शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
दानवेंच्या नावे अनेकांची फसवणूक
First Published: 20-May-2017 : 03:43:13

- तोतया पीए अटकेत

औरंगाबाद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचे प्रकरण ताजे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावे अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी दानवे यांच्या तोतया स्वीय सहायकास पोलिसांनी अटक केली आहे.

भोकरदन तालुक्यातील करजगावचा रहिवासी असलेल्या गणेश साहेबराव पाटील बोरसे या आरोपीची खा. दानवे यांच्याशी चांगली ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता.खा. दानवे केंद्रात मंत्री झाले तेव्हापासून तो स्वत:ची ओळख दानवे यांचा स्वीय सहायक (पीए) म्हणून करून देत होता. शासकीय नोकरी लावून देतो, बढती आणि बदलीचे काम

करून देतो, असे सांगून त्याने अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळले.

परभणी येथील व्यापारी प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर यांची भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील एका प्रकरणावर औरंगाबादेतील पीएफ कार्यालयात सुनावणी सुरू आहे. याच निमित्ताने बोरसे त्यांना भेटला. तुमचे काम करून देतो, असे सांगून त्याने दोन लाखांची मागणी केली. एक लाखावर सौदा झाला. वाकोडकर यांनी बोरसेला तेवढी रक्कम दिली.

मात्र, पैसे मिळताच तो भेट टाळू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरसे विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. औरंगाबाद येथील एका फ्लॅटमधून त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने बोरसेला २५ मेपर्यंत कोठडी सुनावली

आहे.

मुख्यमंत्र्यांचे लेटरहेड अन्...

पोलिसांना बोरसेच्या घरी मुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरपॅड, अनेक युवकांची शैक्षणिक कागदपत्रे, विविध पदांसाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नावांची यादी, कोट्यवधींच्या व्यवहाराच्या देवाणघेवाण चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत.

आरोपी बोरसे हा आपल्या नावाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आम्ही त्याच्या मागावर होतोच. आज तो हाती लागताच आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. - रावसाहेब दानवे

(प्रदेशाध्यक्ष, भाजपा)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com