शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> मुंबई >> स्टोरी
आमदार रमेश कदमची पोलीस अधिका-याला अश्लील शिवीगाळ
First Published: 19-May-2017 : 05:42:51

- जमीर काझी/ऑनलाइन लोकमत

भायखळा कारागृहातील घटना, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, दि. 19 - अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आमदार रमेश कदम याने एका पोलीस अधिका-याला एकेरी व अत्यंत अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याची घटना गुरुवारी सकाळी भायखळा कारागृहात घडली.

रमेश कदम याला रुग्णालयात नेत असलेल्या बंदोबस्तावरील सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास तो उद्धट आणि उर्मट भाषेत बोलत होता. त्याचबरोबर पवार यांच्यावर दबाव आणण्यासाठी कदमने त्याच्या कार्यकर्त्याला पवार यांनी आपल्याकडे २५ हजार रुपये मागितल्याची तक्रार अप्पर आयुक्तांकडे करण्यास सांगितले. तसेच, पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची आणि वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करण्याची धमकी कदम याने दिली. त्याच्या या पवित्र्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, कदम शिवीगाळ व धमकी देत असल्याचे चित्रण एका मोबाईलमध्ये कैद करण्यात आले असून या चित्रणाची क्लिप सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. त्यामुळे कदमाच्या या वर्तवणूकीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार कदमच्या या शिवीगाळीबाबत दोघा पोलीस उपायुक्तांना कळविले असून नागपाडा पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘डायरी’बनविली आहे. उद्या याबाबत पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आघाडी सरकारच्या काळात अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना कदम यांने कोट्यावधीचा भष्ट्राचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून तो कारागृहात आहे. महिन्यापूर्वी त्याला आर्थर रोड जेलमधून भायखळा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्याने गुडघे दुखत असल्याचे सांगितल्याने काही दिवसांपूर्वी त्याचा जे.जे.रुग्णालयात नेवून ‘एमआरआय’ काढण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आणण्यासाठी त्याला भायखळा जेलमधून बाहेर काढण्यात येत होते. त्यासाठी पावणे अकराच्या सुमारात ताडदेव येथील सशस्त्र विभाग (एल.ए-२) येथील सहाय्यक निरीक्षक पवार व अन्य तीन अंमलदार आले होते. मात्र कदम हा तातडीने निघण्यास तयार नव्हता. त्यामुळे तो टाळाटाळ करु लागल्याने पवार यांनी त्याला गाडीत बसण्याची सूचना केली. त्यावर कदमने त्यांना आईवरुन अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ सुरु केली. आम्ही काय कायम जेलमध्ये राहणार आहे, कधीतरी बाहेर येऊच, त्यावेळी तुला दाखवितो, असे म्हणत सातत्याने शिवीगाळ करु लागला. कारागृहामध्ये कैद्यांना भेटण्यासाठी येत असलेल्या ठिकाणी हा प्रकार सुरु होता. तसेच, त्याला भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या स्वीय सहाय्यकाला त्याने पवार हा आपल्याकडे २५ हजार रुपयांची मागणी करीत आहे, अशी तक्रार सशस्त्र दल विभागाच्या अप्पर आयुक्त आश्वती दोरजे यांच्याकडे कर,असेही सांगितले. तो एक सारखा एकसारखा अतिशय अश्लील शब्दात शिव्या देत राहिल्याने पवार यांनी कंट्रोलरुमला हा प्रकार कळवित नागपाडा पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला. तेथून एक निरीक्षक व पाच अमंलदार आल्यानंतर सोबतच्या सहकाऱ्यासमवेत त्याला साडेबाराच्या सुमारास तेथून बाहेर काढले. त्यानंतर जे.जे. रुग्णालयातून रिपोर्ट घेवून दुपारी दीड वाजता भायखळा कारागृहात परत आणून सोडले. तसेच, त्याच्या शिवीगाळ व कृत्याबाबत नागपाडा पोलीस ठाण्यात जावून डायरीत नोंद घेतली. त्यानंतर परिमंडळ-३ व ‘एलए’च्या उपायुक्तांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. 

दरम्यान, कदम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्याने साठे महामंडळ येथील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा लोकप्रतिनिधी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-याला अर्वाच्य शिवीगाळ करतो किती मुजोरी आहे ? याच्या मुजोरीला मुख्यमंत्री व पोलिस विभागातील अति वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत असे माझे ठाम मत आहे. तुरुंग विभागाचे महासंचालक ह्या प्रकरणांत योग्य प्रकारे कारवाई करतील का? असा सवाल मुंबई वाहतूक पोलिसांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करुन याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे वाहतूक शाखेतीलच हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केला आहे.

रुग्णालयातील ओपीडी दीड ते चारपर्यंत बंद रहाते. त्यामुळे यावेळेत गेल्यास त्याठिकाणी अधिकवेळ थांबायला मिळते, त्यासाठी रमेश कदम हा जाणीवपूर्वक जेलमधून बाहेर जाण्यास विलंब करीत होता. त्याला सूचना दिल्यानंतर शिवीगाळ करत त्याने गोंधळ घातला. याबाबत पोलीस ठाणे व उपायुक्तांना कळविले असून शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेवून त्यांना सर्व प्रकार कळविणार आहे.

- मनोज पवार ( सहाय्यक निरीक्षक, एलए-२)

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com