बाल हक्क आयोगाकडून ‘त्या’ सेल्फीची दखल, शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 09:29 AM2024-03-29T09:29:00+5:302024-03-29T09:29:39+5:30

या आदेशावरून सर्व स्तरातून टीका होत असताना महाराष्ट्र बालहक्क आयोगाने दखल घेत विद्यार्थ्यांवर  राजकीय उपक्रम लादल्याबद्दल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

Child Rights Commission notices 'that' selfie, orders action against Education Commissioner | बाल हक्क आयोगाकडून ‘त्या’ सेल्फीची दखल, शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश

बाल हक्क आयोगाकडून ‘त्या’ सेल्फीची दखल, शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश

मुंबई : ऐन परीक्षा काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा आधार घेत सेल्फी काढण्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशावर नवा वाद निर्माण झाला आहे. या आदेशावरून सर्व स्तरातून टीका होत असताना महाराष्ट्र बालहक्क आयोगाने दखल घेत विद्यार्थ्यांवर राजकीय उपक्रम लादल्याबद्दल शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या पत्राविरोधात शिक्षण हक्क कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षण महासंघाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन दळवी यांनी बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती. शिक्षण विभागाकडून राज्यातील विविध बोर्डात शिकणाऱ्या २ कोटी ११ लाख विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याची टीका दळवी यांनी केली होती. दळवी यांच्या तक्रार पत्राची दखल घेत आयोगाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहित कारवाईचे आदेश दिले.

नेमके प्रकरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहिले होते. या पत्रात शिक्षणक्षेत्राबद्दल आपले विचार मांडले होते. हे पत्र शालेय विद्यार्थी वाचत असताना पालकांबरोबर सेल्फी काढून शिक्षण विभागाने नव्याने तयार केलेल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त मांढरे यांनी दिले.
बऱ्याच पालकांनी सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्याला विरोध केला. तसेच शिंदे यांच्या पत्रातील शाळांना निधी देण्याच्या आवाहनालाही सर्व स्तरातून विरोध करण्यात आला.

ऐन परीक्षा काळात हा उपक्रम राबवणे चुकीचे होते. छायाचित्र अपलोड करताना पालकांचा नंबर मागितल्याने या संपर्क क्रमांकाचा दुरुपयोग होईल. हा उपक्रम केवळ राजकीय होता.
    - नितीन दळवी

Web Title: Child Rights Commission notices 'that' selfie, orders action against Education Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Selfieसेल्फी