सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मनोरंजन >> स्टोरी
‘अपघातानेच मी अभिनयक्षेत्रात आले’
First Published: 17-July-2017 : 00:52:35

‘आँखे’, ‘हम सब चोर है’, ‘आर या पार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली रितू शिवपुरी एका मालिकेत काम करणार आहे. या मालिकेतील तिची भूमिका तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेविषयी आणि आजवरच्या तिच्या प्रवासाविषयी तिने मारलेल्या गप्पा...

रितू तुझी आई सुधा शिवपुरी आणि वडील ओम शिवपुरी हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्याकडून तुला अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्यांच्याप्रमाणेच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे तू सुरुवातीपासूनच ठरवले होतेस का?

- अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचे मी कधीच ठरवले नव्हते. अपघातानेच मी या क्षेत्रात आले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या आई-वडिलांसोबत एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लंच करत होते. त्यावेळी मला एका व्यक्तीने मॉडेलिंगसाठी विचारले. खरे तर त्या वेळात मी इंटेरिअर डिझाइनचा कोर्स करत होते. पण, तुला आवडत असेल तर तू नक्कीच मॉडेलिंग कर, असे माझ्या वडिलांनी मला सांगितले आणि मी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मॉडेलिंग क्षेत्रात आल्यावरही अभिनयाचा कधीच विचार केला नव्हता. मॉडेलिंग करत असतानाच ‘आँखे’ या चित्रपटाबद्दल मला विचारण्यात आले आणि या क्षेत्रातील माझा प्रवास सुरू झाला.

चित्रपटांमध्ये काम करत असताना तू अचानक अभिनय क्षेत्रापासून दूर गेलीस, याचे काही खास कारण आहे का?

- मी लग्न केल्यानंतर संसारात रमले होते. मुलं झाल्यानंतर तर माझा सगळा वेळ हा माझ्या कुटुंबीयांना आणि मुलांना दिला पाहिजे, असे मला वाटत होते. त्यामुळे मी अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिले. पण आता मुलं मोठी झाली आहेत, ती देखील त्यांच्या आयुष्यात बिझी आहेत. त्यामुळे मी पुन्हा या क्षेत्रात येण्याचा विचार केला. मी दरम्यानच्या काळात एका मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्येदेखील काम केले होते.

पण याच मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी माझ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण चंडिगडमध्ये सुरू होते. त्यामुळे या मालिकेला मला खूप कमी वेळ देता आला. पण तरीही माझ्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.

गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात किती बदल झाला आहे, असे तुला जाणवले?

- मी ज्यावेळी काम करत होते, तेव्हा हे क्षेत्र इतकं प्रोफेशनल नव्हतं. आजकाल प्रत्येक गोष्ट ही कागदावर लिहून घेतली जाते. त्या काळात सगळ्या गोष्टी या तोंडी असायच्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही वेळा तर आम्हाला चित्रपटाच्या पटकथेची केवळ एक लाइन सांगितली जात असे.

आमच्या भूमिकेविषयीदेखील आम्हाला तितकीशी कल्पना नसायची. पण आता तुमची भूमिका काय असणार, त्या भूमिकेला कशी वळणे दिली जाणार, हे सगळे सांगितले जाते.

मालिकेत तुझी भूमिका काय असणार आहे?

- या मालिकेतील माझ्या भूमिकेला अनेक शेड्स आहेत. मी या मालिकेत नायिकेच्या आईची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील माझा लुक खूपच ग्लॅमरस आहे. माझ्या भूमिकेचे नाव इंद्राणी असून घरातील सगळेच निर्णय मी घेते, असे दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील ही अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com