मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:35 AM2024-04-26T09:35:04+5:302024-04-26T09:37:22+5:30

खऱ्या अर्थाने आजपासून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. 

in mumbai election campaign start from today filing of applications will begin in six lok sabha constituencies | मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

मुंबईचा मतसंग्राम आजपासून; सहा लोकसभा मतदारसंघांत अर्ज भरण्यास होणार सुरुवात

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील सहा लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. 

मुंबईच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पडून निर्माण झालेले दोन गट आणि त्यातील एका गटाच्या मागे असलेली भाजपची महाशक्ती विचारात घेता मुंबईवर वर्चस्व कुणाचे? हे या निवडणुकीअंती सिद्ध होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित चार लोकसभा मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम येथे सध्या एक-एक उमेदवार जाहीर झाले आहेत. रिंगणात कोण उतरणार याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई उत्तर पश्चिम-  १) महाविकास आ.अमोल कीर्तिकर

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवला असतानाच महायुतीला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. बहुभाषिक अशा या मतदारसंघात कीर्तिकर यांनी सोसायटी, चाळींमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर महायुती आजही उमेदवार पिंजत आहे. 

महायुती घोषणा नाही - 

महायुतीमध्ये अंतर्गत वाद किंवा ठोस निर्णय होत नसल्याने राजकीय चर्चेत असलेल्या नावांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार का? याकडे तमाम मतदारांचे लक्ष लागले आहे.

मुंबई उत्तर- १) महायुती  पीयूष गोयल
महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या वाट्याला मुंबई उत्तरची जागा आली आहे. मात्र भाजपच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात टक्कर देईल, असा उमेदवार नसल्याने काँग्रेसकडून शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना निवडणूक लढवण्याकरिता विनंती करण्यात आली आहे. मात्र, लढलो तर उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावरच अशी भूमिका घोसाळकर यांनी घेतल्याने जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे पीयूष गोयल मतदारांची भेट घेट मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

मुंबई उत्तर मध्य- १) महाविकास आ. प्रा. वर्षा गायकवाड

पूनम महाजन विद्यमान खासदार असलेल्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपला अद्याप उमेदवार देता आलेला नाही. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसने गुरूवारी प्रा. वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर केले. 

दुसरीकडे‘वंचित’ने घोषित केलेले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे प्रचाराचा श्रीगणेशाही झाला नसून, मतदारही उमेदवारांच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई उत्तर पूर्व- १) महायुती मिहीर कोटेचा
                           २) महाविकास आ. संजय दिना पाटील

उत्तर पूर्व मुंबईत महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मुलुंड ते मानखुर्द शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या बहुभाषिक मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. नाहूर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिमेकडे कोकणी मतदारांचे प्राबल्य आहे. ध्रुवीकरण न झाल्यास ही एकगठ्ठा मते शिवसेनेच्या पारड्यात पडतात.

मुंबई दक्षिण-  १) महाविकास आ. अरविंद सावंत

मुंबई दक्षिण मतदारसंघातील लढत ही अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. मागील दोन टर्म उद्धवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात उद्धवसेनेकडून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईतील निवडणुकीच्या टप्प्याला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असतानाही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. 

मागील महिनाभरापासून तयारीत असणाऱ्या भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांचे नाव आता बॅकफूटवर गेले आहे. शिंदेसेनेकडून यशवंत जाधव आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, मागील निवडणूक आणि एकूण राजकीय कारकीर्द पाहता, ही उमेदवारी देवरा यांच्या पदरी पडण्याची शक्यता आता वाढली आहे.

मुंबई दक्षिण मध्य-  १) महायुती राहुल शेवाळे  
                                २) महाविकास आ. अनिल देसाई

शिवसेना भवनच्या अंगणात होत असलेल्या या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीच्या लढाईत दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर आल्या आहेत. विद्यमान खासदार राहुल शेवाळे आता शिंदेसेनेचे उमेदवार असून, त्यांची लढत जुने सहकारी उद्धवसेनेचे अनिल देसाई यांच्याशी आहे. त्यामुळे शिवसेना भवनाच्या अंगणात जोरदार लढत आहे.

Web Title: in mumbai election campaign start from today filing of applications will begin in six lok sabha constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.