दाऊदचा भाऊ गजाआड

By admin | Published: February 4, 2015 03:17 AM2015-02-04T03:17:50+5:302015-02-04T03:17:50+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला जेजे मार्ग पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी बेड्या ठोकल्या.

Dawood's brother Gajaad | दाऊदचा भाऊ गजाआड

दाऊदचा भाऊ गजाआड

Next

खंडणीचे प्रकरण : इस्टेट एजंटास मारहाण केल्याचा आरोप
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला जेजे मार्ग पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी बेड्या ठोकल्या. इस्टेट एजंटकडे ३ लाखांची खंडणी मागणे, मारहाण करणे आदी गुन्ह्यांखाली ही कारवाई करण्यात आली.
२००३मध्ये संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पित झालेल्या इक्बालला बहुचर्चित सारा-सहारा प्रकरणात अटक झाली होती. त्या खटल्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर आतापर्यंत इक्बाल आपल्या जुन्या म्हणजेच पाकमोडीया स्ट्रीटवरील डांबरवाला इमारतीत वास्तव्यास होता. मध्यंतरी छोटा राजन टोळीने या इमारतीवर गोळीबार करून इक्बालचा अंगरक्षक आरीफ बैल याची हत्या केली होती. त्यानंतर मात्र इक्बालचे नाव फारसे चर्चेत नव्हते.
इस्टेट एजंट अब्दुल सलिम अब्दुल जब्बार शेख यांनी सोमवारी रात्री भायखळा पोलीस ठाण्यात इक्बाल, त्याचा साथीदार शब्बीर उस्मान शेखसह तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार ३० जानेवारीला इक्बालने शेख यांना डांबरवाला इमारतीतील राहत्या घरी बोलावून घेतले होते. तेथे इक्बालने ३ लाखांची खंडणी मागितली. तेव्हा शेख यांनी ती देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे इक्बालने स्वत: शेख यांना मारहाण केली. त्यानंतर शब्बू आणि तिसऱ्या अज्ञात साथीदाराने शेख यांना बुकलून काढले होते. या तिघांच्या तावडीतून सुटलेल्या शेख यांनी धीर एकवटून भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. (प्रतिनिधी)

दाऊदच्या घरात पोलिसांची एन्ट्री
अब्दुल सलिम अब्दुल जब्बार शेख यांच्या तक्रारीच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांनी डॉन दाऊदच्या पाकमोडीया स्ट्रीटवरील घरात एन्ट्री मारली. इक्बालची चौकशी सुरू असताना जेजे मार्ग पोलिसांचे पथक तक्रारदार शेख यांना गाडीत बसवून पाकमोडीया स्ट्रीट, डांबरवाला गल्लीतील दाऊदच्या घरी शिरले. तेथे पंचनामा करून साक्षीदार मिळतात का ते पाहून संध्याकाळी हे पथक पुन्हा पोलीस ठाण्यात परतले.

इक्बालला अशी झाली अटक
पोलिसांनी इक्बालसह तिघांविरोधात खंडणीची मागणी, मारहाणीचा गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी जेजे मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला. मारहाण झालेली डांबरवाला इमारत जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडत असल्याने तपास इथून तिथे सरकला.
तपास हाती येताच जेजे मार्ग पोलिसांनी इक्बाल आणि शब्बीर यांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार दुपारी २च्या सुमारास आपल्या सात ते आठ अंगरक्षकांसह इक्बाल जेजे मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला.
तब्बल ३ तास जेजे मार्ग पोलिसांनी इक्बाल व शब्बीर यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाबही नोंदवून घेतले. त्यानंतर सुमारे ५च्या सुमारास दोघांना अटक करून तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला. अटकेत असलेल्या इक्बालला उद्या दंडाधिकारी न्यायालयात रिमांडसाठी उभे केले जाईल.

Web Title: Dawood's brother Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.