सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
तात्पुरती आणि तात्कालिक
First Published: 01-July-2017 : 15:51:17
Last Updated at: 01-July-2017 : 15:58:05

 - विश्वंभर चौधरी, 

‘नॉट इन माय नेम’ नावाची समाजमाध्यमंप्रणीत चळवळ सध्या गाजते आहे. यापूर्वीही अशा चळवळी झाल्या. अशा चळवळींचा वेग मोठा असतो आणि प्रसार क्षितिजीय रेषेत अतिजलद होतो. कधी एका व्यक्तीपासून सुरू झालेली ही चळवळ गटागटांत जाते, कधी सामूहिक होते. मात्र तिला रचनात्मक असं एक स्वरूप नसतं. आजच्या काळाशी सुसंगत अशी तंत्रसाधनं हाताशी असल्यानं हे आंदोलन किंवा चळवळ सुरुवातीला एका व्यक्तीपुरतीही असू शकतात किंवा त्यातून काही गट, काही समूह आकार घेतात. 

गांधीजींच्या सत्याग्रहाशी नातं सांगणारं हे आजच्या काळातलं चळवळींचं बदलतं स्वरूप आहे असं फार तर म्हणता येईल. पण सत्याग्रहाला आणि सत्याग्रहींना जे नैतिक अधिष्ठान लागतं, सत्याच्या जवळ जाणारी जी भूमिका आवश्यक असते ती इथं असतेच असं नाही. किंवा असेलच असं नाही.

- पण एक नक्की! या साधनांमुळे आंदोलनांचं आणि लोकचळवळींचं स्वरूप बदलत चाललं आहे. आंदोलनकर्ताही बदलतो आहे. त्याचं स्वरूपही बदलताना दिसतं आहे. एकेकाळची ‘कॉम्रेडशिप’ ही आता अशी वेगळ्या आकृतिबंधात दिसते आहे. अर्थात त्यात तशी विचारधारा असणार नाही. प्रासंगिक घटनांवरची, प्रसंगावरची प्रतिक्रिया असंच त्यांचं आजचं तरी स्वरूप आहे. कधी या प्रतिक्रिया व्यक्तिगत असतात. कधी सामूहिक असतात.

निर्भया प्रकरणात समाजमाध्यमांत जो आक्रोश दिसला त्याचा दबाव व्यवस्थेवर आला. तथापि, कायद्यात बदल हा व्यवस्थात्मक पातळीवर झाला. संघटनात्मक स्वरूप आणि काम हे या चळवळींकडून आकाराला येईल, अशी अपेक्षा सध्या तरी फोल आहे. 

या आंदोलनांना नेते नसतात, नेत्याची गरजही नसते. त्यांचा आकृतिबंध समाजमाध्यमांत तात्कालिक घटनाघडामोडींनुसार ठरत, घडत जातो. मात्र हे सारं दीर्घकाळ चालत नाही आणि म्हणून त्याला रचनात्मक असं काही स्वरूप येत नाही. पण या अशा चळवळींसंदर्भात मी पूर्णत: नकारात्मक आहे, असं मात्र नाही. 

गांधीहत्येनंतर विनोबा म्हणाले होते की, पायावर डोकं ठेवावं असे पाय आता राहिले नाहीत. पण निदान आपण सारे परस्परांचे हातात हात घेऊन तरी पुढं जाण्याचा प्रयत्न करू. विनोबांच्या गणनेतृत्वाची ती कल्पना होती. मात्र या चळवळींना ते गणनेतृत्व म्हणायचं धाडस मी करणार नाही, कारण त्यासाठी आंदोलनकर्त्यांकडे जे नैतिक अधिष्ठान पाहिजे ते या चळवळींत, आंदोलनात, आंदोलनकर्त्यांत आहे का? - या प्रश्नाला सध्यातरी उत्तर नाही.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com