शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> मनोरंजन >> स्टोरी
प्रेमळ आई हरपली
First Published: 19-May-2017 : 02:30:46

रीमा लागू... सहज पण तितक्याच सशक्त अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी चतुरस्त्र अभिनेत्री. रंगभूमीसह मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवला. आयुष्याच्या रंगमंचावरून त्यांचं असं अचानक एक्झिट घेणं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेलं. रीमा यांच्या जीवनपटावर टाकलेला प्रकाश तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिलेली शब्दपुष्पांजली....

नाटक, चित्रपटांप्रमाणेच दूरचित्रवाणी माध्यमातून छोट्या पडद्यावरही रीमा लागू यांनी आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली. ‘तू तू मैं मैं’ या मालिकेतील भूमिकेने त्या घराघरांत पोहोचल्या. ‘श्रीमान श्रीमती’ या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. अभिनयाच्या क्षेत्रात रमणाऱ्या रीमा लागू यांनी ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन करून, दिग्दर्शनातही ठसा उमटवला.

रीमा लागू यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला. पूर्वाश्रमीच्या त्या नयन भडभडे. रंगभूमीचा वारसा

त्यांना आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून लाभला. लहानपणापासून घरातूनच अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या रीमा लागू

यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’

या नावाने त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. सुरुवातीला आवड म्हणून या क्षेत्राकडे पाहणाऱ्या रीमा लागू यांनी

पुढे कारकीर्दीसाठीही अभिनय हेच क्षेत्र निवडले. पुढे १९७०-८०च्या दशकात त्यांनीमराठी रंगभूमीवर प्रवेश केला. उत्तम संवादफेक, तसेच सजग अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटविला.

‘पुरुष’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘नातीगोती’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘एकदा पाहवं न करून’, ‘छापाकाटा’ यांसह गेल्यावर्षी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकांतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. नाट्य अभिनेते विवेक लागू, यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. त्यांची मुलगी मृण्मयी यादेखील अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. रीमा यांच्या चित्रपटातील प्रवेशाबाबत बोलायचे झाल्यास, ८०च्या दशकात ‘आक्रोश’, ‘कलयुग’ अशा चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपट प्रवासाला खऱ्या अर्थी सुरुवात झाली. हिंदी चित्रपटांत त्यांनी रंगवलेली प्रेमळ आई विशेष लोकप्रिय ठरली. ‘आई’च्या भूमिकेला ग्लॅमर मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांत त्यांनी साकारलेली आई प्रचंड गाजली. ‘रिहाई’ चित्रपटातील वेगळ्या वळणावरची त्यांची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ‘अनुमती’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची विशेष दखल घेण्यात

आली. ‘सिंहासन’, ‘अंतरपाट’, ‘आपली माणसं’, ‘जीवलगा’ अशा मराठी

चित्रपटांतही त्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका रंगवल्या.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com