९.२३ ला मॅच सुरू, १०.१५ ला संपली! SRH कडून विक्रमांचा पाऊस, मोडला CSK चा पराक्रम

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ९.४ षटकांत फलकावर विजयी १६७ धावा चढवून सनरायझर्स हैदराबादला विक्रमी विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या.

SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ( ३-०-७-२) LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांचा पॉवर प्लेमध्ये १००+ धावा केल्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला.

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी १६७ धावांची भागीदारी केली आणि दहा विकेट्सने विजय मिळवून देणारी ही चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी सचिन तेंडुलकर व डेव्हॉन स्मिथ ( १६३ वि. राजस्थान रॉयल्स, २०१२) यांचा विक्रम मोडला. या विक्रमात गौतम गंभीर व ख्रिस लिन ही जोडी १८४ ( वि. गुजरात लायन्स, २०१७) धावांसह आघाडीवर आहे.

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंत शतकी भागीदारीच्या विक्रमात दुसरे स्थानही पटकावले. त्यांनी याच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३० चेंडूंत शतकी भागीदारी केली होती आणि आज त्यांनी ३४ चेंडू खेळले.

आयपीएल इतिहासात पहिल्या १० षटकांत सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रमही सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आज नोंदवला गेला. त्यांनी ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करताना स्वतःचाच ४ बाद १५८ धावांचा ( वि. दिल्ली, २०२४) विक्रम मोडला. मुंबई इंडियन्सविरुद्धही त्यांनी याच पर्वात २ बाद १४८ धावा चोपल्या होत्या.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत १४६ षटकार खेचले आहेत आणि एका पर्वात एखाद्या संघाकडून लगावलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने १४५ सिक्स मारले होते.