सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 07:08 AM2024-04-17T07:08:55+5:302024-04-17T07:09:11+5:30

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमानची भेट घेतली.

Salman khan's security is the government's responsibility Chief Minister Eknath Shinde visited the house | सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट

सलमानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरी जाऊन घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमानची भेट घेतली. या भेटीवेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. सरकार सलमानच्या पूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे. त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पुन्हा असे धाडस कोणीही करू नये याची काळजी सरकार घेईल. संबंधित गँगला पोलिसांच्या मदतीने आम्ही संपवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, ही आमची सदिच्छा भेट होती. त्याच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. सोमवारी गुजरातमधील भुजमधून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक झाली. ते बिहारचे  आहेत. सध्या पोलिस चौकशी करीत असून, त्यांना २५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल. सखोल चौकशीच्या सूचना पोलिस आयुक्त व मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. या भेटीवेळी माजी आमदार बाबा सिद्दिकी, आमदार झिशान सिद्दिकी आणि युवासेनेचे राहुल कनाल उपस्थित होते.

नातेवाइकांची सुरक्षा वाढविण्याच्या सूचना 
गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कोण आहे? त्याचा शोध घेऊन पोलिस कठोर कारवाई करतील. यापुढे अशा प्रकारची हिंमत कोणीही करू नये अशी जरब पोलिस त्यांच्यावर बसवतील. सलमान खानसह त्याच्या नातेवाइकांची सुरक्षा वाढविण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोळीबारप्रकरणी गुजरातमधून २ जणांना अटक
सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. रविवारी सलमानच्या घराबाहेर गोळीबार करून पळून गेलेल्या विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोघांना सोमवारी रात्री उशिरा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माता नो मध गावातील मंदिर परिसरातून पकडण्यात आले, असे कच्छ-पश्चिमचे उपमहानिरीक्षक महेंद्र बगाडिया म्हणाले. दोन्ही आरोपी बिहारमधील पश्चिम चंपारण येथील मूळ रहिवासी असून, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दोघे कच्छ जिल्ह्यात असू शकतात, असा संदेश मुंबई पोलिसांकडून मिळाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे स्रोत सक्रिय केले. दोघांनाही तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी सुपारी दिली होती. 

Web Title: Salman khan's security is the government's responsibility Chief Minister Eknath Shinde visited the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.