‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:27 PM2024-05-10T13:27:35+5:302024-05-10T13:28:20+5:30

Lok Sabha Election 2024: पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Lok Sabha Election 2024: '... Then Pakistan will not even be on the world map', BJP's reply to Mani Shankar Iyer | ‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या एका विधानावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे. तसं न झाल्यास पाकिस्तानभारतावर अणुहल्ला करू शकतो, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला होता. त्यावरून आता भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर पाकिस्तानने काही आगळीक केलीच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही, असा इशारा भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी दिला आहे.  
मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यााबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ही काँग्रेसची दुतोंडी मंडळी आहे. आज भारत शक्तिशाली आहे. तसेच जर पाकिस्ताननं डोळे वटारण्याचा प्रयत्न केलाच तर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. सध्या कांग्रेसचे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत, अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.  

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर टीका केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानामधून काँग्रेसच्या मनातील भीती आणि दहशत दिसत आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम आहे. काँग्रेसचे नेते राहतात भारतात पण त्यांच्या मनात मात्र पाकिस्तान भरलेला आहे. पाकिस्तानमध्ये आता काही दम राहिलेला नाही. पाकिस्तानला कसं सरळ करायचं, हे भारताला माहिती आहे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

तर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, या निवडणुकीत राहुल गांधी यांची विचारसरणी पूर्णपणे उघड झाली आहे. पाकिस्तानचं समर्थक करा, दहशतवाद्यांशी संबंधित संघटनांचं समर्थन करा. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लूट करा, हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा आरोप राजीव चंद्रशेखर यांनी केला.  

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानबाबत बोलताना मणिशंकर अय्यर म्हणाले होते की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरून चालणार नाही. सध्या देशात सत्तेवर असलेलं सरकार आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही असं का सांगत आहे हे मला कळत नाही आहे.  तिथे दहशतवाद असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं सरकार का सांगतंय. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा खूप आवश्यक आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी जगभरात पाकिस्तानलला कमीपणा देतोय, असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील कुठलाही माथेफिरू त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करू शकतो, अशी भीती मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केली होती.   

Web Title: Lok Sabha Election 2024: '... Then Pakistan will not even be on the world map', BJP's reply to Mani Shankar Iyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.