सोलापूर एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणार

By admin | Published: March 28, 2017 02:52 PM2017-03-28T14:52:11+5:302017-03-28T14:52:11+5:30

एप्रिलमध्ये होणार राष्ट्रार्पण

Solapur NTPC's 660 unit power generation test successful, power generation will start in two days | सोलापूर एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणार

सोलापूर एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणार

Next

सोलापूरच्या एनटीपीसीच्या ६६० युनिट वीजनिर्मितीची चाचणी यशस्वी, दोन दिवसात वीजनिर्मिती सुरू होणार

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील ६६0 मेगावॅट वीजनिर्मिती चाचणी यशस्वी झाली आहे. येत्या दोन दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये शानदार कार्यक्रमाद्वारे हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात येईल, अशी माहिती समूह महाप्रबंधक नरेंद्र राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
एनटीपीसीचा प्रकल्प १३२0 मेगावॅट क्षमतेचा आहे. त्यातील पहिल्या ६६0 मेगावॅट टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी होटगी स्टेशन येथून रेल्वे लाईन टाकून महानदी (ओडिसा) प्रकल्पातून ३६00 टन कोळसा आणण्यात आला. तसेच उजनी धरणापासून ११७ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचे काम १२ आॅगस्ट रोजी पूर्ण झाले व डिसेंबरअखेर पाणी उपसा सुरू करण्यात आला. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील बॉयलर २१ आॅगस्ट २0१६ रोजी पेटविण्यात आला. त्यानंतर ३0 नोव्हेंबर २0१६ रोजी स्टिम ब्लोर्इंगचे काम सुरू करण्यात आले. टर्बाईन हा प्रकल्पाचा मूळ गाभा आहे. टर्बाईन फिरताना या परिसरात काही काळ बॉयलरचा मोठा आवाज येत होता. लिंबीचिंचोळी येथील पॉवर ग्रीडला वीजजोडणी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पात तयार झालेली वीज या पॉवर ग्रीडद्वारे महाराष्ट्र व इतर राज्याला वितरित होणार आहे. २३ ते २५ मार्च या काळात सलग तीन दिवस प्रकल्प क्षमतेने चालविण्यात आला. यातून निर्माण झालेली वीज ग्रीडला पुरविण्यात आली. या काळात बॉयलर, टर्बाईन व वीजनिर्मिती झाल्यानंतर ग्रीडपर्यंत वहन याच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्या. त्यामुळे केंद्र शासनाच्या परवानगीने येत्या दोन दिवसांत हा प्रकल्प क्षमतेने सुरू करण्यात येईल, असे राय यांनी स्पष्ट केले.
-------------------
असा आहे एनटीपीसी प्रकल्प...
दक्षिण सोलापूर तालुक्यात फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी परिसरात १८९२ एकरांवर हा प्रकल्प असून, सोलापूर रेल्वे स्टेशनपासून १८ कि.मी.वर आहे. १९ मार्च २0१२ रोजी हा प्रकल्प मंजूर झाला. ९ हजार ९९८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यातून १३२0 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. त्यातील वीज महाराष्ट्र: ६५५.७५ मेगावॅट, मध्यप्रदेश: ३0४.६३, छत्तीसगढ: १२१.६0, गोवा: २१.७७,दमण,दीव: ७.५२, दादरा व नगर हवेली: १0.७३ व इतरसाठी १९८.00 मेगावॅट अशा पद्धतीने वितरित केली जाईल. प्रकल्पासाठी उजनी धरणातील ५२.६ एमसीएम पाणी राखीव ठेवण्यात आले आहे तर महानदी कोलमधून वर्षाला ७.५ लाख मेट्रिक टन कोळसा लागणार आहे.
------------------------
प्रकल्प सुरू होण्यास विलंब...
प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होण्यास अनेक अडचणींमुळे एक वर्षाचा विलंब झाल्याचे राय यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये जलवाहिनीचे काम, बॉयलर पुरवठा, सिव्हिल काम ही कारणे आहेत. बॉयलरचा करार जर्मन येथील हिटाशी कंपनीशी झाला होता. या कंपनीतील बदलाचा बॉयलर पुरविण्यावर परिणाम झाला. प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. २७५ मीटरची चिमणी उभारण्यात आली असून, यातून बाहेर पडणारे धूर, वाफ थंड होऊन वातावरणात मिसळेल. तसेच प्रकल्पाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरविण्यात आले. तापमान वाढेल, धुळीचे प्रदूषण होईल असे सांगण्यात येत होते. पण आता प्रकल्प सुरू होत आहे. नागरिकांनीच शहर आणि प्रकल्प परिसरातील तापमानाचा अभ्यास करावा. या प्रकल्पातून कोणतेच प्रदूषण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. परिसरात १ लाख ८२ हजार झाडे लावण्यात आली आहेत. भविष्यात शासनाच्या उपक्रमात कंपनी सहभागी होणार आहे. पाण्याचा थेंब अन् थेंबाचा रिसायकलिंगद्वारे वापर केला जाणार आहे.
-----------------------
वर्षभरात दुसरा टप्पा
येत्या वर्षभरात प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल. त्याचे काम वेगात सुरू आहे. एनटीपीसी कंपनीची स्थापना १९७५ मध्ये झाली. कंपनीने देशभरात जाळे विणले आहे. सध्या ४९ हजार ९९८ मेगावॅट कंपनीची वीज उत्पादन क्षमता आहे. सोलापूरचा प्रकल्प सुरू झाल्यावर ५0 हजार मेगावॅटचाआकडा पुढे नेण्याचा विक्रम होईल, असे राय म्हणाले.

Web Title: Solapur NTPC's 660 unit power generation test successful, power generation will start in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.