सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
काव्याग्रह
First Published: 08-July-2017 : 15:07:51
विष्णू जोशी
 
संवाद - सोनाली नवांगुळ
 
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा. वाशिममधील रिसोडा तालुक्यातील नेतन्सासारखं अडीचतीन हजार उंबऱ्यांंचं गाव. उनाडक्या करत हिंडतो म्हणून आठवीत असताना त्याला बहिणीकडे बुलढाण्याला शिकायला पाठवलं. तिथे त्याला सापडलं एक वाचनालय आणि कविता.. मग तो वाचतच सुटला. चांगल्या कवितांना व्यासपीठ नाही म्हणून अस्वस्थही झाला. शिक्षण सोडून दिलं आणि एका अनियतकालिकाची तयारी सुरू केली. त्यावेळी त्याच्या खिशात भांडवल होतं तब्बल दहा रुपये!
 
विष्णू जोशी नावाच्या एका भणंग तरुणाला कवितेनं झपाटलं आणि ‘काव्याग्रह’ सारख्या अनियतकालिकाचा जन्म झाला. २०१० पासून मराठीतले साहित्यविषयक दर्जेदार व आशयसंपन्न नऊ अंक त्यानं संपादित केले, ते महाराष्ट्रभर पोहोचवले, वैदर्भिय सांस्कृतिक विश्वाची प्रतिष्ठाही त्यानं वाढवली. आता ‘काव्याग्रह’चा पहिला इंग्रजी अंक येऊ घातलाय. हिंदीही लवकरच पाऊल टाकणार आहे. ‘काव्याग्रह’च्या या आजवरच्या प्रवासाविषयी विष्णू जोशी यांच्याशी गप्पा.
 
गावात उपद्व्याप करतो म्हणून आठवीच्या पुढे तुम्हाला शिकायलाही बहिणीकडे पाठवलं गेलं. मग कविता आली कशी?
आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. एक मोठा भाऊ व चार बहिणी. गाव फार सुंदर, टुमदार. भजन, कीर्तन, सप्ते, जागर अशात सगळ्यात गुरफटलेलं. वडिलांना संतसाहित्याची आवड. सतत कानावर अभंग पडायचे. ती लय सतत मनात असायची, पण मन सतत उनाडक्यात रमलेलं. क्रिकेटसाठी घर सोडून जाणाऱ्या मुलाची घरच्यांना काळजी वाटत राहणं साहजिक होतं. आठवीपासून बुलढाण्यातल्या मही गावात बहिणीकडे राहायला गेलो तेव्हा तिथं वाचनालय सापडलं. अभंगांची लय अंगात मुरल्यामुळं पाठ्यपुस्तकातील कवितांमध्ये खूप रस आला होता. वाचनालयात त्यापलीकडच्या कविता सापडल्या. माझं बाह्यवाचनच तिथपासून सुरू झालं. लेखक, कवी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण वाटू लागलं. बारावीत इंग्रजी विषय गेला. त्यानंतर खूपच न्यूनगंड आला की आपण कसल्याच कामाचे नाही काय! प्रत्येकाकडे काहीतरी ‘वेगळं’ असतं तसं आपल्याकडे काय तर ‘कविता’ व तिच्यासाठी काही करायची ऊर्मी असंच वाटलं. आपण याच क्षेत्रात काही केलं तर न्यूनगंड जाईल असं वाटलं. पुढे इंग्रजी विषय सोडवून कला शाखेसाठी वाशिमला रूम करून राहिलो. तिथंही ‘राजवा काटक’ सारखं शतकोत्तरी वाचनालय मिळालं. मी अधाश्यासारखं वाचत सुटलो. खरंतर त्यासाठीच मी शिक्षणाचा बहाणा केला होता. त्यावेळी नारायण सुर्वेंचा काव्यसंग्रह वाचून भारावून, अस्वस्थ होऊन त्यांना पत्र लिहिलं. त्यांचं चक्क उत्तर आलं.. ‘इतर भाषांतल्याही कविता वाचा. शिक्षणाकडे लक्ष द्या.’ माझा उत्साह वाढला. दरम्यान मी कविताही करू लागलो. लेखक-कवीमंडळींशी संवादपूल तयार होत होता. कवी नारायण कुलकर्णी कवठेकरांशी संपर्क झाल्यावर त्यांनी ‘आवर्जून वाच’ म्हणून पुस्तकांची यादी दिली. सगळं वाचलं. माझी ओढ बघून त्यांनी एम.ए. करण्यासाठी मला अकोल्याला बोलावून घेतलं. त्यांच्या घराचंच नाव ‘किताब’. तिथं मला अक्षरश: साहित्याच्या स्वर्गात पोहोचल्यासारखं झालं. खूप लेखकमंडळींशी त्यांच्यामुळं परिचय झाला. ही वाट अवघड आहे असं कळत होतं, पण आवाकाही वाढत होता. महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये माझ्या कविता छापून येत होत्या. तिथून बी.एड. करण्यासाठी यवतमाळला परतलो. प्रगतीही चांगली होत होती. पण मी इतका पॅशनेट झालो.. वाटलं की आपल्या आसपास अस्सल अनुभव सांगणारे वेगळ्या वाटेचे कितीतरी कवी आहेत, यांच्या कवितांना मुख्य प्रवाहात जागा कुठेय? आपणच ते व्यासपीठ का निर्माण करू नये? मित्रमंडळींशी बोललो. शिक्षण सोडून दिलं नि संपूर्णपणे मुद्रित माध्यमात उतरायचं ठरवलं. गावी परतलो. खिशातल्या दहा रुपयांच्या भांडवलावर अनियतकालिकाची तयारी सुरू केली.
 
मग?
बीएड करून एकमार्गी नोकरी करेल अशा आशेत असलेले घरचे व नातेवाईक माझ्या कसलाच आर्थिक भरवसा नसलेल्या साहित्यक्षेत्रात यायच्या निर्णयानं गडबडले. त्यांना भयंकर मनस्ताप झाला. मला ठाऊक होतं की वाट खडतर आहे. पण अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांत व अनियतकालिकांत जे प्रयोग होत नाहीत असं वाटतं, ते आपण करायचे. अनेक कवी असे आहेत ज्यांच्या कवितांमधला आशय अफाट आहे, पण त्यांना वाटतं की आपल्या कवितेला मान्यवर अंकांमध्ये जागा नाही. ती जागा आपण द्यायची. ‘काव्याग्रह’ नाव गांधीजींच्या ‘सत्याग्रह’वरून सुचलं. पहिल्या अंकासाठी माझ्या मनात पंधरा कवींची नावं होती. संपर्क केला. आग्रह हाच की नवी कविता हवी. त्यावेळी कळलं की कविता मागितली नि मिळाली असं नसतं. संयमाचा मोठा धडा शिकलो आणि वर्षभरानंतर पहिल्या अंकाच्या १००० प्रती २०१० ला स्वत:च्या हातानं पत्ते लिहून सगळ्यांना रवाना केल्या. मोठं बळ आलं यानं. या चोखंदळपणे काढलेल्या अंकाला मोठमोठ्या साहित्यिकांची दाद मिळाली. व्यावहारिक जगात मूर्ख व दुय्यम ठरलो, तरी साहित्यिकांच्या व्यासपीठावर नोंद होण्यानं चांगली कविता जगण्यासाठी बळ देते यावरचा विश्वास वाढला. वाशिमसारख्या मागास ठिकाणाहून असा व्याप सांभाळताना डी.टी.पी., पेज कंपोजिंग, कव्हर प्रिंटिंगपासून प्रचंड अडचणी आल्या. कारण इथं तसं वातावरण व सोयी नाहीत. प्रतिकूलतेतून जिद्द वाढत गेली. तशी मित्रमंडळी, मार्गदर्शक धावून आले, सक्रिय झाले. ‘काव्याग्रह’च्या प्रवासात कवितेची काळजी माझ्यासह अनेकजण वाहू लागले. दरम्यान, आणखी पुढं जाऊ म्हणून मी वाशिममध्ये पुस्तकाचं दुकान काढण्याचाही प्रयोग केला व ढीगभर कर्ज झालं. तेव्हा साहित्यविषयक एकाच गोष्टीत ‘बुडावे’ व एकाग्रपणे पुढे जावे हे निश्चित केले.
 
आता?
‘काव्याग्रह’ विशिष्ट विचाराला वाहिलेला नाही, स्वागतशील आहे, म्हणून चाकोरीबाहेरचे प्रयोग इथे होऊ शकतात. यासाठी महत्त्वाचे खूप ज्येष्ठ व नवी लेखक, कवी, चित्रकार मंडळी सतत झटताहेत. म्हणूनच संपादन क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीबद्दल ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा २०१७ चा कै. आशा प्र. संत पुरस्कार आम्हाला मिळाला. अतिशय गंभीर व महत्त्वाचा मजकूर आत्मीय संबंधातून कविलेखक सातत्याने विनामोबदला ‘काव्याग्रह’साठी देताहेत, कारण अत्यंत अव्यावसायिक हेतूनं हे काम होतं आहे. अनियतकालिकाखेरीज आता ‘काव्याग्रह प्रकाशना’ कडून आठ पुस्तकं प्रकाशित झालीत. त्यातीलच ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या विनायक येवलेंच्या काव्यसंग्रहाला बहिणाबाई राज्य पुरस्कार लाभला. इतरही पुस्तकांना अतिशय मानाचे सन्मान लाभले आहेत. मराठीमध्ये सातत्याने दर्जेदार लिहिणारी जी कविलेखक मंडळी आहेत त्यांचं लेखन इतर कुठल्याही भाषेतील कविलेखकांपेक्षा दर्जाच्या बाबतीत तसूभरही कमी नाही. मराठीत उत्तम लिहिलं जातं पण ते इतर भाषांमध्ये कमी पोहोचतं. सांस्कृतिक आवक आहे, पण जावक कमीय. हा सांस्कृतिक व्यवहार एकतर्फी उरू नये यासाठी आपला प्रयत्न म्हणून इंग्रजी व हिंदी अंकाला पर्याय नव्हता. इंग्रजी अंक आता वितरणासाठी तयार आहे. हिंदी येतोय. यातून काहीतरी चांगलं घडेल हा आशावाद प्रखर आहे. कवितेइतकं व कवितेशिवाय श्वासाला रसद पुरवणारं काही नाही हे भाबडेपणाचं वाटू शकेल, पण सातत्य, दर्जा व असोशी यामुळं हा प्रवास आम्हा सगळ्यांनाच प्रगल्भ करत चाललाय. नव्या अस्वस्थ शतकाची नोंद कवितेतून अधिकाधिक हाती लागते आहे...
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com