल्यामुळे विजेची बचतही होईल. 
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स बंगळुरूमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार भारतीय प्रमाणवेळ केवळ तीस मिनिटे पुढे केली तर विजेसाठी लागणाऱ्या चार हजार कोटींची बचत होऊ शकेल. अर्धा तास पुढे जाण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही हे सांगताना फैसल म्हणतो, डिमॉनेटायझेशन किंवा जीएसटीसारखा एक दिवस निवडायचा आणि रात्री घोषणा करून देशातल्या सर्वांनी एकाचवेळेस आपली घड्याळं अर्धा तास पुढं न्यायची. बास.. 
संगणकांमध्ये आणि घड्याळांमध्ये, मोबाइलमध्ये बदल केले की नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
 
पृथ्वीवर आपण नेमके कुठे आहोत?
पृथ्वीगोलावर आपण आपल्या सोयीसाठी काल्पनिक रेषांचे जाळे पसरवलेले आहे. या जाळ्याच्या आडव्या रेषांना म्हणतात अक्षवृत्ते (इंग्रजीत लॅटिट्यूडस) आणि उभ्या रेषांना म्हणतात रेखावृत्ते (लाँजिट्यूडस). विषुववृत्तापासून वरखाली दोन्ही बाजूस आडव्या नव्वद रेषा काढण्यात आल्या आहेत, तर ग्रीनविचमधून जाणाऱ्या रेखावृत्तापासून दोन्ही बाजूस १८० रेखावृत्ते म्हणजे एकूण ३६० उभ्या रेषा काढण्यात आल्या आहेत. (या सर्व रेषा काल्पनिक आहेत.) ग्रीनविचमधून जाणाऱ्या या रेखावृत्तास प्राइम मेरिडियन किंवा शून्य अंश रेखावृत्त असेही संबोधले जाते. जसे विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन गोलार्धांचे भाग होतात त्याप्रमाणे हे प्राइम मेरिडियन पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करतं. रेखावृत्ताचा उल्लेख करताना त्याचा नंबर आणि ते कोणत्या गोलार्धात आहे त्याचाही उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ पूर्व गोलार्धातील चाळीसाव्या रेखावृत्ताचा उल्लेख करायचा झाल्यास तो ४० अंश पूर्व असा केला जातो. याच धर्तीवर इतरांचा उल्लेख उदा. १५ अंश पश्चिम, ५५ अंश पूर्व असा करण्यात येतो.
 
काय आहे भारताची प्रमाणवेळ?
एका दिवसामध्ये २४ तास आणि २४ तासांची दिवसभरात एकूण मिनिटे होतात १४४०. या १४४० मिनिटांना एकूण ३६० रेखावृत्तांनी विभागले तर प्रत्येक रेखावृत्तामध्ये ४ मिनिटांचे अंतर असल्याचे लक्षात येईल. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर ० रेखावृत्तावर दुपारचे १२ वाजले असतील तर १ अंश रेखावृत्तावर १२ वाजून ४ मिनिटे झालेली असतात. अशी प्रत्येक रेखावृत्तानुसार चार मिनिटांची वाढ होत जाते. प्रत्येक देशाने आपल्या भूभागावरून जाणाऱ्या सर्वात सोयीच्या रेखावृत्तावर आपापली प्रमाणवेळ ठरवलेली आहे. भारताच्या अलाहाबाद जिल्ह्यातील शंकरगडमधून जाणाऱ्या ८२.५ अंश या रेखावृत्ताची वेळ आपण प्रमाण मानतो. यानुसार आपले घड्याळ ग्रीनविचच्या प्रमाण रेखावृत्तापासून ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. याला इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं. ही वेळ १ जानेवारी १९०६ पासून वापरण्यास सुरुवात झाली. ग्रीनविचच्या वेळेला ग्रीनविच मिन टाइम असे म्हटले जाते किंवा थोडक्यात जीएमटी असे लघुरूप वापरले जाते. उदाहरणार्थ भारताची प्रमाणवेळ सांगायची झाल्यास ५.३० अवर्स अहेड आॅफ जीएमटी किंवा ५.३०+जीएमटी अशी सांगितली जाते.
 
तीन तीन प्रमाणवेळा वापरणारं शहर...
काय तीन तीन प्रमाणवेळा? त्याही एकाच शहरात.. इथे एका घड्याळानुसार आॅफिसला वेळेत जायची मारामार आणि तीन प्रमाणवेळांवर डोळा ठेवून कोण चालणार.. पण मुंबईमध्ये एकेकाळी एकाचवेळी तीन प्रमाणवेळा वापरल्या जात असत. नागरी इतिहासाचे अभ्यासक जीम मेसोलस १९६०च्या दशकामध्ये मुंबईमध्ये शिष्यवृत्ती घेऊन शिकायला आले. मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत एकाचवेळी तीन प्रमाणवेळा वापरल्या जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी यावर संशोधन केले. त्यांच्यानंतर नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूरमध्ये कार्यरत असणाऱ्या शेखर कृष्णन यांनी याचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासामध्ये मुंबईमधील लोकांनी मद्रास टाइमझोन किंवा रेल्वे टाइम झोन नावाने ओळखला जाणारा झोन वापरायला नकार दिला होता. एकतर त्यांच्या त्यावेळच्या घड्याळाच्या पुढे तीस मिनिटे ती वेळ होती आणि त्याला थोडा दोन प्रांतांमधील तणावही कारणीभूत होता. मद्रास प्रांताची वेळ आम्ही का वापरू अशी थोडीशी भावना त्यामध्ये होती. परंतु यामुळे रेल्वेची वेळ वेगळी आणि स्थानिक वेळ वेगळी झाली. दोन्ही वेळांमध्ये अर्ध्या तासाचे अंतर होते. म्हणजे एखादी रेल्वे दहा वाजता सुटणार असेल तर स्थानिक नागरिकांच्या घड्याळाप्रमाणे ती साडेनऊ वाजता सुटे. रेल्वे पकडताना हे गणित लोकांना नेहमीच लक्षात ठेवावे लागत असे. मुंबईचे १८८० ते १८८५ या काळात गव्हर्नर असणाऱ्या सर जेम्स फर्ग्युसन यांनाही त्याकाळात याचा फटका बसला होता. या वेळबदलामुळे त्यांनाही रेल्वे पकडणे शक्य झाले नव्हते. (पुण्याचे फर्ग्युसन कॉलेजचे नाव यांच्याच नावावरून आले आह.े) या दोन टाइम झोन्सच्या गोंधळात भर घातली ती पोर्ट सिग्नल टाइम झोनने. मुंबई हे व्यापारासाठी महत्त्वाचे शहर असल्यामुळे येथील बंदरालाही तितकेच मोठे स्थान होते. त्यामुळे बंदराला पोर्ट सिग्नल टाइम वापरावा लागे. शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागात तो वापरला जाई. 
कुलाबा आॅब्झर्वेटरीचे तज्ज्ञ नानाभॉय अर्देशिर फ्रेमजी मूस यांनी पोर्ट टाइम जीएमटीच्या पुढे पाच तास असा कायम केला होता. म्हणजे बॉम्बे टाइमनुसार घड्याळात बारा वाजले की त्याचवेळी रेल्वे टाइमचे साडेबारा वाजलेले असत, तर पोर्ट टाइमनुसार १२.९ मिनिटे झालेली असत. आता वाटतं ही पद्धती आज असती तर आॅफिसला उशिरा यायला आणखी एक कारण मिळालं असतं. उशीर झाल्यावर.. ओह.. सॉरी सर, मी चुकून दुसरी प्रमाण वेळ वापरली आणि ट्रेन चुकली, असं म्हणता आलं असतं...
 
(लेखक ऑनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत.)
(या लेखासाठी शेखर कृष्णन (सिंगापूर), डॉ. डी. एच. पवार (कोल्हापूर), फैसल फारुकी (मुंबई) यांनी मदत केली आहे.)
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com