महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण ३५ टक्केच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:28 AM2019-04-14T06:28:28+5:302019-04-14T06:28:43+5:30

नोकरी, शिक्षण व अन्य कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले.

The ratio of public toilets to women is 35% | महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण ३५ टक्केच

महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण ३५ टक्केच

Next

मुंबई : नोकरी, शिक्षण व अन्य कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले. मात्र, त्याप्रमाणात सार्वजनिक शौचालयांची संख्या आजही वाढविण्यात आलेली नाही. पुरुषांसाठी बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांच्या तुलनेत महिलांच्या प्रसाधनगृहांचे प्रमाण ३५ टक्केच असल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलांना होणारा प्रचंड त्रास व त्यांची कुचंबणाही उजेडात आली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबईतही सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण वाढविण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. तब्बल २२ हजार शौचकुपी बांधण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे, परंतु सध्या बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलावर्गाचा विचार करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. एका बिगर शासकीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
महिलांसाठी मुंबईत एकूण ३,२३७ शौचालये उपलब्ध आहेत. या तुलनेत पुरुषांसाठीच्या शौचालयांची संख्या ९,६४६ आहे. शहर भागात ४,७६२, पश्चिम उपनगरांमध्ये २,६६७ आणि पूर्व उपनगरांत २,२१७ शौचालये पुरुषांसाठी उपलब्ध आहेत.
पुरुष आणि महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शौचालयांच्या संख्येमध्ये जवळपास ६६ टक्क्यांची तफावत दिसून येते.
>येथे शौचालयांचे प्रमाण कमी...
मुंबईत चर्चगेट, नरिमन पॉइंट, कुलाबा या भागात पुरुष आणि महिलांच्या शौचालयांच्या संख्येत ७७ टक्के तफावत आहे, तर चिराबाजार, भुलेश्वर भागांत ८५ टक्के तफावत आहे.
>सार्वजनिक शौचालयांच्या तक्रारीत वाढ
गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढली आहे. २०१६ मध्ये नागरिकांकडून २९० तक्रारी आल्या होत्या. २०१८ मध्ये ४९४ तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या आहेत.

Web Title: The ratio of public toilets to women is 35%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.