सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
रमेश कदमांची अधिका-याला अश्लील शिवीगाळ, पोलीस आयुक्तांचा चौकशीचा आदेश
First Published: 19-May-2017 : 17:47:41
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आमदार रमेश कदम याने पोलीस अधिका-याला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाची चौकशी होणार आहे. पोलिस उपायुक्त स्तरावर ही चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हे आदेश दिले आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, शिवीगाळ करणं या कलमांखाली रमेश कदम याच्यावर कारवाई होऊ शकते. 
 
रमेश कदम याने एका पोलीस अधिका-याला एकेरी व अत्यंत अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याची घटना गुरुवारी सकाळी भायखळा कारागृहात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता.  व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी झोन 3 चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 
रमेश कदम याला रुग्णालयात नेत असलेल्या बंदोबस्तावरील सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास तो उद्धट आणि उर्मट भाषेत बोलत होता. त्याचबरोबर पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी कदमने त्याच्या कार्यकर्त्याला पवार यांनी आपल्याकडे २५ हजार रुपये मागितल्याची तक्रार अप्पर आयुक्तांकडे करण्यास सांगितले. तसेच, पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची आणि वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करण्याची धमकी कदम याने दिली. त्याच्या या पवित्र्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 
 
दरम्यान, कदम शिवीगाळ व धमकी देत असल्याचे चित्रण एका मोबाईलमध्ये कैद करण्यात आले असून या चित्रणाची क्लिप सोशल मिडीयात व्हायरल झाली. त्यामुळे कदमाच्या या वर्तवणूकीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार कदमच्या या शिवीगाळीबाबत दोघा पोलीस उपायुक्तांना कळविले असून नागपाडा पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘डायरी’बनविली आहे. 
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com