मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
NEVER SAY NEVER
First Published: 13-May-2017 : 19:16:34
Last Updated at: 13-May-2017 : 19:20:48

 - डॉ. आशुतोष जावडेकर

जस्टीन बीबर हे इंडियाबरोबरच भारतातल्याही  तरुण पिढीच्या स्वप्नाचं नाव आहे! साध्याशा घरात जन्मून, यू-ट्यूबवर गाण्यांचे तुकडे टाकत, वरवर सरकत, जगप्रसिद्ध होऊन यश-कीर्ती- संपत्ती मिळवण्याच्या तरण्या स्वप्नांचं नाव! ते स्वप्न मलबार हिलच्या श्रीमंतीमध्ये घुसमटलेले काही अस्वस्थ तरुणही बघतात. आणि धारावी ते अंबरनाथ ते वाशिम ते बरेलीपर्यंतचे अनेक युवकही त्यांच्या हातातल्या छोट्या मोबाइलवर,  प्रीपेड बॅलन्सवर जस्टीनची गाणी बघताना मनात मागे तेच स्वप्न ठेवतात ! 

भारतीयांना संगीतकलेची ओढ आहे आणि नावीन्याचं वेडही आहे. खेरीज, काही प्रमाणात आपण व्यक्तिपूजक आहोतच ! मायकेल जॅक्सन ते जस्टीन बीबर व्हाया कोल्डप्ले या सगळ्यांच्या हे पथ्यावर पडत असावं. 

...हे माझ्यासमोर यू-ट्यूबवर जस्टीन बीबरच्या ताज्या, या बुधवारी नवी मुंबईमध्ये झालेल्या मैफलीचे हे ढिगाने व्हिडीओ पडले आहेत. चुकलो... मैफल नव्हे, कॉन्सर्ट. तोच शब्द त्या चकचकाटाला योग्य. 

हे पाहिलंत भलं मोठं व्यासपीठ..? त्यावरचे हे खणखणीत एलईडीचे रंगीत दिवे? आणि हा मागे भव्य पडदा; लेजर बीम्स, हा रॅम्प...? पण हे सगळं आता हळूहळू आपल्या भारतीयांच्या सरावाचं दृश्य झालंय नाही? 

जस्टीन बीबरला त्याचा असा काही अंदाज होता का? तो गातोय त्याच्या टिनेजर उत्साहात. तो गातोय त्याची नेहमीची हिट गाणी. समोरची पौगंडावस्थेमधली पोरं-पोरी एकच चित्कार करताहेत. तो शर्ट न घालता केवळ लो-वेस्ट पँटवर येतो स्टेजवर आणि कृत्रिम पावसात भिजतो तेव्हा तो चित्कार वाढतो हेही बोलकं आहे. या नव्या पिढीची शरीराची जाणीव मोकळी आहे त्याचं ते एक निदर्शक आहे.

... पण काहीतरी ‘मिसिंग’ आहे. 

मी हे सगळे व्हिडीओ बघतो आहे आणि मला वाटतंय की यामधलं चैतन्यच झाकलं गेलं आहे. मला जस्टीनची गाणी काही परकी नाहीत आणि त्याची गाणी मला आवडतातदेखील. पण इथे मजा येत नाहीये यार! मग वाटतंय, आपण मैफलीत हजर नसल्याने तसं वाटत असावं, तर मागून हे टिष्ट्वटरचे बीबर-टीकेने युक्त बाण भारतीयांनी सोडलेले दिसताहेत. 

भारतभरातून युवक मुंबईत या शोसाठी खास आले होते. पाच हजार ते पासष्ट हजार अशी तिकिटांची किंमत होती. काही मुलं घरी भांडून, साठवलेला पॉकेटमनी खर्च करत मुंबईत आलेली. काहींना त्यांचे पालकच घेऊन आलेले. (हीे भारतीय पालकांची मुलांवर लक्ष ठेवायची नवी युक्ती - आपणच मुलांसोबत टिनेजर कॉन्सर्टला जायचं!) पण त्या साऱ्यांची काहीशी निराशा झालेली मला दिसते आहे. 

एक जण म्हणतोय, ‘जस्टीन, तुला लिप-सिंक करून गाताना बघायला आणि तेही वाईट घरच्या कपड्यात बघायला लोकांनी पन्नास हजाराची तिकिटं काढली नव्हती.’ 

एक जण म्हणतोय, ‘माझ्या बायकोनं पटकन टिपलं की जस्टीन पाणी पीत असतानाही मागे त्याचा गाता आवाज चालूच राहिला.’ 

तिकडे बिपाशा बसू तिच्या गाडीला व्हीआयपी पास न मिळाल्याने रागवून परत फिरली असं कळतंय. आणि जस्टीनची वाट बघत बसलेले ते सारे उत्साही बॉलिवूडकर? रोहित बालने खास त्याच्यासाठी बनवलेलं खादीचं जॅकीट? रिधीमा कपूरचे दागिने? -त्यांचीही निराशा झालेली दिसते आहे. जस्टीनने तर ते खादीचं जाकीट घातलंही नाही. त्यानं साधा टी-शर्ट डकवला आणि गुडघ्यापर्यंत येणारी शॉर्ट्स घातली. 

... हे मी का सांगतोय? त्याच्या गाण्याऐवजी दिसण्यावर का बोलतो आहे? कारण आता संगीत ही केवळ ऐकायची नव्हे, बघायची गोष्ट झाली आहे. संगीतकलेत दृश्यात्मकता अनुस्यूत होतीच कायम, ती आता अधोरेखित झालीय. गायक हा केवळ गायक नसतो; एंटरटेनर असतो. जस्टीन हा खरं चांगला एंटरटेनर आहे. पण, जागतिकीकरणाचं मस्त वारं पिऊन सुपरस्मार्ट झालेल्या या नव्या भारतीय टिनेजर मंडळींना त्याने नीट ओळखलं नसणार असं मात्र नक्की वाटतं आहे. लिप-सिंकचे आरोप अनेकांवर होतात. अजय-अतुुल ते मडोना सगळ्यांवर. अनेक गायक खरंच लिप-सिंक करतात; पण सेलेना गोमेझ किंवा एद शिरान या टिनेजर्समधे प्रसिद्ध असलेल्या गायकांमध्ये अगदी लिप-सिंक गृहीत धरूनही जे चैतन्य असतं ते मला तरी या जस्टीनच्या कॉन्सर्टच्या यू-ट्यूबवरच्या ढिगानं पडलेल्या व्हिडीओमध्ये आढळत नाहीये.

पण असं असतं नाही? फसते कधी कधी एखादी मैफल. त्याच्या चाहत्यांनीही त्याला आता माफ केलं असावं. कारण जस्टीन हा काही केवळ ‘एंटरटेनर’ नव्हे; तो उत्तम गायक मुळात आहेच. तो खोलीत बसून बंद दाराआड गात असेल तरी त्याचा आवाज ऐकून बाहेरून जाणाऱ्यांची पावलं थबकतील. त्याची ती अर्ध्या कच्च्या, अर्ध्या पक्क्या वयातली गाणी, त्या गाण्यांमधलं ते तरल पौगंडावस्थेतलं संवेदन, त्याचा तो नाजूक, किनरा आवाज, गाण्यामधल्या अवघड तरी भुरळ घालणाऱ्या सांगीतिक जागा, त्याचा तो फ्रेंच कॅनडीयन अभिजातपणा आणि त्यानं त्या अभिजाततेला बुद्ध्याच जोडत नेलेला कृष्णवर्णीय बंडखोर संगीताचा - हिपहॉप, आर अँड बीचा - हलका पदर! 

जर एखाद्या मुलाकडे पंचविशीच्या आत अनेक स्तरांवरचं यश प्राप्त करण्याची कुवत असेल तर तो हुशार असणारच, प्रतिभेचा धनीही असणार. त्याच्या मार्केटिंग टीम्स पक्क्या आहेत हे झालंच; पण मुदलात तो पक्का आहे. 

पॅटी मॅलेट या घटस्फोटित, हुशार आईचा तो मुलगा. आणि आजचं हे त्याचं घवघवीत यश. ते बघून मग अनेकांना प्रश्न पडतो, ‘या - या जस्टीन बीबरचं करायचं तरी काय?’ 

मग जगभरची माध्यमं कधी म्हणतात त्याला डोक्यावर घेऊ, कधी म्हणतात, त्याच्यामागे पाप्पाराझी पत्रकार लावू आणि त्याचे खासगी फोटो छापू. अमेरिकेतही जॅझसारखा अभिजात संगीतप्रकार ऐकणाऱ्यांना वाटतं की या जस्टीन आणि तत्सम उथळ टिनेजर गायकांचं गाणं बंदच करायला हवं. संगीताचं किती एकंदर नुकसान होतंय. 

...पण जनमानसाच्या धडधडत्या नाडीवर बोट ठेवून असणाऱ्या बड्याबड्या कॉर्पोरेट्सना नीट माहितीय की या जस्टीनचं काय करायचं! त्याला कित्येक डॉलर्स द्यायचे आणि आपल्या जाहिरातीमध्ये आणून नाचवायचं! त्याच्या जगभरच्या आंधळ्या भक्तांना वाटतंय की या जस्टीनच्या इतके प्रेमात पडलो आहोत आपण यार! याला आपण डोक्यावर घ्यायचं!

पण मला बघायचं आहे की आपल्या भारतीय चाहत्यांना काय वाटतंय या सगळ्याप्रती? का ते चाहते होताहेत जस्टीनचे? एक तर ही नवी पिढी ‘ग्लोबल’ आहे. त्यांना कट्यारची गाणी आवडतात आणि जस्टीनही आवडतो. तो जेव्हा म्हणतो, ‘बेबी फिक्स मी, अँड यू शेक मी’ तेव्हा या नव्या भारतीय युवकांचं जे मोकळं मन आणि शरीर आहे त्याला तो साद घालत असतो. किंवा तो म्हणतो, 

Thinking my journey's come to end sending out a farewell to my friend... Forever peace (सारे प्रवास सरत आहेत, सवंगड्यांचे निरोप घेतलेत. शाश्वत अशी शांती मला मिळवून आता देशील का?)

तेव्हा या सुपरस्मार्ट पण तरी रिलेशनशिप या विषयात गोंधळलेल्या आपल्या मुलांना वाटतं की अरे, हा जस्टीन आपलीच भाषा बोलतो आहे! आणि मग आवडतो तो त्यांना.

पण त्याहून मोलाचं हे आहे की जस्टीन बीबर हे या पिढीच्या स्वप्नाचं नाव आहे! 

साध्याशा घरात जन्मून, यू-ट्यूबवर गाण्यांचे तुकडे टाकत, वर वर सरकत, जगप्रसिद्ध होऊन यश-कीर्ती-संपत्ती मिळवण्याच्या त्या तरण्या स्वप्नांचं नाव! ते स्वप्न मलबार हिलच्या श्रीमंतीमध्ये घुसमटलेले काही अस्वस्थ तरुणही बघतात. आणि धारावी ते अंबरनाथ ते वाशिम ते बरेलीपर्यंतचे अनेक युवकही त्यांच्या हातातल्या छोट्या मोबाइलवर, प्रीपेड बॅलन्सवर जस्टीनची गाणी बघताना मनात मागे तेच स्वप्न ठेवतात ! 

तो गातो 'Never say never' - ‘नाही’ असं म्हणूच नका - 

आणि मग ही नवी ग्लोबल भारतीय पिढी एकसुरात मान हलवते. त्या जस्टीनचा शो पाहायला मुंबईत धावते, पैसे खर्च करते. आवडला नाही शो की टिष्ट्वटरवर व्यक्त होते, फेसबुकवर फोटो टाकते. पण त्याचवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून आलेले देशाच्या कानाकोपऱ्यातले युवक मुंबई बघतात! त्या गावचं चैतन्य न्याहाळतात. रिकामे जात नाहीत ते पुन्हा त्यांच्या छोट्या गावात. प्रगतीची ओंजळभर स्वप्नं घेऊन जातात. 

‘या जस्टीन बीबरचं काय करायच?’ - हा प्रश्न आपल्या या इंडिया आणि भारतातल्या पोरांनी सहज सोडवला आहे. ती पिढी प्रॅक्टीकल आहेच. 

- ती जणू म्हणतेय की हे जस्टीन नावाचं लोभस स्वप्न बघायचं, ऊर्जा मिळवायची आणि मग - आपल्या आपल्या कामाला लागायचं!

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com