Join us  

लैंगिक शोषणाविरोधात पीडितांचा डिग्निटी मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 4:31 AM

दिल्लीत होणार समारोप : जनजागृतीसाठी हजारो पीडित सामील

मुंबई : लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी देशातील हजारो पीडितांनी एकत्रित येत गुरुवारी सोमय्या मैदानाहून डिग्निटी मार्च काढला. गरिमा अभियानने आयोजित केलेला हा मार्च ६५ दिवसांनंतर दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती संस्थेने दिली. देशातील २४ राज्यांमधून आणि २०० जिल्ह्यांमधून सुमारे १० हजार किलोमीटरचा प्रवास करीत लैंगिक शोषणाविरोधात या मार्चमधून जनजागृती केली जाईल. दरम्यान, पीडित महिला, मुले लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करतील. या डिग्निटी मार्चमध्ये ‘शेम टू सपोर्ट’ या हॅश-टॅग अंतर्गत लैंगिक हिंसाचाराबद्दल वृत्ती बदलण्यासाठी जनजागृती केली जाईल.

राष्ट्रीय गरिमा अभियानासोबत अनेक समविचारी संस्था यामध्ये सामील होतील. २२ फेब्रुवारी, २०१९ रोजी हा मार्च दिल्लीला धडक देईल. शोषितांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही या मोहिमेत सहभागी होतील. यावेळी संस्थेने सांगितले की, महिला आणि मुलांविरोधातील ९५ टक्के लैंगिक शोषणाच्या अत्याचारांची नोंदच झालेली नसल्याचे संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. शिवाय, या शोषितांनाच अवहेलनेचा सामना करावा लागतो, समाजाकडून कलंक म्हणविले जाण्याची भीती कायम त्यांना असते. फक्त २ टक्के गुन्ह्यांचीच पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिला आणि मुलांविरोधातील लैंगिक शोषणाचे प्रमाण सरकारी आकडेवारीत फारच कमी आहे, हेही दिसून आले. लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्यांना समाजात झेलावी लागणारी अवहेलना संपविणे (व्हिक्टिम शेमिंग) आणि अवहेलना आरोपीच्या वाट्याला यावी, तसेच शोषितांना आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी हा डिग्निटी मार्च काढल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबईबलात्कार