सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:16 PM2024-05-06T22:16:55+5:302024-05-06T22:18:39+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Different topics were discussed in the meetings but the ajit pawar ncp party workers raised the issues of the village | सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

Sunetra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून बारामतीत उडालेल्या प्रचाराचा धुरळा काल खाली बसला. बारामतीत मतदारसंघात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय यांच्यात सामना रंगल्याने प्रचारादरम्यान काही कौंटुबिक विषयही चव्हाट्यावर आले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जाण्याच्या अट्टहास केला आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही हीच भूमिका नेटाने पुढे रेटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असली तरी या लढतीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहण्यात आलं. कधी अजित पवार विरुद्ध शरद पवार, तर कधी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ही लढत असल्याचं सांगितलं गेलं. त्यातच पवार कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर टोकदार आरोप-प्रत्यारोप केल्याने कुटुंबाचा राजकीय कलह हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार की काय, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजित पवार यांनी नंतर बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध तालुक्यांतील स्थानिक मुद्द्यांवर भर देत हे प्रश्न सोडवण्यासाठीचा रोडमॅप लोकांसमोर ठेवला.

ज्या भागांत पाण्याचा प्रश्न आहे, तिथे आपण यापूर्वी काय उपाययोजना केल्या आहेत आणि भविष्यात कोणत्या योजना आणणार आहोत, काही भागांतील रेल्वे, साखर कारखाने अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत त्यातील अडचणी सोडवण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. याचा परिणाम असा झाला की अजित पवार यांचे गावोगावीचे कार्यकर्तेही याच स्थानिक प्रश्नांवर बोलू लागले. 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या या प्रचारामुळे आधी भावनिकतेकडे झुकलेली ही निवडणूक नंतरच्या टप्प्यात मात्र विकासाच्या मुद्द्याभोवती फिरू लागली. त्यामुळे मग महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असणारे इतर नेतेही या प्रश्नांवर भाष्य करू लागले. 

दरम्यान, बारामतीची निवडणूक पूर्णपणे भावनिकतेच्या मुद्द्यावर गेली नाही, हे अजित पवार यांच्या प्रचारयंत्रणेचंच यश असल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत. दोन्ही बाजूंकडून झालेल्या या प्रचाराला आता मतदार कसा प्रतिसाद देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Different topics were discussed in the meetings but the ajit pawar ncp party workers raised the issues of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.