‘गुन्हेगार’ संतांची दहशत

By admin | Published: November 24, 2014 04:20 AM2014-11-24T04:20:25+5:302014-11-24T04:20:25+5:30

श्रद्धा नेहमीच अंध असते, असे मानले जाते. पण, एखाद्या अंध व्यक्तीला जाणूनबुजून खड्ड्यात टाकणे हा जसा गुन्हा आहे, तसेच लोकांच्या भावनांचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करून घेणे, हाही गुन्हा आहे.

The 'criminals' panic of the saints | ‘गुन्हेगार’ संतांची दहशत

‘गुन्हेगार’ संतांची दहशत

Next

विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

श्रद्धा नेहमीच अंध असते, असे मानले जाते. पण, एखाद्या अंध व्यक्तीला जाणूनबुजून खड्ड्यात टाकणे हा जसा गुन्हा आहे, तसेच लोकांच्या भावनांचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करून घेणे, हाही गुन्हा आहे. याला विश्वासघातच म्हणावे लागेल. धार्मिक भावनांना आवाहन करून विश्वासघात करण्याच्या घटना मानवी इतिहासात जागोजागी आढळतात. धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि शोषण करण्याचा प्रकार सर्वच धर्मांमध्ये आढळून येतो. धर्मांमध्ये जेव्हा गुन्हेगारी तत्त्वे सामील होतात तेव्हा सारा समाजच घसरणीला लागतो. पण, धर्मातील आध्यात्मिक भावना माणसाला उच्चकोटीत नेऊन पोहोचवितात, हेही तितकेच खरे आहे. या भावनांच्या आधारावर समाजातील नीतिमत्ता टिकून आहे. त्यामुळे आपल्या सामान्य आयुष्याला वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
बाबा, ढोंगी साधू, तीर्थक्षेत्री आढळणारे भिक्षेकरी आणि धर्माच्या नावाखाली देशभर भ्रमंती करणारे भिक्षुक हे सर्व आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. समाज त्यांचे पालनपोषण करतो, त्यांना खपवून घेत असतो. पण, आता काळ बदलला आहे. हल्ली कोणत्याही गोष्टीला बाजारी स्वरूप येऊन त्यातूनच व्यावसायिक हितसंबंध निर्माण होत आहेत आणि त्यात गुन्हेगारीही शिरत आहे. अशा परिस्थितीत रामपालसारखे निरुपद्रवी दिसणारे
लोक पाहता पाहता दहशतवादी दैवी पुरुषाचे स्वरूप प्राप्त करतात आणि ते सरकारलाही आव्हान देण्यास सज्ज होतात. रामपालने दीर्घकाळ
सरकारी यंत्रणेला धाब्यावर बसवले आणि सरकारला शरण येण्याचे टाळले, ही गोष्ट दुर्लक्षिण्याजोगी नाही. अतिरेक्यांपाशी असते तशी सर्व तऱ्हेची दहशतवादी सामग्री त्याच्याजवळ होती. शस्त्रास्त्रे तर होतीच, पण ढाल म्हणून वापरण्यासाठी त्याच्याकडे मोठे मनुष्यबळ होते. अनेक दिवस पोलिसांच्या वेढ्याला तोंड देता येईल एवढी अन्नसामग्री, पिण्याचे पाणी आणि जळण त्याच्यापाशी होते. याशिवाय प्रशिक्षित सशस्त्र कमांडोजदेखील त्याच्याकडे होते. ही एवढी साधनसामग्री एखाद्या संतपुरुषाला कशाला हवी? ती त्याच्याकडे आहे, याचा अर्थ त्यामागे गुन्हेगारी हेतू आहे, असाच घ्यावा लागेल. त्यांना या गोष्टींचा वापर सरकारविरुद्ध करायचा नव्हता, तर त्यांनी हे सारे कशासाठी जमवले होते?
त्यांनी जे केले त्याचे समर्थन करण्याजोगे कोणतेही कारण त्यांच्यापाशी नव्हते. या सर्व कृत्यांवर भंपकबाजीचा ठसा स्पष्टपणे जाणवतो. त्याची सुरुवात स्वत:ला संत कबीर किंवा गुरू नानक यांचा अवतार असल्याचा दावा करण्यापासून झाली. शिष्यपरिवार वाढू लागला तशी त्यांची जीवनशैलीदेखील बदलली. त्यांच्या धार्मिक शिकवणीतही बदल झाला. लोकांना आकर्षित करण्याची शक्ती त्यांच्याकडे होतीच. गरिबीने गांजलेल्या समाजात आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणारे अनेक ह्यसंतह्ण दिसून येतात व पाहता पाहता त्यांचे हितसंबंध निर्माण होतात. त्यांचा हा धंदा सुरू राहावा, यासाठी श्रीमंत आणि सामर्थ्यवान आश्रयदाते त्यांना मदत करतात. फुकटात राहायला, खायला मिळते म्हणून मोठा शिष्यसंप्रदाय त्यांच्याभोवती गोळा होतो. त्यामुळे हे आश्रम पाहता पाहता समृद्ध होतात. त्यातच त्यांना राजकीय समर्थन लाभले, की त्यांचे आणखीनच आकर्षण वाटू लागते. राजकारणी आणि हे बाबा परस्परांचे स्वार्थ जपत असतात. हे संबंध परस्परावलंबी असतात. बाबांना आश्रयदाते मिळतात आणि राजकारण्यांना मतदार मिळतात. रामपालबाबाचीदेखील स्वत:ची व्होट बँक होती आणि त्याने आर्य समाजाच्या विरुद्ध संघर्षही केला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा हे स्वत: आर्य समाजाचे आहेत. रामपालच्या सतलोक आश्रमामध्ये राष्ट्रीय समाज सेवा समितीचे मुख्यालय होते. बाबाला अटक करण्यासाठी येणाऱ्या हुडांच्या पोलिसांना बाबाचे पोलीस तोंड देत होते.
रामपालबाबा किंवा आसारामबापू यांच्यापाशी दैवी शक्ती आहे, असे समजले जात होते आणि त्यामुळे ते कायद्यापेक्षा मोठे आहेत, असा समज त्यांच्या भक्तांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे न्यायालयासमोर शरण येण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा आपल्या भक्तांचा पुढे करून त्यांनी अटक टाळण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर राजकीय सूड उगवण्यात येत आहे, असे आसारामबापू आणि रामदेवबाबा म्हणतात आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींना त्यासाठी जबाबदार धरतात. पण, सरते शेवटी त्यांना कायद्यासमोर शरणागती पत्करावी लागली. सुरुवातीला या बाबांनी समंजसपणा दाखविला. पण नंतर मात्र या सत्पुरुषांनी पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला. पण, त्यामुळे या बाबांच्या आश्रमामध्ये भक्तांचे शोषण होत होते, हे उघडकीस आले व सर्वच कृष्णकृत्ये उघड झाली, हे चांगले झाले.
हे सामाजिक संकट केवळ कायद्याने अथवा सरकारी कारवाईने दूर होणार नाही. धर्माच्या गैरवापराविरुद्ध दीर्घकाळ लढा द्यावा लागणार आहे. सामाजिक जागृतीतून आणि ज्ञानाच्या प्रसारातून हे संकट दूर होऊ शकेल. अर्थात, यात सरकारची कोणतीच भूमिका असणार नाही, असे म्हणता येणार नाही.
अशा संतांच्या गैरकृत्यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करायला हवी. अनेक संत हे बेकायदेशीर कृत्यात अडकले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोणतेही भय न बाळगता सरकारने कृती करायला हवी. धर्माच्या नावाने होणारे भावनिक शोषण थांबविलेच पाहिजे.
रामपालची सेना एका रात्रीत निर्माण झालेली नाही. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हे सैन्य निर्माण होऊ शकले. सुरक्षेतील गलथानपणामुळे हे घडले, असे समजून, याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी कारवाई करायला हवी. भविष्यात या तऱ्हेचे रामपाल निर्माण होऊ नयेत, याकडे लक्ष पुरवायला हवे. या आश्रमाविरुद्ध झालेल्या कारवाईत फक्त सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे ही शांततामय कारवाई होती, असा दावा करण्यात येत आहे. पण, एकही निरपराध व्यक्ती मरता कामा नये, हे बघितले गेले पाहिजे. तेथील परिस्थिती स्फोटक होती, हे मान्यच करावे लागेल. रामपालसारख्या क्रूर व्यक्ती किती प्रमाणात विध्वंस घडवून आणू शकतील, याला मर्यादाच नाही. त्यांचा मुळातूनच नायनाट करायला हवा.

Web Title: The 'criminals' panic of the saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.