घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 03:48 PM2024-05-14T15:48:41+5:302024-05-14T15:49:01+5:30

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आरोपी असलेल्या भावेश भिंडेविरोधाक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Same mistake as Ghatkopar 21 times; Who is Bhavesh Bhinde responsible for hoarding incident? | घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

Bhavesh Bhinde : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वादळी वाऱ्यानंतर पेट्रोल पंपावर १२० फुटांचे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला तर ७५ लोक जखमी आहेत. त्यातील ४४ जणांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. ईगो प्रायव्हेट मिडिया कंपनीचे बेकायदा होर्डिंग कोसळल्याने हा अपघात झाला. त्यामुळे या कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता भावेश प्रभुदास भिंडे याच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

घाटकोपरच्या पंतनगर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर सोमवारी महाकाय होर्डिंग कोसळून १४ जणांचा नाहक बळी गेला. महापालिकेने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला हे होर्डिंग्ज लावल्याबद्दल नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही हे होर्डिंग हटवण्यात आली नाही.  इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग बेकादेशीररित्या लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर ३०४,३३८,३३७, ३४ अंतर्गत पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंडेकडे होर्डिंगचे कंत्राट १० वर्षांच्या भाडेतत्त्वावर होते.  

मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त ४०x४० चौरस फूट आकाराच्या होर्डिंगला परवानगी देते. मात्र हे बेकायदेशीर होर्डिंग १२०x१२० आकाराचे होते. या दुर्घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मुलुंड येथील भावेश भिंडे याच्या घराची झडती घेतली. मात्र, पोलिसांना भिंडेचा शोध लागला नाही. त्याचा मोबाईल फोन सध्या बंद असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कोण आहे भावेश भिंडे?

भावेश भिंडेंबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भावेश भिंडेंने २००९ साली विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. १५ वर्षापूर्वी दिलेल्या शपथपत्रामध्ये भिंडे यांनी मुंबई महानगरपालिका (एमएमसी) कायद्यांतर्गत २१ प्रकरणांमध्य परवानगीशिवाय होर्डिंग लावल्याबद्दल आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स (एनआय) संबंधित दोन गुन्ह्यांमध्ये दंड ठोठावण्यात आला होता. या २१ प्रकणांमध्ये एमएमसी कायद्याच्या कलम ३२८ आणि ४७१ (दंड) अन्वये आणि दोनदा एनआय कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भिंडे याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात २४ जानेवारी रोजी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. 

Read in English

Web Title: Same mistake as Ghatkopar 21 times; Who is Bhavesh Bhinde responsible for hoarding incident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.