सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
भाताचं भाडं आणि दोन शितं..
First Published: 08-July-2017 : 15:11:02
धनंजय जोशी
 
माझे झेन गुरू सान सा निम. एकदा ते माझ्याकडे असताना मी स्वयंपाक केला. जेवल्यानंतर मी भांडी घासायला घेतली. त्यांनी मला थांबवलं. भाताच्या भांड्यातभाताची मोजून दोन शितं होती. म्हणाले, ‘अजून भात आहे त्यात. डोंट वेस्ट इट!’ ती शितं मी उचलून खाल्ली. ते हसले आणि म्हणाले, ‘प्रत्येक गोष्ट विलक्षण लक्ष देऊन आणि अत्यंत दक्षतेनं करायला हवी!’ माझे तीन गुरू. त्यांच्याकडून किती शिकलो ते सांगणं कठीण आहे...
 
आयुष्यामध्ये आपल्याला अनेक गुरू भेटतात. आपल्या समोर उभे राहतात. सांगतात, ‘मी आहे’, पण आपण ओळखत नाही! माझ्या स्वत:च्या आयुष्यात प्रत्येक क्षण हा माझा गुरू बनला आहे. पण तरीही ह्या आठवणी..! 
अनेक वर्षांपूर्वी माझ्या अपार्टमेंटमध्ये मी शिकागो मेडिटेशन सेंटर चालवित असे. ते कसं जन्माला आलं ही खूप गमतीदार गोष्ट!
मी आणि माझे काही मित्र, कुणीतरी सांगितलं म्हणून एका झेन गुरूंचं भाषण ऐकायला गेलो होतो. आम्ही सहा जण! नेमके!
भाषण झाल्यानंतर ते झेन गुरू - सान सा निम - माझ्याकडे बघून म्हणाले, ‘यू विल स्टार्ट अ झेन सेंटर इन शिकागो!’
मी काय म्हणणार? 
म्हणालो, ‘ओके’.
घरी आलो.
दोन दिवसांनंतर कामावरून माझ्या अपार्टमेंटवर घरी आलो तर माझ्या दारासमोर बुद्धाचा एक सुंदर पुतळा... विचारतोय मला, येऊ की नाही आतमध्ये? 
शिकागो मेडिटेशन सेंटरचा जन्म झाला तो असा! 
त्याच्यानंतर सान सा निम अनेक वेळा माझ्याकडे राहून गेले.
*****
झेन ध्यानासाठी आम्हाला एका विशिष्ट प्रकारचे कपडे घालावे लागायचे (ग्रे कलर्ड रोब्स). 
माझ्या घराजवळ एक मॅकडोनाल्ड होतं! 
सान सा निम म्हणाले, ‘आपण जाऊ या तिथे!’ 
मी म्हणालो, ‘कपडे बदलायचे का?’ 
ते म्हणाले, ‘नॉट नेसेसरी, इफ युुअर सेंटर इज स्ट्राँग!’
म्हणजे काय?..
- तुमची श्रद्धा आणि तुमच्या साधनेवरील आत्मविश्वास जर शंभर टक्के असेल तर तुम्ही कुठलंही उत्तर ‘सहज’ देऊ शकाल! 
आम्ही गेलो मॅकडोनाल्डमध्ये! 
घेतल्या आपल्या फ्लाइंड आणि शेक्स! 
आणि खायच्या आधी आम्ही आमच्या प्रार्थनादेखील म्हटल्या... 
लोक बघत होते आमच्याकडे. पण आमचं ‘सेंटर’, आमचा ‘मूळबिंदू’ आमच्या मागे उभा होता. 
झेन साधनेमध्ये ‘कीआन’ म्हणजे एक कोडं, जे तुम्ही तुमच्या मनाच्या तात्त्विक विचारांना सोडूच शकला नसता! 
एका शिबिरामध्ये सान सा निम मला म्हणाले, ‘आय अ‍ॅम गोइंग टू शूट युअर वाइफ, अनटेल्स यू गिव्ह मी टू वर्ड्स! दोन शब्द!’
आता कल्पना करा! 
हे शिबिर एकवीस दिवस! 
रोज २० तास ध्यानामध्ये!
मी काय सांगणार? 
डोळ्यांमधून अश्रूंची धार! 
मी म्हणालो, ‘आय डोण्ट नो!’ ‘मला माहीत नाही!’ 
ते म्हणाले, ‘नॉट इनफ’! 
मी म्हणालो, ‘प्लीज शूट मी!’
सान सा निमनी आपला हात पुढे केला, माझा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाले, ‘यू हॅव ग्रेट लव्ह. इजण्ट इट! कीप इट!’ 
*****
सान सा निम यांच्याबरोबर राहणं हा एक वेगळाच अनुभव होता. 
एक इंग्रजी शब्द आहे ‘मेटिक्युलस’ म्हणून! त्याचा अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीची विलक्षण काळजी घेणे! सान सा निम स्वत: ‘विलक्षण काळजी’ने जीवन जगत होते. 
एकदा माझ्याकडे असताना मी स्वयंपाक केला होता : भात आणि कोरियन कोबीचा प्रकार ‘किम ची’! 
आम्ही जेवलो. जेवल्यानंतर मी भांडी घासायला घेतली. 
‘थांब!’ सान सा निम म्हणाले, ‘मला बघू दे!’ 
माझ्या हातातल्या भाताच्या भांड्यामध्ये बघून ते म्हणाले, ‘अजून भात आहे त्यात. डोंट वेस्ट इट!’ 
मी बघितलं!
- खरोखर एक कोपऱ्यात दोन - मोजून दोन -भाताची शितं होती. मी उचलून खाल्ली. ते हसले आणि म्हणाले, ‘यू मस्ट लिव्ह इन अ मेटिक्युलस वे! प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करायला हवी!’
त्यांच्याकडून किती शिकलो ते सांगणं कठीण आहे. प्रत्येक शिष्याचं मन त्यांना संपूर्ण समजत होतं! मला त्यांनी एका कोआनमध्ये माझ्या आयुष्याची दिशाच दाखवून दिली. 
अशाच एका शिबिरामध्ये मला त्यांनी विचारलं, ‘तू रोज जेवतोस ते कशासाठी?’ त्यांच्या हातात एक काठी असायची. चुकीचं उत्तर दिलं की काठीचा प्रसाद मिळायचा. काही बोललं नाही तरीपण प्रसाद मिळायचा आणि म्हणायचे, ‘आणखी साधना करायला पाहिजे!’
असेच पाच-सहा दिवस गेले, पण उत्तर सापडेना. सापडेना म्हणजे त्यांना आवडणारं! 
आमच्या डोळ्यात परत अश्रू!
माझा हात धरून म्हणाले, ‘तू मला विचार हाच प्रश्न!’ 
मी म्हणालो, ‘व्हाय डू यू इट एव्हरी डे? 
ते क्षणार्धात म्हणाले, ‘मी जेवतो ते तुझ्यासाठी. आय इट फॉर यू.’
माझ्या आयुष्यातला तो एक अमोल क्षण होता. 
माझ्या साधनेतलं मर्म समजावून देणारा. माझी साधना तेव्हापासून ‘माझी’ राहिली नाही - 
संपूर्ण इतरांसाठी होऊन गेली.
*****
आजान सोबिन माझे दुसरे गुरू! 
आता ८५ वर्षांचे. कॅन्सरची पीडा, वयोमानाची पीडा! आम्ही दोन वर्षांपूर्वी त्यांना भेटायला गेलो.
आम्ही शिकागोमध्ये, ते डेनव्हरमध्ये! 
दोन दिवसांचा गाडीमध्ये प्रवास. असो!
आम्ही भेटलो!
माझ्या एका मित्रानं प्रश्न विचारला, ‘आजान, आपण आता भेटलो आहोत. ही कदाचित आपली शेवटची भेट! व्हॉट वुड यू लाइक टू टेल अस्?’
आणि ते म्हणाले, ‘नो बिग डील. जस्ट फोकस आॅन द मोमेंट.’
माझं भाग्य!
*****
सान सा निम जितके कडक - काठीचा प्रसाद देणारे - तितकेच आजान सोबिन एखाद्या फुलासारखे कोमल! त्यांच्या शिबिराची पद्धत वेगळी! ध्यान-साधना तेवढीच - रोज वीस तास तरी! 
पण दररोज संध्याकाळी मला जवळ घेऊन बसायचे. जे जे माझ्या मनाचे खेळ चालू असायचे त्यांच्या मागचा सूक्ष्म अर्थ समजावून सांगायचे. 
- ‘तुझं कर्तव्य फक्त साधना करण्याचं! बस्, फक्त तेवढंच! बाकी काही अपेक्षा नाही करायची!’ 
ते मला नेहमी सांगायचे, ‘फोकस अ‍ॅण्ड फरगेट इट!’
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या पहिल्या गुरूंची - कोल्हापूरचे बापू महाराज यांची आठवण येते. 
बापू महाराज मला शिकवून गेले मौन-साधना! शब्दापलीकडच्या साधनेचा वर मला त्यांच्याकडून मिळाला. 
‘कोण तुजसम सांग मज गुरुराया?’ 
- हा माझा प्रश्न माझ्या तिन्ही गुरूंना!
 
(लेखक अमेरिकेतील शिकागोस्थित झेन साधक आहेत.)
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com