परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

By मारोती जुंबडे | Published: April 29, 2024 05:52 PM2024-04-29T17:52:47+5:302024-04-29T17:53:38+5:30

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे.

38 percent of voters in Parbhani district turned their backs on voting! | परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान ७५ टक्के व्हावे, असा निवडणूक आयोगाचा मानस होता. मात्र, या आयोगाच्या मानसावर मतदारांनी पाणी फिरवले असून, ८ लाख १ हजार १८८ मतदारांनी चक्क मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का का वाढत नाही. याबाबत मात्र तर्कवितर्क काढले जात आहेत. 

सहा विधानसभापैकी सर्वाधिक गंगाखेड विधानसभेत १ लाख ५१ हजार २९२ नागरिकांनी मतदान केले नसल्याचे समोर आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६३.१० टक्के मतदारांनी मतदान केले होते. मात्र, हे मतदान कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का ७५ टक्के व्हावा, असा निवडणूक आयोगाचा मानस होता. त्यानुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय पक्ष व नागरिकांना लोकशाहीच्या या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धाही मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात आल्या. मात्र, त्याचा कोणताही परिणाम जिल्हावासीयांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. २०२४ च्या निवडणुकीत १३ लाख २१ हजार ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची टक्केवारी ही ६२.२६ टक्के एवढी आहे. त्यामुळे ३७.७४ टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये ८ लाख १ हजार १८८ एवढ्या मतदारांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनासह राजकीय पक्षांनी केलेल्या आवाहनानंतरही मतदारांनी मतदान करण्यासाठी कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का दर निवडणुकीत घसरतो आहे. याबाबत मात्र प्रशासन व राजकीय पक्षांनी मंथन करणे गरजेचे आहे. अन्यथा हाच टक्का ५० टक्क्यांवर कधी येईल हे कळणारसुद्धा नाही.

टक्का घसरला; मतदान वाढले
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली असली तरीही संख्या मात्र वाढली आहे. गतवर्षी १९ लाख ८५ हजार २२८ मतदारांपैकी १२ लाख ५३ हजार ९२ जणांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ही ६३.१० टक्के एवढी होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत १३ लाख २१ हजार ८६८ जणांनी मतदान केले. ज्याची टक्केवारी ही ६२.२६ टक्के एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला असला तरी मतदान वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गंगाखेड विधानसभेत दीड लाख मतदारांचा कानाडोळा
परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील चार व जालना जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आहेत. यामध्ये शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ५१ हजार २९२ मतदारांनी मतदान करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यापाठोपाठ जिंतूर १ लाख ४० हजार १२३, परभणी १ लाख २५ हजार ३७०,पाथरी १ लाख ३५ हजार ४१२, परतूर १ लाख २५ हजार ७७०, तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात १ लाख २३ हजार २२१ मतदार केंद्रांकडेच नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 38 percent of voters in Parbhani district turned their backs on voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.