मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> मंथन >> स्टोरी
करकोच्यांचं गाव..
First Published: 04-March-2017 : 15:46:21
Last Updated at: 04-March-2017 : 15:54:17

- अझहर शेख

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील

‘खिचन’ नावाचं गाव.

हिवाळी पर्यटनासाठी दरवर्षी

हजारो किलोमीटरचा प्रवास करून

लाखोंच्या संख्येनं करकोचे 

येथे दाखल होतात.

चार महिने गावकऱ्यांचा

प्रेमळ पाहुणचार घेतल्यानंतर

ते पुन्हा आता मायदेशी परतताहेत..

भारताची मरुभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राजस्थान इतरही अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. तिथल्या निसर्गसौंदर्याचं आकर्षण तर जगभरातल्या पर्यटकांना आहेच, पण देशोदेशीच्या पक्ष्यांचंही ते माहेरघर आहे. नागौर जिल्ह्याच्या पालीजवळील ‘खिचन’ गावात करकरा जातीच्या हजारो पक्ष्यांचं संमेलन ही दरवर्षीची एक अनोखी पर्वणी. 

‘डेमोसिल क्रेन’. हिंदीत त्यांना कुरजा आणि मराठीत करकरा किंवा करकोचा म्हटले जाते. या स्थलांतरित विदेशी पक्ष्याचा अधिवास मुख्यत्वे मंगोलिया, चीन, सायबेरिया यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक आहे. 

इराण, अफगाणिस्तानमार्गे हजारो किलोमीटरचा प्रवास करून हिवाळी पर्यटनासाठी हे पाहुणे लाखोंच्या संख्येने राजस्थानमधील खिचन गावी मुक्कामी येतात. खरे तर हे छोटेसे खेडेगाव, पण त्याला खरी ओळख दिली आहे ती या परदेशी पाहुण्यांनी. दरवर्षी लाखोंच्या संख्येने ते खिचन येथे दाखल होतात. 

या पक्ष्यांचं आणि गावकऱ्यांचं जणू मैत्रच जुळलं आहे. दोघांनाही एकमेकांचा खूपच लळा. सूर्योदय होताच खिचन गावात करकरा जातीच्या पक्ष्यांचे थवे आकाशात दिसू लागतात. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी चक्क ‘रेस्टॉरंट’च उभारलं आहे. भरवस्तीत मोकळ्या भूखंडावर चोहोबाजूंनी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हेच ते रेस्टॉरंट. गावातील पक्षिप्रेमी सेवाराम व त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांच्यासाठी खाद्य उपलब्ध करून देतात. तब्बल चार महिने गावकरी मनापासून त्यांची सरबराई करतात.

गावकऱ्यांची पहाट उजाडते तीच या पक्ष्यांच्या आगमनाने. सकाळी आठ वाजेपर्यंत येथील ‘रेस्टॉरंट’ हजारो पक्ष्यांनी ‘हाउसफुल्ल’ झालेलं असतं. पक्षिमित्र सेवाराम व त्यांचे सहकारी आलेल्या पर्यटकांना ‘रेस्टॉरंट’ला लागून असलेल्या त्यांच्या घरांच्या छतावर घेऊन जातात. पर्यटक तेथूनच या पक्ष्यांच्या मनमोहक लीला न्याहाळतात. 

बारा वाजेपर्यंत पक्षी या रेस्टॉरंटमध्ये भरपेट भोजन करतात आणि जवळच काही मीटर अंतरावर असलेल्या तलावाजवळ तहान भागविण्यासाठी उड्डाण करतात. सूर्यास्तापर्यंत पक्ष्यांचा थवा तलावाकाठी मुक्कामी असतो. खिचन गावात या पक्ष्यांची संख्या सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे बीकानेर, फलोदी, पचपदरा व शिवक्षेत्र या भागातदेखील करकरा पक्ष्यांचे थवे मनमुक्त फिरत असतात. 

साधारणपणे फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला हे पाहुणे परतीच्या प्रवासासाठी उड्डाण करतात. गावकऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे दरवर्षी पाहुण्यांची संख्या वाढतेच आहे. २०१० साली खिचनमध्ये सुमारे १५ हजार पक्षी दाखल झाले होते. २०१५ मध्ये हीच संख्या २४ हजारापर्यंत गेली. यंदाही ही संख्या खूपच मोठी आहे. 

स्थानिक नागरिकच पक्ष्यांची काळजी घेतात. सरकारी स्तरावरून यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत याबद्दल मात्र सेवाराम आणि पक्षिप्रेमी गावकऱ्यांच्या मनात मोठी खंत आहे. पर्यटनस्थळ म्हणूनही खिचनला मोठा वाव आहे, मात्र त्यादृष्टीने फारसे प्रयत्न झालेले नाहीत. पक्ष्यांवर औषधोपचारासाठी पुरेशी व्यवस्था नाही, रेस्क्यू सेंटर नाही. पक्ष्यांची संख्या जशीजशी वाढत जाते तसे खाद्याचे प्रमाणही वाढते. दरदिवशी सुमारे तीन क्विंटलपर्यंत खाद्य पक्ष्यांना लागते. रेस्टॉरंटजवळून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरताहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात, त्यांच्या माध्यमातून काही निधी उभा राहू शकतो, मात्र सोयीसुविधा नसल्याने पर्यटक लगेच परत जातात. पक्ष्यांवरील प्रेमापोटी सध्या तरी पक्षिप्रेमी गावकरीच साऱ्या समस्यांवर स्वत:च मात करताहेत. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांना साथ हवीय ती समर्थ हातांची आणि आर्थिक पाठबळाची. पण असे असले तरी या पाहुण्यांची खातरजमा करण्यात त्यांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. त्यामुळेच गावकऱ्यांच्या प्रेमाचा पाहुणचार घेऊन दरवर्षी अधिक मोठ्या संख्येनं हे पाहुणे परत हक्कानं आपल्या यजमान मित्राकडे येतात. गावकऱ्यांनीही पुढच्या वर्षीचं निमंत्रण आताच देऊन ठेवल्यानंतर काही पाहुण्यांनी जड अंत:करणानं पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे, तर गावकऱ्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे काही पाहुणे अजून थोडे रेंगाळले आहेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com