सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
पंतप्रधान मोदींनी स्वत: जाऊन घेतली सोनिया गांधींची भेट
First Published: 17-July-2017 : 15:13:46
Last Updated at: 17-July-2017 : 15:23:35
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान लोकसभेत वेळेच्या आधी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: जाऊन विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनाही शुभेच्छा दिल्या. लोकसभेचं कामकाज सुरु होण्याच्या पाच मिनिटं आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. पोहोचताच विरोधी बाकावरील पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्यांची त्यांनी भेट घेत अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. 
 
सोनिया गांधीशिवाय ज्या नेत्यांची मोदींनी भेट घेतली त्यामध्ये माजी पंतप्रधान देवेगौडा, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव, कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांचा समावेश होता. 
 
बेताल गोरक्षकांवर सक्तीने बडगा उगारा; मोदींचा आदेश
राष्ट्रपतिपद निवडणूक - पंतप्रधान मोदींनी केले मतदान
 
पंतप्रधान मोदींनी देवेगौडा, मुलायम सिंग यादव, मल्लिकार्जुन खर्गे आणि थंबीदुराई यांना शेकहॅण्ड केलं. यावेळी मोदींनी मुलायम सिंग यादव, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बातचीतही केली. 
 
यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतीरादित्य सिंधिया मागील रांगेत बसले होते. त्यांनादेखील मोदींनी शुभेच्छा दिल्या. 
मोदींनी लोकसभेत प्रवेश करतात हात जोडून सर्व सदस्यांना नमस्कार केला. यावेळी लोकजनशक्ती पक्षाचे सदस्य रामचंद्र पासवान यांनी लांबूनच पाया पडत असल्याचे हावभाव दिले. मोदींनी प्रवेश करताच भाजपाचे सर्व सदस्य उभे राहिले होते. जोपर्यंत मोदी बसले नाहीत तोपर्यंत कोणीही आपल्या जागेवर बसलं नाही. 
 
याआधी मोदींनी पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय नेत्यांना देशाच्या हितासाठी एकत्र येत काम करण्याचं आवाहन केलं. तीन आठवडे चालणा-या या पावसाळी अधिवेशनात संसदेतील सर्व सदस्य देशहितासाठी दर्जेदार चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
'देश आपला राष्ट्रपती निवडणार असल्याने हे पावसाळी अधिवेशन खूप महत्वाचं असल्याचंही', मोदींनी मतदान करण्याआधी सांगितलं होतं. 'देशासाठी सर्व पक्ष एकत्रित आले तर आपण काय करु शकतो हे जीएसटीमुळे पुन्हा एकदा सिद्द झालं आहे', असंही मोदी यावेळी बोलले आहेत.
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com