शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> राष्ट्रीय >> स्टोरी
केजरीवालांचं हवाला कनेक्शन, होऊ शकते माझी हत्या - कपिल मिश्रा
First Published: 19-May-2017 : 13:58:23
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांचा हवाला व्यवसायात सहभाग असल्याचा आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली. 
 
कपिल मिश्रा यांनी गेल्यावेळी केलेल्या आरोपाच्या उत्तरात केजरीवाल आणि पक्षाने मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा जारी केलेला व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला. हेमप्रकाश शर्मा या व्यक्तीला वाचवण्यासाठी केजरीवाल आणि पक्षाकडून मुकेश शर्माचं नाव पुढे केलं जात असल्याचं ते बोलले आहेत. कपिल मिश्रा यांनी पक्षाने कंपन्यांकडे गोळा केलेल्या निधीसंबंधी बोलताना सर्व लेटरहेड घऱात बसून तयार करण्यात आल्याचा आरोप केला. 
 
कपिल यांनी दावा केला की, निधीसंबंधी सनव्हिजन कंपनीच्या लेटरहेडवर असलेली स्वाक्षरी मुकेश कुमारची नाही. सोबतच कपिल शर्मा यांनी अरविंद केजरीवाल, पक्ष आणि सदस्यांविरोधात करण्यात आलेल्या आरोपानंतर माझी हत्या करण्यात येईल अशी भीती व्यक्त केली आहे. 
 
कपिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निधी कुठून आला याची माहिती नसल्याचं सांगितलं. पण मग दोन कोटी कुठून आले याची माहिती त्यांनी आयकर विभागाला द्यावी असं ते बोलले आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीआधी हे दोन कोटी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 
 
काय आहे आरोप-
दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 कोटी रूपये दिले असा सनसनाटी आरोप करून कपिल मिश्रांनी दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. जैन हे केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दुसरीकडे आपने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, कपिल मिश्रांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या दर्जाचे असून हे सर्व आरोप निराधार आहे. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोप नाही असे सिसोदिया यांनी म्हटले. त्यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे असून कोणत्याही आधाराशिवाय हे आरोप करण्यात आल्याचं ते म्हणाले. मात्र, मिश्रा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. ‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्यानं मला हटवण्यात आलं असं ते म्हणाले. याशिवाय केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांचं 'डील' केल्याचं सत्येंद्र जैन यांनी आपल्याला सांगितलंय, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गंभीर आरोपांमुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com