शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
मुंबईत ३० मे रोजी मराठा क्रांती मोर्चा
First Published: 20-May-2017 : 02:21:51

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येत्या ३० मे रोजी मुंबईमध्ये सकल मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानापासून निघणारा हा महामोर्चा ‘मूक’ नसेल, असा इशाराही महामोर्चाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या महामोर्चानंतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

महामोर्चाचे प्रतिनिधी संभाजी पाटील यांनी सांगितले की, गेल्या १० महिन्यांपासून राज्यभर निघालेल्या मूक मोर्चांनंतरही सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच सरकारकडून मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात प्रकरण असल्याचे सांगून सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे.

मुळात उच्च न्यायालय वारंवार सरकारला आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देताना दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाची बाजू मांडण्यात ढिम्मपणा दाखवणाऱ्या सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून केली आहे. ३० मेपूर्वी विशेष अधिवेशनाची घोषणा झाली नाही, तर मराठा समाज आझाद मैदानावरून लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला आहे.

महामोर्चाचे संदीप जाधव म्हणाले की, याआधी निघालेल्या मोर्चांमध्ये स्वच्छतेपासून कायदा-सुव्यवस्था राखण्यापर्यंतची सर्व कामे समन्वयकांनी चोखपणे बजावली आहेत. मात्र या महामोर्चात सर्व जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने या शेवटच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करत आहोत. अन्यथा यापुढे कृतीतून मराठा समाज आपल्या मागण्या पूर्ण करून घेईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

- सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर बैलगाडी शर्यत आणि हायवेशेजारील बार सुरू करण्यासाठी सरकारने जी तत्परता दाखवली, ती मराठा आरक्षणाबाबत दिसत नाही. परिणामी, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्राथमिकतेने सोडवण्यासाठी मराठा समाज आपले उपद्रव्य मूल्य, आक्रमकता दाखवणार आहे. म्हणूनच महामोर्चातील ‘मूक’ शब्द वगळल्याचे कदम यांनी सांगितले.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com