बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:14 AM2024-05-02T10:14:19+5:302024-05-02T10:16:04+5:30

ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे लवकरच पालिकेकडून पूर्ण होणार आहेत.

the first phase of the revival and beautification of the banganga lake will be completed by the municipality soon in mumbai | बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग

बाणगंगा येथे वाराणसीच्या धर्तीवर भक्ती परिक्रमा मार्ग; तलावाचे खोलीकरण, दीपस्तंभाच्या सौंदर्यीकरणाला वेग

मुंबई : ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे लवकरच पालिकेकडून पूर्ण होणार आहेत. येथील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे सौंदर्यीकरण दृष्टिपथात असल्याची माहिती ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. 

या शिवाय, तलावातील दगडी पायऱ्यांची डागडुजी, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित करणे, दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे अशी कामे केली जाणार असल्याचेही उघडे यांनी सांगितले. 

बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाची कामे तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुनर्उभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई, तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी तलावाकडे जाणारी ‘मिसिंग लिंक’ विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे  दर्शनी भाग एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतीच्या भिंतीवर भित्तिचित्रे चितरणे व शिल्पे घडविणे, रामकुंडाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा आदी कामांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्रादरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे आणि या जागेतील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून तेथे वाराणसीच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणे, डॉ.भगवानलाल इंद्रजीत मार्गाचे रुंदीकरण करणे व रस्ता रेषेत बाधित निवासी-अनिवासी बांधकामांचे पुनर्वसन आदी कामे केली जाणार आहेत.  

नैसर्गिक पदार्थांचा वापर-

१)  तलावाच्या प्रवेश पायऱ्यांवरील १३ झोपड्या हटविल्या असून, तेथील रहिवाशांचे ‘झोपुयो’च्या इमारतीत पुनर्वसन केले आहे. 

२)  दीपस्तंभांचे सौंदर्यीकरण करताना त्यांचे तत्कालीन रूप आहे, त्या स्थितीतच दिसावे, या दृष्टीने त्याकाळी वापरलेल्या उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ या नैसर्गिक पदार्थांपासून तयार कलेल्या मिश्रणाचा उपयोग केला आहे. 

३) तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी, तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.

Web Title: the first phase of the revival and beautification of the banganga lake will be completed by the municipality soon in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.