शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
जाधव यांना संपर्क का नाकारला?
First Published: 20-May-2017 : 03:36:35

- लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था

नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दूतावास संपर्क (काऊंसलर अ‍ॅक्सेस) का नाकारण्यात आला, असा सवाल आता पाकिस्तानातील नागरिकच उपस्थित करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती दिल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानातून अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जाधव यांच्याशी संपर्क करण्यासाठी भारताने १६ वेळा विनंती केली होती; पण पाकिस्तानने ही विनंती मान्य केली नाही. पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या असमा जहाँगीर याबाबत बोलताना म्हणाल्या की, जाधव यांना संपर्क नाकारण्याचा सल्ला प्रथम कोणी दिला होता. भारतीय तुरुंगात असलेल्या कैद्यांचा अधिकार त्यामुळे धोक्यात येणार नाही का? आंतरराष्ट्रीय कायदा बदलता येऊ शकतो?

पाकिस्तानातील एक वकील यासीर लतीफ हमदानी यांनी म्हटले आहे की, जाधव यांना सुरुवातीपासूनच दूतावास संपर्क देण्याची आवश्यकता होती. सुनावणी पूर्ण होण्याच्या आत जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही, अशी हमी पाकिस्तानने न दिल्यानेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेतली. दूतावास संपर्क न पुरविणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

आईच्या अपिलावर विचार केला आहे काय?

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील जाधव यांच्या आईने केलेले आहे; पण या अपिलावर पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी विचार केला आहे काय? याबाबत अनिश्चितता कायम आहे.

जाधव यांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी ४० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असताना हा प्रश्न उपस्थित झाला आहे. १० एप्रिल रोजी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी २६ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या विदेश सचिव तेमानिया जंजुआ यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी जाधव यांच्या आईचे अपील सादर केले होते. जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांकडे ६० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येऊ शकते, तर राष्ट्रपतींकडे ९० दिवसांच्या आत दया याचिका दाखल करता येते.

पाकिस्तानकडून वकिलांची नवी टीम

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानात सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे हा खटला लढण्यासाठी सरकार आता वकिलांची नवी टीम देणार आहे. पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितले की, नवी टीम पाकिस्तानची भूमिका प्रभावीपणे सादर क रील. पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादीर यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांना अनुभव नाही. आम्हाला पाकिस्तानसाठी समर्पित, सशक्त टीमची आवश्यकता आहे.

सेहवाग म्हणाला, ‘सत्यमेव जयते’

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यात क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांचाही समावेश होता. सेहवागने टिष्ट्वट केले आहे, ‘सत्यमेव जयते’. मोहम्मद कैफने टिष्ट्वट केले आहे ‘अभिनंदन, न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आभार’.

विरोधकांचा शरीफ यांच्यावर हल्लाबोल

जाधव प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करीत पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरीफ आणि भारतीय उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आयसीजेचा निर्णय म्हणजे या बैठकीचाच परिणाम असल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्सानचे नेते शफाकत महेमूद यांनी केला आहे. जिंदल यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हा खेळ सुरू झाला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com