सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला

Sai Sudharsan IPL 2024 : आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सुदर्शनने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने शतकी खेळी केली. आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सुदर्शनने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

खरे तर आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावात १ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यादीत त्याने क्रिकेटचा देव म्हणून जगभर ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

स्फोटक खेळी करताना गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या.

साई सुदर्शनने अवघ्या २५ डावात आयपीएलमधील वैयक्तिक १ हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी होता.

सचिनने ३१ डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ३१ डावांत १ हजार धावांचा टप्पा गाठला.

या यादीत मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू तिलक वर्मा चौथ्या स्थानावर आहे. तिलकने ३३ डावांमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमध्ये अनेक युवा भारतीय फलंदाज आपल्या चमदकार कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे साई सुदर्शन.