मंगळवार २५ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
वस्तू हरवल्यास 'लॉस्ट अँड फाऊंड'च्या माध्यमातून करता येणार ऑनलाइन तक्रार
First Published: 19-May-2017 : 22:19:11

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19 - मोबाईल, वॉयलेट, पर्स किंवा लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट अशा महत्वपूर्ण वस्तू हरवल्या की पुणेकरांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी जावे लागते. केवळ एक प्रमाणपत्र घेण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी वाया जातो. पण तुमचा हाच कालावधी वाचला तर? पुणे पोलिसांनी हाच बहुमूल्य वेळ वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता घरबसल्या एका क्लिकवर पुणेकरांना मिसिंग वस्तूंची तक्रार नोंदविणे सहज शक्य होणार आहे.

पुणे पोलिसांनी त्यांच्याच संकेतस्थळावर ' लॉस्ट अँड फाऊंड' हे पोर्टल विकसित केले आहे. पासपोर्टसाठी आपण ज्याप्रमाणे आॅनलाईन पद्धतीचा वापर करतो तशाच स्वरूपात हरवलेल्या वस्तूंसाठी आॅनलाईन माध्यमाद्वारे तक्रार अर्ज भरता येणार आहे. अर्जात माहिती अपलोड केल्यानंतर डिजिटल सिग्नेचरचा वापर करून ईमेल आयडी अटँच करून हा अर्ज पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अर्जात माहिती टाकण्यासाठी आधार कार्ड, पँनकार्ड, मोबाईल नंबर टाकल्यानंतर पेटीएमप्रमाणे ओटीपी नंबर मेसेज केला जाईल, तो टाकल्यानंतर अर्ज भरता येऊ शकेल. त्यामुळे आता यापुढे हरवलेल्या वस्तूंसंदर्भात प्रमाणपत्र घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज भासणार नाही.

या पोर्टलच्या माध्यमातून हरवलेल्या वस्तूंसंदर्भात आॅनलाइन माहिती देऊन प्रमाणपत्र आणि पावती घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आर्थिक व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त ( गुन्हे) पंकज डहाणे आणि सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक राधिका फडके उपस्थित होते. पोर्टलमध्ये लॉस्ट अँंड फाऊंड असे दोन विभाग करण्यात आले आहेत, तुमच्या हरवलेल्या वस्तूंची नोंद लॉस्ट मध्ये होईल आणि त्याची माहिती नोडल आॅफिसरसह शहरातील 39 पोलीस ठाण्यांना जाईल. आधार आयडेन्टिफिकेशशिवाय अर्ज मंजूर केला जाणार नाही. तुम्ही या अर्जाच्या किती कॉपी काढल्यात त्याची माहितीही तात्काळ करू शकणार आहे. तुमची वस्तू सापडली तर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून फाऊंड मध्ये नोटीफिकेशन तक्रारदाराला दिले जाईल. जर तक्रारदाराला ती वस्तू सापडली तर त्याने देखील फाऊंडमध्ये त्याची नोंद करावी. लवकरच शैक्षणिक कागदपत्रांचाही यात समावेश केला जाणार आहे. पंकज गोडे, अविराज मराठे आणि प्रणितकुमार यांनी या पोर्टलची निर्मिती केली आहे.

------------------------------------------------------------

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये 150 मिसिंगच्या तक्रारी

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज कमीत कमी चार ते पाच मिसिंग वस्तूंच्या तक्रारीची नोंद होते. महिन्याभरात 150 तक्रारी नोंदविल्या जातात. प्रत्येकाची तक्रार लिहून घेण्यासाठी दोन तासाचा अवधी लागतो, या पोर्टलमुळे पोलिसांसह पुणेकरांचाही वेळ वाचणार आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com