मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त

By रेश्मा शिवडेकर | Published: May 3, 2024 08:14 PM2024-05-03T20:14:43+5:302024-05-03T20:15:26+5:30

विद्यापीठात दररोज टँकर मागवावे लागत आहेत.

water crisis in mumbai university tanker for drinking water | मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त

मुंबई विद्यापीठात पाणीबाणी; पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर भिस्त

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलात नव्याने उभी राहिलेली वसतीगृहे, शैक्षणिक व प्रशासकीय इमारतींना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संपूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र बनत चालला आहे. ओसी नसल्याने नव्या इमारतींना पालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे विद्यापीठात दररोज टँकर मागवावे लागत आहेत.

पिण्याबरोबरच वसतीगृहे, शिक्षक-शिक्षकेतरांच्या वसाहती, प्रशासकीय इमारतींना दैनंदिन वापराकरिता लागणाऱया पाण्याकरिता टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. आजच्या घडीला दर महिन्याला विद्यापीठात सुमारे १५० हून अधिक टँकर मागवावे लागत आहेत. प्रत्येक टँकरकरिता पाच ते सहा हजार रूपये खर्च येतो.

विद्यापीठाचा बराचसा निधी याकरिता वापरला जात असल्याने विद्यापीठ परिसरातील उद्यानांच्या देखभालीकरिता पाण्याची सोय करताना हात आखडता घेतला जातो. परिणामी पाण्याअभावी इथल्या ५० पेक्षा अधिक उद्यानांतील झाडेझुडपेही मरून गेली आहेत, अशी प्रतिक्रिया एका प्रशासकीय अधिकाऱयाने दिली.

मान्यता नसताना राज्यपालांनी उद्घाटन केलेच कसे

दोन वर्षांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नॉलेज रिसोर्स सेंटर, विद्यार्थिनींचे वसतीगृह यांच्यासह चार इमारतीचे उद्घाटन केले गेले. मात्र या इमारतींना ओसीच नाही. ज्या इमारती राहण्यायोग्य नाही, अशा इमारतींचे उद्घाटन राज्यपालांनी केलेच कसे, असा सवाल एका प्राध्यापकांनी केला.

कुलगुरू जनता दरबार घेऊन कुठले प्रश्न सोडवतात

विद्यापीठात मागवले जाणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे तपासले जात नाही. टाक्या, कुलर यांची स्वच्छता केली जात नाही. याच कॅम्पसमध्ये राहणाऱया कुलगुरूंच्या कार्यालयात आणि निवासस्थानाला सर्व सोसीसुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु, सिनेट नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कुणी वाली राहिलेला नाही. हा मनमानी कारभार किती काळ चालणार आहे. - अमोल मातेले, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पक्षाचे नेते

विद्यार्थी-कर्मचाऱयांच्या जीवाशी खेळ

टँकरमधून येणारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे तपासले जात नाही वसतीगृहे, प्रशासकीय इमारतींमध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता नाही इमारतींमधूल वॉटर प्युरिफायर, वॉटर कुलर यांचीही नियमित स्वच्छता नाही

४० शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही त्रास

मुलींच्या नवीन वसतीगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधेमुळे जशा आजारी पडल्या होत्या, तसाच त्रास छत्रपती शिवाजी महाराज भवनमधील ४० हून अधिक शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही सहन करावा लागला होता. वसतीगृहातील घटनेनंतर दोनच दिवसात येथील कर्मचाऱयांनी या बाबत तक्रार केली. त्यानंतर या इमारतीतील वॉटर कुलर स्वच्छतेसाठी उघडण्यात आले. त्यात साचलेली घाण पाहता ते महिनोंमहिने स्वच्छ केले गेले नसल्याचे दिसून आले.

Web Title: water crisis in mumbai university tanker for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.